Ashadhi Ekadashi 2021 : संतलिखित नसला, तरीही 'या' अभंगाची गोडी आजही कायम आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:19 PM2021-06-28T19:19:58+5:302021-06-28T19:20:24+5:30
Ashadhi Ekadashi 2021: हा विठोबा जसा संतांना सुखावतो, तसा प्रत्येक भक्ताला आनंदाच्या डोहात तरंगत ठेवतो.
संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांच्या पंक्तीतला एक वाटावा असा अभंग म्हणजे 'कानडा राजा पंढरीचा.' या काव्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ते केवळ गीत न राहता त्याला आपसुखच अभंगत्व प्राप्त झाले आहे आणि त्याची रचना केली आहे, ग. दि. माडगूळकर यांनी!
गदिमा यांचे शब्द, सुधीर फडके यांचे संगीत आणि वसंतराव देशपांडे यांचा स्वर प्राप्त झाल्याने हा अभंग अजरामर झाला आहे. प्रत्येक गाण्याच्या बैठकीत भक्तिरंगाचा सूर आळवताना गायकांना या अभंगाची मोहिनी पडतेच. म्हणूनच या अभंगाने वसंतराव देशपांडेंपासून राहूल देशपांडेंपर्यंतचा तीन पिढ्यांचा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. एवढेच नाही, तर पुढच्या पिढीच्याही ओठी हा अभंग सहज रुळला आहे.
मालकंस रागातला हा अभंग मूळ षड्जापासून सुरू होत वरच्या षड्जावर पोहोचून पांडुरंगाच्या गजराने वातावरण भक्तिमय करून टाकतो. आलाप-ताना न घेताही केवळ आहे तसा अभंग म्हटला, तरी अभंगाची गोडी तसूभरही कमी होत नाही. याबाबतीत संगीततज्ञ डॉ. अशोक रानडे यांचे विधान आठवते. ते म्हणत, 'काही अभंग हे गायकीसाठी नसून केवळ भक्तिभाव जागृत करण्यासाठी असतात. ते तेवढ्याच मर्यादेत गायले पाहिजेत, तरच त्याचे माधुर्य टिकून राहते.' हा अभंगसुद्धा त्याच यादीतला म्हणता येईल.
कानडा राजा पंढरीचा,
वेदांनाही नाही कळला, अंतपार याचा ।
कानडा अर्थात निर्गुण निराकार देव, जो अखिल सृष्टीचा पिता आहे, तोच पंढरीचा राजा आहे. त्याचे अस्तित्त्व अमर्याद आहे. त्याचा थांग प्राचीन साहित्यकृती म्हटल्या जाणाऱ्या वेदांनाही लागत नाही, एवढा तो अथांग आहे. त्याला आदि नाही आणि अंतदेखील नाही, असा तो अंतपार आहे.
निराकार तो निर्गुण ईश्वर,
कसा प्रकटला, असा विटेवर,
उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा।।
हा पंढरीचा राजा मुळात निराकार आहे. भक्त त्याला ज्या रूपात पाहतात, त्यांना तो तसा दिसतो. पंढरपुरातला पांडुरंगसुद्धा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि सगुण रूपात आपले चैतन्य दशदिशांना पसरवित आहे.
परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा।।
भक्तांच्या भोळ्या भक्तीला भुलून त्याने त्यांची आज्ञा नेहमी शिरसावंद्य मानली आहे. पंढरपुरात पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले पांडुरंग, पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न असताना केवळ त्याच्या 'थांब' सांगण्यावरून मौन धरून २८ युगे ताटकळत उभे आहेत. भीमा काठी वसलेले पंढरपूर पांडुरंग आणि त्याच्या भक्तांच्या कथांनी ओळखले जाते. त्याची साक्ष पटवून देण्यासाठी पांडुरंगाने हे समूर्त रूप घेतले आहे.
हा नाम्याची खीर चाखतो,
चोखोबाची गुरे राखतो,
पुरांदारांचा हा परमात्मा, वाली दामाजींचा।।
देव भावाचा भुकेला आहे. तो भक्तांसाठी पडेल ते काम करतो. त्यांच्या मदतीला धावूनही जातो. त्याने संत नामदेवांच्या हातून खीर खाल्ली आहे, संत गोरोबा काकांची गुरे राखली आहेत, तो कर्नाटकातल्या पुरंदरदास स्वामींच्या हृदयातही राहतो आणि प्रसंगी संत दामाजीपंतांसारख्या भक्ताच्या आर्थिक अडचणीत त्यांचा सेवक बनून चाकरीही करतो. असा हा विठोबा जसा संतांना सुखावतो, तसा प्रत्येक भक्ताला आनंदाच्या डोहात तरंगत ठेवतो.