...आणि चिखलात रुतलेला हत्ती सुखरूप बाहेर आला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:00 AM2021-07-14T08:00:00+5:302021-07-14T08:00:17+5:30
भूतकाळात संकटकालीन परिस्थितीशी केलेला सामना आपल्याला वास्तवात रुतलेले पाय बाहेर काढण्यास नक्की बळ देईल.
एका राजाकडे त्याचा खास हत्ती होता. त्याचे नाव होते बाला. धिप्पाड देहाचा बाला, युद्धभूमीवर गेला की शत्रूला धडकी भरे, अशी त्याची ऐट होती. आजवर त्याच्यामुळे राजाने अनेक युद्धात, तहात यश मिळवले होते. विजयश्री मिळाल्यावरदेखील राजा बालावर चढवलेल्या अंबारीवर बसून राज्यात प्रवेश करत असे.
वयपरत्वे बाला थोडा थकत चालला होता. परंतु, राजाचे त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्याला आधीसारखाच मानसन्मान आणि राजेशाही थाट मिळत असे.
एक दिवस बालाला फिरवण्यासाठी सैनिक त्याला तळ्याकाठी घेऊन गेले. पाण्यात आंघोळ घालण्याच्या हेतूने त्यांना बालाला पुढे नेले, पण तळ्याकाठी भरपूर चिखल साचल्याने बालाचा पाय चिखलावरून सरकत खोल रुतून बसला. सैनिक त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत होते. स्वत: बाला देखील प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नव्हता.
ही बातमी राजाला कळली तर आपली काही खैर नाही. म्हणून घाबरलेले सैनिक प्रधानाकडे गेले. त्यांना विनंती केली आणि वाचवा असे म्हणाले. चतुर प्रधानाने तळ्याच्या चहुबाजूंनी रणवाद्ये वाजवायला सांगितली. ढोल, नगारे, दुदुंभी अशा रणवाद्यांनी जंगलाचा परिसर दुमदूमुन गेला. प्रधानांच्या अपेक्षेप्रमाणे रणवाद्यांचा असर झाला आणि बाला उसळी मारून सर्वशक्तीनिशी चिखलातून बाहेर पडला. सैनिकांनी त्याला स्वच्छ धुवून काढले. झुल पांघरली आणि राजेशाही थाटात परत आणले.
राजाला ही वार्ता कळली. त्याने प्रधानाचे आभार मानले व रणवाद्यांचे प्रयोजन विचारले. त्यावर प्रधान म्हणाला, `राजेसाहेब बाला सामान्य हत्ती नाही, तर तो योध्दा आहे. त्याला रणवाद्य ऐकण्याची सवय असल्याने तो आवाज ऐकून त्याचे बाहू स्फुरण पावले आणि गर्भगळीत झालेला बाला सुखरूप बाहेर आला.'
बालासारखेच आपणही अनेकदा संकटाच्या चिखलात रुतून बसतो, गर्भगळीत होतो. अशावेळी आपण भूतकाळातील जिंकलेल्या युद्धप्रसंगांचा आढावा घेतला पाहिजे. तत्कालीन परिस्थितीशी केलेला सामना आपल्याला वास्तवात रुतलेले पाय बाहेर काढण्यास नक्की बळ देईल.