Ashadhi Ekadashi 2024: आषाढी व्रतामुळे मांधाता राजावर कृपादृष्टी झाली तशी आपल्यावर व्हावी म्हणून करा हे व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:38 AM2024-07-16T09:38:48+5:302024-07-16T09:39:15+5:30

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी हा केवळ उत्सव नाही तर भाग्य पालटणारे व्रत आहे; ते कसे करायचे व त्याची कथा काय ते सविस्तर जाणून घेऊ. 

Ashadhi Ekadashi 2024: Do this fast so that the fast of Ashadhi will bless you like Mandhata King! | Ashadhi Ekadashi 2024: आषाढी व्रतामुळे मांधाता राजावर कृपादृष्टी झाली तशी आपल्यावर व्हावी म्हणून करा हे व्रत!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी व्रतामुळे मांधाता राजावर कृपादृष्टी झाली तशी आपल्यावर व्हावी म्हणून करा हे व्रत!

१७ जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) आहे. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात. भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवतात. यादिवशी विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन तर घ्यायचेच शिवाय घरी देखील शास्त्रोक्त पूजा कशी करायची ते जाणून घेऊ. 

आषाढी एकादशीचे विधी : 

आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपास करावयाचा असतो. विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी. पांडुरंगाची मूर्ती असल्यास पीतांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावे, असा विधी आहे. 

आषाढी एकादशीचे व्रत : 

या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्यागले जाते. काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत. काही मंडळी एकभुक्त राहतात. काही जण नक्तव्रत म्हणजे केवळ रात्रीचे भोजन करतात. या साऱ्या व्रतांना 'गोविंदशयन व्रत' असे एकच नाव आहे. या एकादशीला पद्मा एकादशी असेही एक नाव आहे.

पौराणिक कथा : 

फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी, प्रजेची काळजी घेणारा होता. सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. राजाने हे व्रत मनोभावे केले. त्यायोगे वरुणराजाने कृपा केली. योग्यवेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली. मांधात्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धीचे, आनंदाचे दिवस प्राप्त झाले. 

मांधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली, तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आनंदाने, समाधानाने न्हाऊन टाकावे अशी प्रार्थना करूया. 

Web Title: Ashadhi Ekadashi 2024: Do this fast so that the fast of Ashadhi will bless you like Mandhata King!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.