तुम्हीसुद्धा आयुष्यात योग्य संधीची वाट बघताय? आर. माधवनचा 'हा' संदेश खास तुमच्यासाठी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 10:35 AM2023-05-18T10:35:42+5:302023-05-18T10:36:14+5:30
व्यवसायाने अभिनेता आणि शिक्षणाने अभियंता असणारा माधवन करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपले अनुभव शेअर करून मार्गदर्शन करतोय-
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. काही जणांना योग्य संधी मिळत नाही तर काही जणांना मिळालेल्या संधीचे सोने करता येत नाही. हे म्हणजे चणे आहेत त्याला दात नाहीत आणि दात आहेत त्याच्याकडे चणे नाहीत, असाच प्रकार झाला, नाही का? मात्र, जेव्हा संधी येते आणि तिचे सोने करण्यासाठी तुम्ही सज्ज असता तेव्हा तुमच्या यशाची कारकीर्द सुरू होते. त्यासाठी कोणत्या गोष्टींवर काम केले पाहिजे, हे आपल्या स्वानुभवातून सांगत आहे अभिनेता आर. माधवन.
एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माधवनने आपल्या पूर्वानुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात तो सांगत होता, 'आयुष्यात संधी येत राहते, मात्र आपण तिचे स्वागत करण्यासाठी सज्ज नसलो तर ती आपली चूक आहे असे समजा. त्यामुळे संधीची वाट बघण्याऐवजी स्वतःला त्या संधीसाठी पूर्ण तयार करा.
मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी अनेक मुलाखती दिल्या. मात्र मला नोकरीपेक्षा अभिनयात रुची आहे हे योग्य वयात कळले होते. त्यामुळे मी दिवस रात्र अभिनेता बनण्याची पूर्ण तयारी केली. दिवसभरातला प्रत्येक क्षण, माझा प्रत्येक श्वास माझ्या स्वप्नपूर्तीच्या ध्यासाने पछाडलेला होता. माझी तयारी सुरु असताना माझे कोल्हापूरचे काही मित्र मला म्हणाले, 'आम्ही चांगले अभियंते झालो, पण आम्हाला मराठी किंवा इंग्रजी अस्खलित बोलता येत नसल्याने आम्ही चांगली संधी येऊनही गमावत आहोत.' माझ्याकडे मुलाखतींचा अनुभव असल्याने आणि भाषेवर चांगले प्रभुत्व असल्याने मी अवघे तीन दिवस माझ्या मित्रांना दिले आणि त्यांना बोलण्याच्या, वागण्याच्या, मुलाखतीच्या बेसिक टिप्स दिल्या. जसे की, मुलाखतीच्या वेळेस पेहराव कसा असायला हवा, हात कसा मिळवावा, आपले मुद्दे कसे मांडावेत, चेहेऱ्यावर आत्मविश्वास कसा असावा, या गोष्टींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि चार वर्षांचे अभियांत्रिकीचे शिक्षण आणि तीन दिवस मी दिलेली ट्रेनिंग या जोरावर त्यांनी चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळवला! ते त्यांच्या करिअर मध्ये सेट झाले आणि मी माझ्या!'
सांगण्याचा मुद्दा हा, की जे क्षेत्र तुम्हाला खुणावत आहे त्याचा पूर्ण विचार करा आणि त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या. त्या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक छोटी छोटी गोष्टसुद्धा तुम्ही आत्मसात केलेली असली पाहिजे. हॉटेल एटीकेट्स पासून वर्क एटीकेट्सपर्यंत सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत त्या वेळोवेळी शिकून घेतल्या पाहिजेत. काळाबरोबर अपडेट राहणं हाच यशस्वी होण्याचा कानमंत्र आहे. अन्यथा तुम्ही चार चौघांसारखे आयुष्य जगाल. मात्र स्वतःला सिद्ध करण्याची धडपड तुमच्या अंगात असेल तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातले बारकावे समजून घ्यायलाच हवे. व्यक्तिमत्त्व विकासावर काम केले पाहिजे. संभाषण कौशल्य आत्मसात केले पाहिजे. एवढी मेहनत केल्यावर तुम्हाला अपेक्षित असलेली संधी समोरून चालून येईल आणि तुम्ही त्या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज असाल!
त्यामुळे अजिबात हार मानू नका, प्रत्येक दिवस नवीन काही शिकण्याची संधी आहे असे समजा आणि स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनण्याची चढाओढ सुरू ठेवा. असा ध्यास घेतलात, तर आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करण्याची हिंमत ठेवू शकता!