Apara Ekadashi 2024: एकादशीचे व्रत पापक्षालन करते; अशातच अपरा एकादशीच्या महात्म्याची कथा वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:00 AM2024-06-03T07:00:00+5:302024-06-03T07:00:02+5:30

Apara Ekadashi 2024: जाणता अजाणता घडलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचे सामर्थ्य अपरा एकादशीच्या व्रतात आहे; पण काय आहे व्रत कथा? वाचा!

Apara Ekadashi 2024: Ekadashi fasting cleanses sins; Read the story of Apara Ekadashi! | Apara Ekadashi 2024: एकादशीचे व्रत पापक्षालन करते; अशातच अपरा एकादशीच्या महात्म्याची कथा वाचा!

Apara Ekadashi 2024: एकादशीचे व्रत पापक्षालन करते; अशातच अपरा एकादशीच्या महात्म्याची कथा वाचा!

वैशाख कृष्ण एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखले जाते. ३ जून रोजी आहे अपरा एकादशी, या व्रताचे पुण्यफळ पदरात अवश्य पाडून घ्या. इतर सर्व एकादशांप्रमाणे अपरा एकादशी व्रताचे कठोरपणे आचरण करणारे लोक दशमीच्या दिवशी दुपारी भोजन करतात. नंतर एकादशीला संपूर्ण दिवस उपास करतात, तर द्वादशीला माध्यान्ही भोजनाने उपास सोडतात. या व्रताची फलनिष्पत्ती पापनाश आणि जाणता अजाणता घडलेल्या चुकांचे परिमार्जन अशी सांगितली आहे. या एकादशीबाबत ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांनी धर्मबोध ग्रंथात पुढील माहिती दिली आहे. 

धर्मशास्त्राच्या अपेक्षेप्रमाणे वैद्याने गोरगरीबांना विनामूल्य औषधयोजना केली पाहिजे. विद्वानांनी गरीब आणि अनाथ मुलांना ज्ञानदान केले पाहिजे आणि राजाने प्रजेचा योग्यप्रकारे सांभाळ आणि रक्षण केले पाहिजे. तसेच श्रीमंतांनी गरीब, दीनदुबळ्यांना सहाय्य केले पाहिजे. जे हे करत नाहीत त्यांना मृत्यूनंतर अटळ नरकवास टाळण्यासाठी अपरा एकादशीचे व्रत करावे. कारण ही एकादशी पुण्यफलदायी आहे, असे शास्त्र सांगते.

या एकादशीच्या दोन कथा आहेत. त्यापैकी पहिली कथा अशी-

प्राचीन काळी एक ब्राह्मण धर्मभ्रष्ट होऊन वागत होता. त्यामुळे प्रायश्चित्त म्हणून समाजाने त्याला बहिष्कृत केले. परिणामी तो जंगलात जाऊन राहू लागला. कालांतराने तिथे ता आजारी पडला. त्याच काळात हळूहळू वाट फुटेल तिथे जात असताना तो देवल ऋषींच्या आश्रमात आला. देवलांची तपश्चर्या, त्यांचे तेज:पुंज व्यक्तिमत्त्व पाहून तो प्रभावित झाला. त्याने देवलांना शरण जाऊन सर्व वृत्तांत सांगून उद्धारासाठी उपाय विचारला. त्यावेळी देवलांनी त्याला हे अपरा एकादशीचे व्रत सांगितले. त्याप्रमाणे त्याने हे व्रत केले. कालांतराने या व्रताच्या प्रभावामुळे प्रतिकुलता संपून त्याला परत समाजाने स्वीकारले. पुढे तो सुखी जीवन जगू लागला आणि विष्णुलोकी गेला. 

दुसरी कथादेखील अशीच व्रतमहात्म्य सांगणारी आहे. ती कथा अशी- प्राचीन काळी महीध्वज नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता. अतिशय चारित्र्यसंपन्न अशा या राजाला त्याच्या वज्रध्वज नावाच्या अत्यंत दुष्ट अशा धाकट्या भावाने ठार मारले. नंतर त्याचे प्रेत एक पिंपळाच्या वृक्षाखाली पुरले. पिशाच बनलेला महिध्वज लोकांना फार त्रास देऊ लागला. एकदा धौम्य ऋषी योगायोगाने पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले. त्यावेळी त्यांनी राजाचे पिशाच पाहिले. दयाळूवृत्तीने धौम्य ऋषींनी त्या पिशाचाला सद्गती मिळावी म्हणून त्याच्यासाठी स्वत: अपरा एकादशीचे व्रत केले. त्यामुळे राजा महिध्वजाला सद्गती मिळाली. 

धर्मपालन करणाऱ्या माणसाने सुयोग्य वर्तन करावे अशी धर्माची अपेक्षा असते. त्याचे बरेचसे प्रतिबिंब या व्रताच्या कथेमध्य पडलेले आढळते. ही एकादशी पापनाश करणारी आहे, हे खरेच पण आधी पापच हातून घडू नये, म्हणून दक्षता बाळगा, असे सांगणारी आहे. प्रत्येकाने आपल्या अनुकुलतेचा लाभ इतरांना करून द्यावे, असे सांगण्यासाठी आहे. 

आपला धर्म एकप्रकारे समाजवादी विचारसरणीशी नाते सांगणारा आहे. पण ही बाजू जगासमोर फारशी आलीच नाही. हिंदू धर्मातील उच्च तत्त्वे आणि परोपकारी दृष्टीकोन यावर जसा भर दिला गेला पाहिजे होता तसा तो दिला गेला नाही, ही खरोखरच अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. संकटात सापडलेल्यांना न मागता मदत करणे हे या एकादशीचे व्रत केल्यासारखेच आहे.

Web Title: Apara Ekadashi 2024: Ekadashi fasting cleanses sins; Read the story of Apara Ekadashi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.