Ashadhi Ekadashi 2023: यंदा भगवान विष्णू चार ऐवजी पाच महिने योगनिद्रेत राहणार, त्याबद्दल जाणून घेऊ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 01:16 PM2023-06-28T13:16:54+5:302023-06-28T13:17:17+5:30
Ashadhi Ekadashi 2023: विश्वकार्य अधिक चांगल्या पद्धतीने चालावे यासाठी अथक श्रम करणाऱ्या देवांनाही विश्रांती गरजेची, ही भक्तांची सद्भावना!
यंदा आषाढी एकादशीला जिला आपण देवशयनी एकादशी म्हणतो, ती २९ जून रोजी आहे. इथून पुढे चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला तो संपतो. या चार महिन्यांच्या काळात भगवान विष्णू योगनिद्रा घेतात आणि कार्तिकी एकादशीला झोपेतून जागे होतात, त्याला देवउठनी एकादशी म्हणतात. मात्र यंदा हा कालावधी पाच महिन्यांचा असणार आहे कारण यात अधिक मासाची भर पडली आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.
हिंदू धर्मात एकादशीच्या तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी महिन्यातून दोनदा येते, पण निर्जला, देवशयनी आणि देवोत्थान एकादशी या तिथी फार महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. यावेळी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी गुरुवार, २९ जून २०२३ रोजी येत आहे. याला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरी चार महिने निद्रावस्थेत जातात असे मानले जाते, परंतु यावर्षी अधिकामासामुळे अधिक श्रावण येत आहे. अशा स्थितीत, पाच महिने झोपल्यानंतर, देवोत्थान एकादशी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२३ रोजी देव झोपेतून जागे होतील.
भगवान विष्णू या कालावधीत झोपत असले तर विश्वाचा पसारा कोण सांभाळतो? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचेच उत्तर म्हणजे आपले ३३ कोटी देव. कोटी हे करोड नसून कोटी हे प्रकार या अर्थाने आहेत. भगवान विष्णूंनी या कालावधीत विश्रांती घेतली तरी इतर देव या काळात कार्यरत असतात म्हणून वैश्विक कार्य सुरळीतपणे सुरू असतात. जशी नोकरीत आपण रजा घेतली म्हणून ऑफिस काम थांबत नाही आणि सुटी संपल्यावर आपल्याला आपल्या वाटणीची कामे जशी करावी लागतात, तशीच भगवान विष्णू योगनिद्रा पूर्ण झाल्यावर पुनश्च कामात रुजू होतात. मात्र ते विश्वप्रमुख असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मंगल कार्य करता येत नाहीत. शुभ कार्यात त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सोहळा होतो आणि मग खोळंबलेली लग्न पार पडतात.
केवळ लग्नच नाही तर मुंडण, ग्रहप्रवेश आदी सर्व प्रकारची शुभ कार्ये देखील या कालावधीत केली जात नाहीत. एकादशीपासून पुन्हा देवोत्थान सुरू होते. श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या, ज्यांना शाक भाजी असेही म्हणतात, ते टाळावे.
योगनिद्रेचे महत्त्व
प्राचीन काळापासून गृहस्थ, संत, महात्मा, साधक चातुर्मासाकडे व्रत म्हणून पाहतात. योग, ध्यान यांचे त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान असते, कारण यामुळे सुप्त शक्तींचे पुनर्जागरण होते आणि अक्षय ऊर्जा जमा होते. योगनिद्रेमुळे भगवान विष्णूंनाही ती ऊर्जा प्राप्त होते आणि ते जागृत झाल्यावर अधिक जोमाने विश्वकार्य करण्यासाठी अधिक सक्षम होतात अशी भक्तांची भावना असते.
त्याचे प्रतिपादन हरिशयनी एकादशीपासून चांगले केले जाते. जेव्हा भगवान विष्णू स्वतः योगनिद्राचा आश्रय घेऊन चार महिने ध्यान करतात. देवशयनी एकादशी व्यतिरिक्त आषाढ महिन्यातील शुक्लपक्षातील एकादशीला हरिशयनी किंवा शेषशायनी, पद्मनाभ किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात, कारण श्री हरी यांना या नावांनीही संबोधले जाते.