Anger Control: तुम्हालाही खूप म्हणजे खूपच राग येतो का? 'या' औषधाचे चार थेंब सात दिवसात दाखवतील प्रभाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:01 AM2023-06-09T11:01:34+5:302023-06-09T11:02:01+5:30
Anger Management: रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजवर तुम्ही सगळे पर्याय वापरून बघितले असतील तर निवडा हा शेवटचा मार्ग!
सद्यस्थितीत सगळ्यात मोठा टास्क काय असेल तर तो म्हणजे रागावर नियंत्रण! हा प्रश्न आबाल वृद्धांना सतावतोय. कारण वयोगट कोणताही असो, आपण सगळेच आपल्या मनावरचा ताबा गमावून बसलो आहोत. रागवायचं नाही ठरवलं तरी नेमका जास्त राग येतो आणि राग नियंत्रणात येत नाही म्हणूनही राग येतो. अशा रागावर सापडलाय एक रामबाण तोडगा. त्याचे चार थेम्ब सात दिवसात तुमचा राग घालवतील, कसा ते पहा!
एका बाईला खूप राग येत असतो. ती सर्व उपाय करते. शेवटी एका साधू महाराजांना शरण जाते आणि त्यांना उपाय विचारते. साधू बाबा एक औषधाची बाटली देतात आणि राग आल्यावर त्यातल्या औषधाचे चार थेम्ब जिभेवर टाकायला सांगतात व म्हणतात, 'हे औषध घातल्यावर दहा मिनिटं अजिबात बोलू नका. सलग सात दिवस हा प्रयोग करा आणि मग तुमचा अनुभव सांगा.'
त्या दिवसापासून बाईने प्रयोग सुरु केला आणि काय आश्चर्य! सात दिवसात तिचा राग आटोक्यात आला. ती साश्रू नयनांनी धावत साधू महाराजांकडे आली आणि तिने पायावर डोकं ठेवून विचारलं, 'महाराज नेमकं कोणतं चमत्कारिक औषध दिलंत, जेणेकरून माझा राग पूर्णपणे गेला? माझा स्वभाव कायमस्वरूपी बदलला. इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झालं आणि आता मी खूपच तणावमुक्त जीवन जगू लागलेय.सांगा महाराज....'
महाराज म्हणाले, 'ताई, त्या औषधाच्या बाटलीत कोणतंही औषध नव्हतं तर साधं पाणी होतं! फक्त ते चार थेंब जिभेवर ठेवल्यानंन्तर दहा मिनिटं पाळलेलं मौन औषधासारखं प्रभावी ठरलं. त्या दहा मिनिटात राग निवळला आणि मनातल्या मनात रागाचा निचरा झाला आणि तुम्ही तणावमुक्त जीवन जगू लागलात!'
तात्पर्य, रागाच्या वेळी पाळलेले मौन हा राग घालवण्याचा सर्वोत्तम आणि बिनखर्चिक पर्याय आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्हाला राग आला तर पाण्याचे चार थेम्ब जिभेवर ठेवा आणि दहा मिनिटं मौन पाळा; औषधाची मात्रा तुम्हालाही लागू होईल हे नक्की!