प्रेम विवाह करूनही घरात वादावाद होत आहेत? मग 'हे' उपाय जरूर करून पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:00 AM2021-07-29T08:00:00+5:302021-07-29T08:00:13+5:30
भांडणं लुटुपुटुची असतील तर ठीक, पण या वादांनी टोक गाठले, तर प्रेमभंग आणि पुढे विवाहभंग होण्यापर्यंत मजल जाते. वास्तू शास्त्राने यावर काही उपाय सांगितले आहेत, ते करून पहा.
असे म्हटले जाते की ते प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळविणे कठीण आणि मिळाले तर टिकवून ठेवणे त्याहून कठीण आहे. या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर, लोक प्रेम विवाह करतात परंतु तरीही ते आनंदी नाहीत असे दिसून येते. २४ तास एकत्र राहिल्यानंतर, ते एकमेकांचे दोष काढण्यास सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये क्षणो क्षणी भांडणे सुरू होतात. ही भांडणं लुटुपुटुची असतील तर ठीक, पण या वादांनी टोक गाठले, तर प्रेमभंग आणि पुढे विवाहभंग होण्यापर्यंत मजल जाते. वास्तू शास्त्राने यावर काही उपाय सांगितले आहेत, ते करून पहा.
या उपायांसह प्रेम विवाहातील समस्या दूर करा
>> लग्नानंतर रोजचे वाद होत असतील, तर गरजूंना कणिक आणि तेलाचे दान करा. हा उपाय केवळ प्रेम विवाह झालेल्यांनाच नाही तर ठरवून विवाह केलेल्यांनाही वापरता येईल. या उपायाने वाद कमी होऊन परस्परांचे संगनमत होण्यास मदत होते. मात्र हे दान करताना नवरा बायको एकत्र असणे गरजेचे आहे.
>> लग्नसंबंध पुन्हा सुधारण्यासाठी तुम्ही जोडीदाराला एखादी भेट वस्तू देणार असाल, तर ती वस्तू काळया किंवा निळ्या रंगाची असणार नाही याची काळजी घ्या. हे रंग नात्यावर नकारात्मक परिणाम करतात.
>> दररोज मीठ मिश्रित पाण्याने फरशी पुसा. याशिवाय रोज सायंकाळी कापूर जाळण्याने नकारात्मक उर्जा दूर होईल.
>> दर शुक्रवारी राधा-कृष्णाच्या मंदिरात जा. तेथे पिवळ्या रंगाची फुले व खडीसाखर अर्पण करा, यामुळे विवाहातील अडचणी दूर होतील.
>> आपल्या शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये राधा कृष्णाची मूर्ती, तसबीर किंवा मोरपीस लावा. त्यामुळेही सकारात्मक वातावरण होऊन वाद निवळतो.
>> बेडरूममध्ये घरात वापरण्याच्या चपलाही वापरू नका. त्या खोलीबाहेर ठेवा. तसेच मोबाईल, लॅपटॉप इ. गॅझेट खोलीबाहेर ठेवून नात्याला वेळ द्या.