Angaraki Chaturthi 2024: संकष्टीचा उपास करत नसलात, तरी अंगारकीचा उपास कराच; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:00 AM2024-06-25T07:00:00+5:302024-06-25T07:00:02+5:30

Angaraki Chaturthi 2024: आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, या योगावर गणपती, गुणपती असलेल्या बाप्पाचा उपास आणि उपासना का करावी ते जाणून घ्या!

Angaraki Chaturthi 2024: If you don't worship Sankashti, worship Angaraki; Because... | Angaraki Chaturthi 2024: संकष्टीचा उपास करत नसलात, तरी अंगारकीचा उपास कराच; कारण...

Angaraki Chaturthi 2024: संकष्टीचा उपास करत नसलात, तरी अंगारकीचा उपास कराच; कारण...

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! ह्या एकमेव दैवतासाठी समस्त मंडळीr  भाविक होतात आणि भावुकही होतात. `बाप्पा साठी काही पण' असा गणेशभक्तांचा पवित्रा असतो. काही जण मंगळवारचा किंवा संकष्टीचा उपास करतात, तर काही जण नियमितपणे गणपती मंदिरात जातात. मात्र हे ज्यांना शक्य होत नाही ते आवर्जून  'अंगारकी चतुर्थी'चा उपास करतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र आताच्या काळात नुसते अंगारकी व्रत करून भागणार नाही, तर सोबतच गणरायाचे गुणही अंगिकारावे लागतील.

महाभारताच्या लिखाणात चुका होऊ नयेत म्हणून महर्षी व्यासांनी गणरायाची निवड केली. कारण तो उत्तम लेखनिक होता. म्हणजे व्याकरणाच्या बाबतीतही तो किती काटेकोर असेल, ह्याची आपण कल्पना करू शकतो. त्याच्यासारखेच आपणही भाषाशुद्धीबाबत आग्रही असले पाहिजे. मात्र आपण गणपतीची आरती म्हणताना बेधडकपणे `संकटी पावावे' ऐवजी `संकष्टी पावावे' म्हणून मोकळे होतो. तसे न म्हणता `संकटी पावावे' असाच उच्चार करणे अपेक्षित आहे. कारण, विघ्नहर्ता गणरायाने केवळ संकष्टीच्या दिवशी आपल्यावर प्रसन्न न होता, संकटसमयी आपल्याला योग्य मार्ग दाखवावा, असा अर्थ ह्या आरतीचे रचेते समर्थ रामदास स्वामी ह्यांना अभिप्रेत आहे!

बाप्पा तुंदिलतनू असला, तरी तो 'हेल्दी' आणि `फिट' आहे. त्याने रणांगणात अनेक असूरांना धारातिर्थी पाडले आहे. त्याच्या निरोगी आणि बलवान शरीराचे गुपित म्हणजे त्याचा आहार! त्यात तळलेल्या पदार्थांना अजिबात स्थान नाही. उकडून-शिजवून केलेल्या अस्सल चवीच्या पदार्थांचेच तो सेवन करतो. म्हणूनच  गणेशोत्सवात बाप्पा घरी आले की सुगरणी उकडीचे मोदक, खिरापत, सुकामेव्याचे पंचखाद्य, काळ्या वाटाण्याचे सांबार आणि आंबोळ्या, पातोळ्या असा सात्विक नैवेद्य करतात. असा पौष्टिक आहार घेणारा बाप्पा कधी सुस्तावस्थेत आपल्याला आढळत नाही. तो चवीनेच नाही, तर डोळसपणे आहार घेतो आणि आपल्याला दैनंदिन आहारशैलीकडे डोळसपणे बघायला शिकवतो.

बाप्पा मंगलमूर्ती आहे. त्याच्याकडे कधीही बघा, त्याला बघून प्रसन्न वाटते. मानवी देहावर गजमुख बसवलेले असूनही बाप्पा आपल्याला गोड दिसतो. का? कारण ज्याचे मन प्रसन्न असते, त्याचा चेहराही प्रसन्न दिसतो आणि त्याच चेहऱ्याची छाप समोरच्यावर पडते. असा बाप्पा बाह्य सौंदर्याऐवजी आंतरिक सौंदर्याला महत्त्व द्या, असे सुचवतो.

काव्यशास्त्रविनोदात रमणारा बाप्पा 'एकसूरी आयुष्य जगू नका' असाही आपल्याला संदेश देतो. आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर एखादी तरी कला नक्कीच शिकून घ्या. तो स्वत: गायन-वादन-नर्तन ह्यात निपुण आहे. विविध गाण्यांमधून तसे वर्णनही आपण ऐकले आहे. आत्ताच्या काळात 'ऑलराऊंडर' असलेल्या भक्तांमागे तो ठामपणे उभा राहतो. कारण, अशीच मेहनती आणि महत्वाकांक्षी माणसे त्याला जास्त आवडतात. 

जे काम हाती घ्याल, ते मनापासून करा. वाटेत येणाऱ्या अडचणींसमोर हतबल होऊ नका. उंदरासारख्या दुष्ट प्रवृत्तीवर स्वार होऊन पुढचा मार्ग काढा, हे बाप्पा आपल्या व्यक्तिमत्त्वातून सिद्ध करतो. कोणत्याही कामात मागे न राहता, पुढाकार घेऊन नेतृत्व स्वीकारण्याचे कसब आपल्यात आले पाहिजे. जिथे शौर्य गाजवायचे तिथे 'महागणपती' आणि जिथे सर्वांचे मन जिंकून घ्यायचे तिथे 'गणू', 'गणोबा', 'गणेशा' होता आले पाहिजे, असे बाप्पा आपल्याला शिकवतो. बाप्पाच्या व्यक्तिमत्त्वातले असे विविध बारकावे आपल्यालाही आंगीकरता यावेत म्हणून संकष्टी तथा अंगारकीचे व्रत अवश्य करा, असे सांगितले जाते. 

Web Title: Angaraki Chaturthi 2024: If you don't worship Sankashti, worship Angaraki; Because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.