Ashadhi Ekadashi 2021 : लोकमान्य टिळक यांनी घेतलेला वारीचा अनुभव आणि वारकऱ्यांबरोबरचे काही भावुक क्षण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 01:02 PM2021-07-20T13:02:12+5:302021-07-20T13:02:53+5:30
Ashadhi Ekadashi 2021 : एका वर्षी देहू-आळंदीच्या पालख्या पुण्यात पोहोचल्या तेव्हा त्या पालख्यांबरोबर टिळक स्वत: पुण्यातून हिंडले. वारकऱ्यांचा तसा हट्ट होता. त्या वेळी जागोजागी टिळकांचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला.
२३ जुलै रोजी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती आहे. त्यांच्याबद्दल आपण आजवर बरेच काही ऐकले वाचले आहे. आज त्यांच्या आवडीबद्दल जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या शब्दात.
'मला कीर्तन फार आवडते. स्वार्थ आणि परमार्थ साधण्यास अगदी जवळचा मार्ग म्हणजे कीर्तन. हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे.' हे बोल आहेत लोकमान्य टिळकांचे. आपण राजकारणात गुंतलो नसतो तर नक्की कीर्तनकार झालो असतो, असे ते नेहमी सांगत असत. भिंगारकरबुवा, जोग महाराज अगदी अनेक वारकरी कीर्तनकार मंडळींशी टिळकांचा स्नेहसंबंध होता. त्यांना कुठलीही मदत करण्यासाठी टिळक नेहमीच तत्पर असत. एरव्ही गाण्याचा कंटाळा असलेले टिळक कीर्तनाला मात्र आवर्जून उपस्थित राहत.
एका वर्षी देहू-आळंदीच्या पालख्या पुण्यात पोहोचल्या तेव्हा त्या पालख्यांबरोबर टिळक स्वत: पुण्यातून हिंडले. वारकऱ्यांचा तसा हट्ट होता. त्या वेळी जागोजागी टिळकांचा हारतुऱ्यांनी सत्कार करण्यात आला.
१९०६ मध्ये पंढरपुरात स्वदेशीचे प्रदर्शन वारीच्या वेळीच आयोजित करण्यात आले होते. गोपाळराव गोखले हे त्या प्रदर्शनाचे उद्घाटक होते. सभेच्या ठिकाणी श्रीमंत मिरजकर आणि नामदार गोखले या दोघांसाठी खुर्ची ठेवली होती. त्याप्रमाणे ते दोघे खुर्चीवर बसले. तर त्यांच्यासोर खाली जमिनीवर श्रोत्यांमध्ये टिळक बसले होते. ते पाहून लगबगीने तिसरी खुर्ची आणण्यात आली. परंतु टिळक खुर्चीवर बसले नाहीत. ते म्हणाले, `पांडुरंगाच्या दर्शनास आम्ही आलो असल्यामुळे यात्रेत आलेल्या वारकऱ्यांमध्ये माझे स्थान असणे आवश्यक आहे.'
याच पंढरपूर भेटीत जोग महाराजांबरोबर त्यांनी इतरांचे पाहून न चुकता अगदी सराव असल्यासारखे चंद्रभागेत डुबक्या मारून स्नान केले. कपाळी गोपिचंदन लावले. देवदर्शन घेतले. गरुडखांबाला मिठी मारली. एवढेच नाही तर जोग महाराजांनी तिथल्या कुर्मपृष्ठावर नाचून स्वत:चे कान उपटले. ते पाहून निमूटपणे टिळकांनीही कुर्मपृष्ठावर नाचून स्वत:चे कान उपटले. तक्रारीच्या सूरात जोग महाराजांना म्हणाले, `स्वत:चेच कान काय उपटायचे, त्यापेक्षा दुसऱ्याचे कान उपटायची विद्या असेल तर शिकवा!' त्यावर जोग महाराज म्हणाले, `देवासमोर स्वत:चे कान उपटले, मग दुसऱ्याचे कान उपटण्याचे सामर्थ्य आपोआपच येते.'
एका वृद्धाने टिळकांना वाकून नस्कार केला. तेव्हा टिळक संकोचले. ते वारकऱ्याला म्हणाले, `हे काय, मला कसला नमस्कार करता? नमस्कार वडिलधाऱ्यांना आणि पांडुरंगाला करावा.' तेव्हा वृद्ध गहिवरून म्हणाला, `शिवाजीराजाने आमची शेंडी शाबूत राखली. तोच स्वाभिमान टिकून राहू शकला तो तुमच्यामुळे. तुम्हीच आमचे पांडुरंग' हे ऐकून टिळक निरुत्तर झाले....!