Ashadhi Ekadashi 2022: १० जुलैपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात लग्न-मुंज यांसारखी शुभकार्ये का केली जात नाहीत? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:36 AM2022-07-06T11:36:02+5:302022-07-06T11:36:43+5:30
Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असणार आहे. तो संपल्यानंतर शुभकार्याची सुरुवात करण्यामागे नेमके काय कारण असावे? जाणून घ्या!
'चातुर्मास' हा कालावधी धर्मशास्त्रदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणला जातो. केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आरोग्य, विज्ञान, अध्यात्म, संस्कृती, सामाजिक वातावरण इत्यादी सर्वचदृष्ट्या तो अत्यंत महत्त्वाचा समजण्यात येतो. विशेष म्हणजे या काळात काही गोष्टी अवश्य पाळाव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असे सांगितले आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी व प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य आहे.
चातुर्मासाचा आरंभ आषाढी एकादशीस होऊन समाप्ती कार्तिक द्वादशीस होते. भौगालिकदृष्ट्या हा कालावधी बराच लक्षणीय स्थित्यंतराचा असतो. कारण पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप जसे बदललेले असते तसेच मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इ. खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.
पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात आहे. रुपकात्मकदृष्ट्या ब्रह्मदेवाचे नवसृष्टीनिर्मितीचे कार्य जोमाने चालू असते, तर पालनकर्त्या विष्णूचे कार्य मंदावलेले असते. म्हणूनच चातुर्मासात `विष्णूशयन' म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. म्हणून चातुर्मासाच्या काळात विवाहाचा वा तत्सम अन्य कार्यांचा निषेध सांगितला आहे.
लग्नासारखा आयुष्याला कलाटणी देणारा विधी देवाब्राह्मणाच्या साक्षीने करावा, म्हणून देव विश्रांती घेत असतानाच्या काळात विवाह टाळला जातो. पण विवाहाचा निषेध असला तरी विवाहाची प्राथमिक तयारी, म्हणजे स्थळ पाहणे, प्राथमिक बोलणे करणे, साखरपुडा करणे या गोष्टींना हरकत नसते. त्यामुळे लग्न लांबणीवर गेले याचे दुःख न बाळगता चार महिन्यांनी खुद्द भगवंत दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील हा विचार आणि विश्वास आपण ठेवायला हवा.