कुरुक्षेत्रावर निःशस्त्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने 'हा' प्रश्न विचारून निरुत्तर केले, तो प्रश्न होता...
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 9, 2021 04:12 PM2021-03-09T16:12:12+5:302021-03-09T16:13:47+5:30
आपण समस्येचा फक्त एका दिशेने विचार करतो. समस्येची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला काय जमणार नाहीपेक्षा काय जमू शकेल, याचा विचार करा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या.
शाळेत असताना बीजगणितातला शेवटचा 'ड' गट आठवतोय? अभ्यासात सामान्य असणारी मुले 'क' गटापर्यंत पोहोचण्यात धन्यता मानत आणि 'ड' गट आपल्या बुद्धीला पेलावणारा नाहीच, असे म्हणत त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत. खरे पाहता, 'ड' गट उर्वरित तीन गटांपैकी एका झटक्यात भरघोस मार्कांचे दान पदरात टाकणारा असे. पण त्याचा आपण कधी प्रयत्नच करून पाहिला नाही. आयुष्यात असे अस्पर्शित कितीतरी `ड' गटातले प्रश्न आपण न वाचता ऑप्शनला टाकून दिलेले असतात. एकदा त्या प्रश्नांना हाताळून तरी पाहूया.
तुम्ही म्हणाल, आज जागतिक किंवा भारतीय गणित दिवस नाही, मग गणिताच्या त्या कटू आठवणी कशाला? उद्देश हाच, की आठवणी कटू नव्हत्या, आपण प्रयत्नच न केल्यामुळे त्या कटू बनत गेल्या. हीच बाब प्रत्येक समस्येबाबत घडते. प्रयत्न न करताच हार पत्करली तर तो प्रश्न नेमका किती मोठा होता हे कळणार कधी?
ही अवस्था आपलीच नाही, तर खुद्द अर्जुनाची सुद्धा झाली होती. एवढा मोठा धनुर्धर अर्जून कुरुक्षेत्रावर प्रतिस्पर्ध्यांना पाहून, आपल्या हातून त्यांची हत्या नको, या विचाराने गर्भगळीत होतो आणि शस्त्रे खाली टाकतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला भ्रमातून जागे करतात व त्याला खोचक प्रश्न विचारतात,
हतो वा प्राप्यसि स्वर्गं, जित्वा वा भोक्षसे महिम,
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय:।।
तू जिंकणारेस हे तुला कोणी सांगितले? या युद्धात तू हरू शकतोस, मृत्यूमुखीदेखील पडू शकतोस, तू तुझे काम प्रामाणिकपणाने करणे, एवढेच अपेक्षित आहे. या युद्धात मेलास, तर तुला वीरमरण येऊन स्वर्गप्राप्ती होईल. जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. परंतु असा भ्याडासारखा युद्ध सोडून गेलास, तर स्वत:च्या नजरेतून कायमचा उतरशील. तसे रोजचे मरण पत्करण्यापेक्षा युद्ध करून परिस्थितीवर निकाल सोपव.
कवी मनोहर कवीश्वर यांच्या गीतातील श्रीकृष्णसुद्धा हेच सांगतो,
कर्मफलाते अर्पून मजला, सोड अहंता वृथा,
सर्व धर्म परी त्यजूनि येई, शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून परमार्था।।
हा संदेश फक्त अर्जुनाला नाही, तर आपणा सर्वांना आहे. आपण समस्येचा फक्त एका दिशेने विचार करतो. समस्येची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला काय जमणार नाहीपेक्षा काय जमू शकेल, याचा विचार करा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या. मग तो प्रश्न अ गटातला असो नाहीतर ड गटातला!