Ashadhi Ekadashi 2024: पंढरपूरचा विठोबा 'अठ्ठावीस युगं' तिथे उभा आहे हे कसे ओळखायचे? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 07:00 AM2024-07-17T07:00:00+5:302024-07-17T07:00:02+5:30

Ashadhi Ekadashi 2024: आज आषाढी एकादशी, त्यानिमित्ताने संत नामदेव महाराजांनी लिहिलेल्या आरतीचा आशय आणि पांडुरंगाचा अठ्ठावीस युगांचा मुक्काम याबद्दल जाणून घेऊ!

Ashadhi Ekadashi 2024: How to recognize that Vithoba of Pandharpur is standing there for 'twenty-eight yugas'? Read on! | Ashadhi Ekadashi 2024: पंढरपूरचा विठोबा 'अठ्ठावीस युगं' तिथे उभा आहे हे कसे ओळखायचे? वाचा!

Ashadhi Ekadashi 2024: पंढरपूरचा विठोबा 'अठ्ठावीस युगं' तिथे उभा आहे हे कसे ओळखायचे? वाचा!

विठोबाची आरती म्हणताना पंढरपूरची पुण्यभूमी आपल्या डोळ्यासमोर येते आणि सोबतच येते, भक्त भगवंताच्या परस्परावरील निस्सीम प्रेमाची कथा. आरतीच्या सुरुवातीलाच इतिहास सांगितला आहे. हा इतिहास आहे विठोबाच्या पंढरपुरातील मुक्कामाचा! एक दोन नाही तर अठ्ठावीस युगे तो भक्तांच्या भेटीसाठी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. 

सुमारे २८ युगापूर्वी  श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारेकेतून दिंडीर वनात आले होते, त्याचवेळी भगवंतांना भक्त पुंडलिकांची आठवण झाली. ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले, तेव्हा भक्त पुंडलिक पाठमोरे बसून आई-वडिलांची सेवा करीत होते. भगवंताचे तेज दाही दिशांना पसरले, भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांचे दारी उभे होते, श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, 'सख्या पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे. 

श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला. देवाच्या स्वागताला उठले तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय आला असता आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटला असता. म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाट देता येणार नाही म्हणून जवळच असलेली वीट देवापुढे भिरकावत म्हटले, देवा काही काळ या विटेवर उभा राहा. आई वडिलांची सेवा पूर्ण करून आलोच.'

आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पायांना आलिंगन देत म्हटले, 'देवा, माझ्यामुळे तुला ताटकळत उभं राहावं लागलं ना? माझं चुकलं, मला क्षमा कर!'

श्रीकृष्ण म्हणाले, 'पुंडलिका आई वडिलांची सेवा ही ईश्वरसेवेपेक्षा मोठी असते. ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागावलो असतो. पण तुझ्या मातृ-पितृ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझा आदर्श पुढील पिढयांसमोर सदैव राहावा, यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील.' 

भक्ताच्या आग्रहास्तव भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला आणि भक्त पुंडलिकालादेखील मंदिराच्या वाटेवर नावासकट सन्मान मिळाला. याचे सुंदर वर्णन आरतीत केले आहे, 

'पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा!' 

पण अठ्ठावीस युगंच का?

देशपांडे पंचांगचे देशपांडे गुरुजी सांगतात, 'त्यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे. सृष्टी उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या वर्षांची गणना धर्मशास्त्रात तसेच ज्योतिष शास्त्रात केली आहे. यात चार युगं आहेत- कृत, त्रेता, द्वापार, कली! ही सगळी मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षं होतात. त्याला एक महायुग असे म्हटले जाते. आरती मध्ये अठ्ठावीस युगाचा उल्लेख केला आहे, ती महायुग आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अठ्ठावीस वेळा ही चार युगं फिरली आहेत. त्यातल्या श्वेतवाराह कल्पातलं सातवा मन्वंतर सुरु आहे. त्यातली अठ्ठावसावी चतुर्युगी आहे. थोडक्यात अनादिकालापासून हा पंढरीनाथ पंढरपुरात उभा आहे असे नामदेव महाराजांना सुचवायचे आहे. आजच्या पावन दिनी आपणही ती आरती म्हणूया आणि पुंडलिकाप्रमाणे आई वडिलांची सेवा करत विठ्ठलमय होऊया. 

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।। धृ० ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ० ।।

Web Title: Ashadhi Ekadashi 2024: How to recognize that Vithoba of Pandharpur is standing there for 'twenty-eight yugas'? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.