मंगळवारी संकष्टी चतुर्थी: अंगारकी विशेष का मानली जाते? पाहा, विविध मान्यता, महात्म्य, कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 03:03 PM2024-06-23T15:03:00+5:302024-06-23T15:03:00+5:30

Angarki Sankashti Chaturthi June 2024: जून महिन्यात कधी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या, महत्त्व अन् काही मान्यता...

angarki sankashti chaturthi june 2024 know about date significance and kath of angarak sankashta chaturthi in jyeshtha 2024 | मंगळवारी संकष्टी चतुर्थी: अंगारकी विशेष का मानली जाते? पाहा, विविध मान्यता, महात्म्य, कथा

मंगळवारी संकष्टी चतुर्थी: अंगारकी विशेष का मानली जाते? पाहा, विविध मान्यता, महात्म्य, कथा

Angarki Sankashti Chaturthi June 2024: गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होत आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष का मानली जाते. अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवसाचे महत्त्व, महात्म्य आणि काही मान्यता जाणून घेऊया...

२५ जून २०२४ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. बाप्पा मंगलमूर्ती आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात. 

अंगारक संकष्ट चतुर्थीची कथा 

अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते. तसेच गणेश पुराणातही याबाबत संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल.

अंगारकी संकष्टी चतुर्थीची मान्यता

या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव आहे.  

अथर्वशीर्ष पठण आणि दुर्वा अर्पण

संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही, तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा, असे सांगितले जाते.
 

Web Title: angarki sankashti chaturthi june 2024 know about date significance and kath of angarak sankashta chaturthi in jyeshtha 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.