Angarak Chaturthi 2021 : आपल्या मनोकामना बाप्पाने पूर्ण कराव्यात, यासाठी अशी करा अंगारकीला उपासना...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:00 AM2021-11-23T08:00:00+5:302021-11-23T08:00:11+5:30
Angarak Chaturthi 2021: बाप्पा हा मंगलमूर्ती आहेच तसेच तो विघ्नहर्ता सुद्धा आहे. आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी अंगारकीला बाप्पाकडे अशा प्रकारे साकडे घाला.
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. त्यातही चतुर्थीची तिथी जेव्हा बाप्पाच्या आवडत्या मंगळवारी येते तेव्हा तो अंगारक योग म्हटला जातो. २३ नोव्हेंबर रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. ही तिथी गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी विधानहर्ता गणपतीची विधिवत पूजा करून उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. यासोबतच बाप्पा आपल्या मनोकामनाही पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ही चतुर्थी वैशिष्ट्यपूर्ण आहे
मंगळवारी येणारी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते. याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. ज्यांना चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे, त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीपासूनच हे व्रत सुरू करावे. २३ नोव्हेंबर रोजी येणारी अंगारकी २२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी रात्री १०. २६ मिनिटांनी सुरू होईल आणि २३ नोव्हेंबर (मंगळवार) रोजी दुपारी १२. ५५ वाजता समाप्त होईल. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ०८. २७ मिनिटांनी चंद्रोदय होईल.
संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास या दिवशी पुरुषांनी पितांबर व स्त्रियांनी पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर देवासमोर हात जोडून प्रार्थना करावी. या दिवशी कोणतेही धान्य खाऊ नये. चंद्रोदयानंतरच उपवास सोडावा. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. त्याला दुर्वा, फळे, फुले, चंदन अर्पण करावे. उदबत्ती लावावी. जास्वंद, लाल फुले व मोदक किंवा बेसनाचे लाडू देवाला अर्पण करावेत. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयानंतर आरती करून उपवास सोडावा. या दिवशी श्रीगणेशाच्या मंत्रोच्चारांसह श्री गणेश स्तोत्राचे पठण करावे. जमल्यास अथर्वशीर्षाची आवर्तने करावीत किंवा पाठ नसल्यास श्रावण करावीत. देवाला आपला मनोदय सांगून आपले इप्सित कार्य पूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना करावी.