आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या, व्रताचे महात्म्य, तिथीचे महत्त्व अन् काही मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:03 PM2024-06-24T15:03:00+5:302024-06-24T15:03:00+5:30
Devshayani Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. भारतीय परंपरेत देवशयनी एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य विशेष आहे. जाणून घ्या...
Devshayani Ashadhi Ekadashi 2024: प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिद्धी आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादशी येतात. उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हा या दिवसाचा विशेष आहे. वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा झाली की, सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस महाएकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी असे नाव पडले.
वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे. लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे. एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे शास्त्र सांगते. आषाढी एकादशीस चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात.
पंढरपूरची वारी
वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले, अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर. कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांना दरवर्षीची शिरस्ता. राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस ठिकठिकाणाहून निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात. 'बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥' या अभंगाची प्रचीती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो. पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे. त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते. अशा भगवद्भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो.
यंदा कधी आहे देवशयनी आषाढी एकादशी
सन २०२४ मध्ये बुधवार, १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत: विठ्ठलाची पूजा करतात. पांडुरंगाच्या ठायी विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात. अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहानथोर सहभागी होतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलभक्तीचा तर नुसता सुकाळ असतो. विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जिवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र, कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते. कार्तिक महिन्यात देवकार्ये सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते.