सकाळी झोपेतून डोळे उघडताच मोबाईल हाती घेण्याआधी 'या' दोन गोष्टी आवर्जून करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:00 AM2022-05-21T07:00:00+5:302022-05-21T07:00:02+5:30
दिवस चांगला जावा म्हणून आपण दिवसभर कितीतरी धडपड करतो, यासाठीच दिवसाची सुरुवात पुढील दोन गोष्टींनी करा!
सद्यस्थितीत आपल्या दिवसाची सुरुवात एक तर अलार्म बंद करण्याने नाहीतर मोबाईलचे मेसेज बघण्याने होते. मात्र यशस्वी लोकांना विचाराल, तर ते कधीही दिवसाची सुरुवात मोबाईलने करत नाहीत, तर ते दिवसाची सुरुवात करतात सकारात्मक गोष्टींनी! तुम्हाला खोटे वाटू शकेल, परंतु सकारात्मक बोलण्याचा किंवा विचारांचा आपल्या संपूर्ण दिवसावर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून दिवसाच्या सुरुवातील संस्कृतीने सांगितलेल्या दोन गोष्टी आवर्जून करा.
सकाळी झोपून उठल्यावर काही क्षण अंथरुणावर शांत बसून राहा. झोपेतून जागे झाल्यावर डोळे न उघडता मनातल्या मनात दोन ओळींचे दोन श्लोक म्हणा. त्या श्लोकांचा अर्थ जाणून घेतल्यावर त्यांचे महत्त्व कळून तुम्ही आपसुख ते मुखोद्गत कराल. सलग २१ दिवस तसे करण्याची सवय लावून घ्या, म्हणजे त्यानंतर प्रयत्नपूर्वक या गोष्टी तुमच्याही नकळत घडतील.
मागच्या लेखात आपण झोपण्यापूर्वी म्हणण्याचा श्लोक दिला होता, या लेखात सकाळी उठल्यावर म्हणण्याचा श्लोक देत आहोत. यालाच इंग्रजीत पॉझिटिव्ह अफ़र्मेंशन्स असे म्हणतात. याबाबत वैदिक काळापासून आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे, त्याचा आपण लाभ घेऊया-
धार्मिक ग्रंथानुसार, सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने अंथरुण सोडण्यापूर्वी हात पाहावेत. यासोबतच या मंत्राचा जप केल्यास त्या व्यक्तीला दिवसभर प्रत्येक कामात यश मिळत राहते.
'कराग्रे वसति लक्ष्मीः, कर मध्ये सरस्वती।
करमूले तू ब्रह्मा, प्रभाते कर दर्शनम्।'
मंत्राचा अर्थ- तळहातांच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि बोटांच्या पेरांवर परब्रह्माचा वास असल्याचे मंत्रात सांगितले आहे. मंत्र म्हणण्याचा उद्देश आहे- हे भगवंत, सकाळी तुला पाहिल्यानंतर मी तुला नमस्कार करतो. माझा नमस्कार स्वीकारा आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव करत माझ्या कामांना यश द्या.
'सर्वाबाधाविनिर्मुक्तो धनधान्यसुतान्वित:
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यतिं न संशय:'
या मंत्राचा अर्थ- हे पृथ्वी माते, मी तुला स्पर्श करून नमस्कार करतो. हे मातृभूमी तुझा आशीर्वाद मिळाल्याने व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट नष्ट होतात.तसेच धन,धान्य आणि पुत्रप्राप्ती होते. हाच आशीर्वाद मलाही मिळू दे आणि माझ्या प्रयत्नपूर्वक कष्टांनी आजच्या दिवसाचे सोने होऊ दे!