Art Of Life: सहलीला जाताना आनंद होतो, पण ऑफिसला जाताना नाही, असे का? शोधूया त्यातले गमक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:57 IST2025-01-16T14:56:26+5:302025-01-16T14:57:30+5:30
Art Of Life: सहलीचे नियोजन झाले की सहलीआधीच जाण्याचे वेध लागतात, पण ऑफिसला गेल्यापासून ऑफिस सुटण्याचे वेध लागतात, यात बदल कसा करता येईल? पहा!

Art Of Life: सहलीला जाताना आनंद होतो, पण ऑफिसला जाताना नाही, असे का? शोधूया त्यातले गमक!
रोजचे ऑफिस, रोजची शाळा, रोजचे काम यातून आपल्याला ब्रेक हवा असतो, त्यामुळे आपण कधी घरच्यांबरोबर तर कधी मित्रमैत्रिणींबरोबर तर कधी सोलो ट्रिपला जातो आणि मोकळेपणाची भरपूर ऊर्जा साठवून पुढच्या ब्रेकची वाट बघू लागतो. पण आपले रोजचेच जगणे उत्साहाचे बनवता आले तर? सहलीचा आनंद एक दिवसापुरता न राहता तो रोज उपभोगता येईल. पण कसा? ते जाणून घेण्यासाठी वाचा ही गोष्ट!
एकदा एक यात्री प्रवासाला निघाला होता. वाटेत एक घर पाहून तो काही काळ विश्रांतीसाठी थांबला. घरात एक साधू राहत होते. मात्र घर, संसाराच्या काहीच खुणा त्या घरात दिसत नव्हत्या. निदान एखादा पलंग, उशी, चादरी तरी! त्या यात्रीने साधू बाबांना विचारले, 'बाबा, तुम्ही नक्की या घरात राहता ना? मग तुमचे सामान कुठे?'
त्याला उत्तर देण्याऐवजी साधू बाबा त्याला म्हणाले, 'माझे सोड तुझा पलंग, उशी, चादर कुठे?'
तो यात्री हसून म्हणाला, 'बाबा, मी एक यात्री आहे, यात्रेत जेवढे सामान कमी तेवढा यात्रेचा आनंद जास्त!'
साधू बाबा म्हणाले, 'मी सुद्धा एक यात्रीच आहे, जेवढे सामान कमी तेवढा आनंद जास्त!"
या गोष्टीवरून लक्षात येते, की जगण्यासाठी पूरक गोष्टी मिळाल्या तरी त्यात आपण समाधानी राहू शकतो, अति सामान असो नाहीतर अति विचार असो ते ओझे आपल्याला मानवत नाही, म्हणून प्रवासापेक्षा जास्त थकवा त्या ओझ्यामुळे आपल्याला येतो.
सहलीला जाताना शेकडो छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला न्याव्याशा वाटतात, मात्र बॅग जड होऊ लागली आणि ती आपल्यालाच पाठीवर उचलून प्रवास करायचा आहे याची कल्पना आल्यावर आपण त्याच आवश्यक गोष्टीतून अनावश्यक किंवा पुढच्या वाटेवर मिळू शकतील अशा गोष्टींचे ओझे कमी करतो आणि सुटसुटीत बॅग पॅकिंग करतो.
रोजची ऑफिस बॅग सहलीच्या बॅगेच्या तुलनेत हलकी असते, पण सहलीला जाताना मनावरचे ओझे कमी असल्याने पाठीवरचे ओझे जड वाटत नाही. याउलट ऑफिसला जाताना पाठीवर कमी आणि मनावर विचारांचे ओझे लादून घेतलेले असते.
अति विचार किंवा अति काळजी हे विनाकारण मनावर घेतलेले ओझे आहे. ठराविक मर्यादेपर्यंत आपण ते ओझे पेलू शकतो. मात्र ज्या क्षणी आपण ते ओझे उतरवायला शिकतो, तिथून आपला प्रवास सोपा आणि आनंददायी होतो.
त्यामुळे नोकरी असो नाहीतर शाळा, कॉलेज किंवा घरकाम, मनावर ओझे बाळगून ते करायचे नाही तर आनंदाने करायचे. रोज नवे काही शिकायचे. आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधायच्या. एकदा का ही कला अवगत झाली की आपले रोजचे जगणे सहलीसारखे उत्साहवर्धक झालेच म्हणून समजा!