अहिंसा, करुणेचा अपूर्व संगम : भगवान महावीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 07:15 AM2024-04-21T07:15:17+5:302024-04-21T07:15:29+5:30
भगवान महावीरांचे व्यावहारिक जीवन औदार्य आणि समभावाची प्रचिती देणारे आहे. त्यांनी कधीही व्यक्तिपूजेचे समर्थन केले नाही. जन्माला श्रेष्ठत्वाचा आधार मानले नाही. गुरू पदही जन्मसिद्ध घोषित केले नाही. कठोर आणि हृदयस्पर्शी अनुशासनाचे ते प्रतीक होते. जनतेच्या भाषेत त्यांनी उपदेश केला. म्हणून ते जननायक होऊ शकले.
सरला बोथरा
जैन धर्माच्या अभ्यासक
विपुलतेने मिळाल्यानंतही जे मिळाले त्याचा सहज त्याग करता येत असेल, तरच तो अपरिग्रह होय, असे भगवान महावीर यांनी सांगितले आहे! भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर होते. भगवान महावीर यांचा २५५० जन्मकल्याण आज संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्यांचे आचार-विचार, दर्शन व चिंतनाचा भारतीय जनमानसावर फार खोलवर प्रभाव आहे. ते अहिंसा व करुणेचे अवतार होते. अधर्माला दूर सारून धर्माचा खरा मार्ग त्यांनी सांगितला. भगवंतांनी अशरणाला शरण देऊन जगाला आत्मबोध करून दिला. मृत्यूला जणू अमरत्वाचा मार्ग दाखविण्यासाठी ते या जगात आले होते.
वर्धमान या धरतीवर आल्यानंतर गृहस्थ झाले, साधक आणि तीर्थंकर झाले. त्यांच्या उपदेश वाणीने जागृती प्रज्वलित झाली. दीर्घ काळापर्यंत तपस्येची प्रभा पसरली. त्यामुळे जनतेला मौन साधनेचे रहस्य कळले. भगवान महावीर आयुष्यभर अहिंसेच्या तत्त्वावर चालले. त्यातून समाज व देश-राष्ट्र जागृत झाला. व्यक्ती जागृत झाली. समाज, देश व राष्ट्राचा पाय त्यांनी सत्तेच्या मोहात अडकू दिला नाही. सत्याला त्यांनी व्यावहारिक रूप दिले. त्यातून अहिंसा तत्त्व होऊन पुढे आले. त्यांनी जे कार्य केले त्यामागे हिंसेला असमाधी आणि अहिंसेला समाधी हे तत्त्व निहित होते.
भगवंतांचे स्वत:चे जीवन हेच त्याचे उदाहरण आहे. भगवान महावीरांनी साडेबारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांना अन्ताहार, प्रान्ताहार, रुक्षाधर आदी निष्ठावंत शिष्य लाभले. “देहे दुक्ख महाफलम्” हा त्यांचा सिद्धांत साऱ्या दुनियेला परिचित आहे. भौतिक सुखाची तहान भागविण्यासाठी तप करणाऱ्यांवर भगवंतांनी टीका केली. कट-कारस्थानाने तप करणाऱ्यांना गर्वाचे मूळ असे म्हटले.
मानसिक आणि वाचिक अहिंसेचे मूलस्रोत काय?
तामसिक तपस्येवर भगवान महावीरांची दृष्टी नेहमी शनीचे क्रूर रूप घेऊन होती. दुसऱ्याचा प्राण घेणारी, स्वत:ला आर्त ध्यानात टाकणारी तपस्या शाब्दिक तपस्या आहे. तात्विकदृष्टीने ती हिंसा होय, तपस्या नव्हे! हजारो महावती त्यांचे शिष्य होते आणि लाखो अनुयायी. त्यांच्या शिष्यत्वाची सीमा होती अहिंसा. महावती पूर्ण अहिंसक होते. त्यासाठी भगवान महावीरांनी स्वत:च्या संपूर्ण जीवनाला अनुशासनात बांधले. भगवंतांनी मौनाची साधना केली.
मौन यासाठी राहायचे की पूर्ण स्वरूपात आत्म्यात विलीन व्हावे. ते ज्ञानवादी होते. क्रियेच्या आधी ज्ञान. कोरडे ज्ञान व कोरडी क्रिया मोक्ष देत नाही. ज्ञान आणि क्रिया दोन्हींचा संगम झाला तर मोक्षाचा मार्ग तयार होतो. त्यांचा आचार अहिंसामूलक, विचार अनेकांत आणि भाषा स्यादवादमूलक आहे. मानसिक अहिंसेसाठी अनेकान्तदृष्टी आणि वाचिक अहिंसेसाठी स्यादवाद त्यांच्या गतिशीलतेचा मूलस्रोत होता.
“तुमवेव तुम मित की बहिया मित्तमिच्छासि”
लाभ-अलाभ, सुख-दु:ख, जीवन-मृत्यू, निंदा-प्रशंसा, मान-अपमान यात समता राहावी, अहिंसकात्मक भावना राहावी ही खरी आध्यात्मिक समता आहे. वर्ग भेद परिग्रहातून तयार होतो. प्रभूंनी सांगितलेल्या अहिंसेत याला स्थान नाही. विपुलतेने मिळाल्यानंतही जे मिळाले त्याचा सहज त्याग करता येत असेल तर तो अपरिग्रह होय. त्यागी हे महान असतात.
भगवंतांनी म्हटले की, सुख-दु:ख ही आपलीच क्रिया असते. स्वर्ग आणि नरक मानवाच्या हातात आहे. चांगले कार्य चांगलेच फळ देते. प्रभू तेच कार्य करीत होते. आत्म्याचे समाधान आत्म्यात असते, ते भौतिकतेत नसते. भौतिक पदार्थांमध्ये, सुखाच्या भौतिक कल्पनांमध्ये माणसाने स्वत:ला बांधून घेऊ नये, त्याविषयी आसक्ती असू नये.
भगवान महावीरांची “तुमवेव तुम मित की बहिया मित्तमिच्छासि” ही ललित मानवाचे ध्यान खेचून घेते. तूच तुझा मित्र आहेस, बाहेर कशाला शोध घेतोस? मित्र तेच आहेत, जे मित्रांचे हित बघतात, दु:खातून सुटका करतात, असे भगवान महावीर सांगतात. भगवंतांनी म्हटले, तू स्वत:वरच नियंत्रण ठेव. सर्व दु:खातून सुटका होईल.
भगवान महावीरांचे व्यावहारिक जीवन औदार्य आणि समभावाची प्रचिती देणारे आहे. त्यांनी कधीही व्यक्ती पूजेचे समर्थन केले नाही. जन्माला श्रेष्ठत्वाचा आधार मानले नाही. गुरू पदही जन्मसिद्ध घोषित केले नाही. सर्व प्राणिमात्रांना स्वत:चा विकास करण्याचा अधिकार आहे. पुरुषांसोबत स्त्रियादेखील विकासान्मुख साधना करू शकतात.
साधू-संतांप्रमाणे भगवान महावीरांनी साध्वी संघही तयार केला. कठोर आणि हृदयस्पर्शी अनुशासनाचे ते प्रतीक होते. जनतेच्या भाषेत त्यांनी उपदेश केला. म्हणून ते जननायक होऊ शकले. भगवंतांच्या हिमालयासारख्या उत्तुंग जीवनावर दृष्टी टाकल्यास मानवाची मान सन्मानाने उंच होते. त्यांच्या लोककल्याणकारी उपदेशाने भारावलेले मन श्रद्धेने नम्र होते.