बांगड्या हे स्त्रियांसाठी फक्त अलंकार की संरक्षण कवच? जाणून घ्या शास्त्रीय माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:37 AM2021-05-24T09:37:38+5:302021-05-24T09:41:17+5:30

जितकी काळजी आपल्या संस्कृतीने स्त्रीची घेतली आहे तितकी कुठेही इतरत्र दिसत नाही. जितका आदर आपल्या संस्कृतीने स्त्री ला दिलाय तो इतर कुठल्याही धर्मात दिसणार नाही. 

Are bangles just an ornament or a shield for women? Learn classical information | बांगड्या हे स्त्रियांसाठी फक्त अलंकार की संरक्षण कवच? जाणून घ्या शास्त्रीय माहिती

बांगड्या हे स्त्रियांसाठी फक्त अलंकार की संरक्षण कवच? जाणून घ्या शास्त्रीय माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देहातात सोन्याच्या बांगड्या असतील तर अगदी सूक्ष्म प्रमाणात सोन्याचे कण त्वचेद्वारे शरीरात शोषले जातात.तोतरेपणा, बोबडेपणा, जड जीभ तसेच इतर आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. शरीराच्या प्रतिकार क्षमता चांगली होते, तेज प्राप्त होते.

>> सौ. मृदुला बर्वे

स्त्रिया आणि अलंकार हे नाते फार जुने आहे. विविध अलंकार हे केवळ सौंदर्यप्रसाधन हेतूने बनवलेले नाही, तर त्याचे शरीराला अनेक लाभ आहेत, असे म्हटले जाते. उदा. हातात किणकिणाऱ्या, मंजुळ आवाज करणाऱ्या रंगीबेरंगी बांगड्या. त्या केवळ शोभेसाठी नाहीत, तर त्या स्त्रियांसाठी संरक्षणकवच देखील आहेत. याविषयावर अधिक खुलासा केला आहे, हिंदू संस्कृती अभ्यासक सौ. मृदुला बर्वे यांनी. 

प्रसंग १:
उशीर झालाय, पाहुणे कुठल्याही क्षणी येतील. घरातली स्त्री लगबगीने सराईतपणे स्वयंपाकघरात वावरतेय. एका गॅस वर दूध ठेवलंय, दुसऱ्या गॅस वर नवरोबांचा चहा, सर्वात मागे भाजी शिजतेय आणि एकीकडे रवा भाजायला घेतलाय. हे चालू असतानाच मुलगी मागून येऊन बिलगते - आई! आणि तिला जवळ घेऊन, डोक्यावरून हात फिरवताना एकदम ती ओरडते - आई, तुझ्या बांगड्या गरम आहेत, हे बघ, चटका बसतोय किंचित !!! आई पण हात लावून पहाते, ज्या हाताने रवा भाजत होती त्या हातातल्या 2 काचेच्या बांगड्या व सोन्याची बांगडी गरम झालेली असते. बांगड्या नसत्या तर! 

प्रसंग 2 : 
घाईघाईने एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना, एकदम दारावर हात आपटतो. हातातील काचेच्या बांगड्या तडकतात पण हाताला फारसे काही होत नाही. लागलेला तडाखा बांगड्यांनी पचवलेला असतो. 

एक खूप हलकाफुलका, पण फार महत्त्वाचा विषय! आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांनी बांगड्या घालणे, विशेषतः काचेच्या व सोन्याच्या ह्याला खूप महत्त्व दिले आहे. का बरं असे आपल्या संस्कृतीत? आपले पूर्वज वेडे होते का? तर अजिबात नाही. तर किती शहाणे होते हे कळण्याइतके आपण शहाणे राहिलेलो नाही! आधी भावनिक व दिसणारी कारणे पाहूया...

बांगड्या घातलेली स्त्री सुंदर व सोज्वळ दिसते. हातातल्या सोन्याच्या व काचेच्या बांगड्या एकाआड घातलेला हात अतिशय सुरेख दिसतो. आपण आनंदी असणे, सुंदर दिसणे हे रोजच असावे असे आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे. घरातील स्त्री आनंदी तर घर आनंदी!

ते आपल्या बाल्कनीत लटकवले असते ना, चिमण्या किंवा तारे, जे किणकिणतात - Wind Chimes हो, ती किणकिण जशी सुखावह वाटते अगदी तशीच स्त्री च्या हातातील बांगड्यांची झालेली किणकिण मन शांत करते. ध्वनिशास्त्र व मानसशास्त्र सांगते बरका हे! न दिसणाऱ्या पण अनुभव घेता येतील अशा गोष्टी... 

स्त्री सतत कामात असते. मनगटाच्या आजू बाजूच्या नसा व स्नायु ह्याना उपयुक्त दाब मिळाले तर बाईला कमी कंटाळते, शीण कमी होतो. स्त्री सतत अग्नीच्या संपर्कात असते. अन्न शिजवताना निर्माण होणारी धग व उष्णता ह्याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. गरम वाफा सतत हातावर येण्याने तिच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. हातात बांगड्या असतील तर काच व सोने उत्तम "heat conductor" असल्याने, बाईच्या शरीराला अपाय होत नाही. हातावर पट्कन काही आघात झाला तर बांगड्या आधी तो तडाखा घेतात, मग शरीरावर आघात होतो. हातात सोन्याच्या बांगड्या असतील तर अगदी सूक्ष्म प्रमाणात सोन्याचे कण त्वचेद्वारे शरीरात शोषले जातात. शरीराच्या प्रतिकार क्षमता चांगली होते, तेज प्राप्त होते. मे महिन्याच्या उन्हात बाहेर गेलात तर नक्की अनुभव घ्या, पहा सर्वात आधी आपल्या बांगड्या गरम होतात. तोतरेपणा, बोबडेपणा, जड जीभ तसेच इतर आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. 

आपल्या सर्वांच्या मनावर हा सतत आघात केला गेला आहे की आपल्या संस्कृतीत स्त्रीला महत्त्व नाही. पण ह्याच्या बरोब्बर उलटे आहे. जितकी काळजी आपल्या संस्कृतीने स्त्रीची घेतली आहे तितकी कुठेही इतरत्र दिसत नाही. जितका आदर आपल्या संस्कृतीने स्त्री ला दिलाय तो इतर कुठल्याही धर्मात दिसणार नाही. 

आपल्या संस्कृतीतल्या छोट्या छोटया गोष्टींचे महत्त्व ओळखूया. आपल्या संस्कृतीमधील ज्ञान जतन करूया, पुढच्या पिढीला देऊया. शुभं भवतु | 

Web Title: Are bangles just an ornament or a shield for women? Learn classical information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.