Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात विष्णूंची 'ही' सोळा नावं, करतील तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 01:40 PM2024-07-16T13:40:08+5:302024-07-16T13:40:33+5:30
Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात केलेली संकल्पपूर्ती अनेक प्रकारचे लाभ मिळवून देते; त्यासाठी हा सोपा उपाय सलग चार महिने सकाळी अवश्य करा!
यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होत आहे, तो कार्तिकी एकादशीला समाप्त होईल. चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रघात आहे. कारण संकल्पपूर्तीसाठी थोडा थोडका नाही तर चार महिन्यांचा कालावधी मिळतो. यात पुण्यसंचय व्हावा या हेतूने दान, धर्म, उपासना केली जाते. चातुर्मासात विष्णुसहस्त्रनाम रोज म्हटल्याने वा ऐकल्याने पुष्कळ लाभ होतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. परंतु अनेकांना तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही. कारण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला पाऊण तास आणि ऐकायला अर्धा तास तरी लागतोच. अशा वेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही. त्यावर सुंदर पर्याय म्हणजे विष्णू षोडश नाम स्तोत्र! या स्तोत्राचा भावार्थ एकदा वाचलात तरी स्तोत्र महात्म्य लक्षात येईल! विष्णूसहस्त्र नामावलीत विष्णूंची १००० नावे आहेत, ती घेता आली नाहीत तर निदान पुढील स्तोत्रात दिलेली सोळा नावं आवर्जून रोज म्हणावीत! कारण, विष्णू षोडशनाम स्तोत्र विष्णू सहस्त्र नामाइतकेच प्रभावी आहे आणि संकटमुक्त करून सर्व सुखाची प्राप्ती करून देणारे आहे; सविस्तर वाचा!
औषधे चिंतये विष्णुम भोजने च जनार्धनम,
शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम,
युद्धे चक्रधरम देवं प्रवासे च त्रिविक्रमं,
नारायणं तनु त्यागे श्रीधरं प्रिय संगमे,
दुःस्वप्ने स्मर गोविन्दम संकटे मधुसूधनम,
कानने नारासिम्हम च पावके जलाशयिनाम,
जलमध्ये वराहम च पर्वते रघु नन्दनं,
गमने वामनं चैव सर्व कार्येशु माधवं।
षोडशैतानी नमानी प्रातरुत्थाय यह पठेत,
सर्वपापा विर्निमुक्तो विष्णुलोके महीयते।
अर्थ : शरीर आजारी असताना, औषध घेताना भगवान विष्णूचे ध्यान करावे, अन्न खाताना त्यांच्या जनार्दन रूपाचे ध्यान करावे, झोपताना त्यांच्या पद्मनाभ रूपाचे ध्यान करावे, विवाहाच्या वेळी त्यांच्या प्रजापती रूपाचे ध्यान करावे, युद्धाला जाताना, त्याच्या चक्रधारी स्वरूपाचे ध्यान करावे, प्रवास करताना त्यांच्या त्रिविक्रम स्वरूपाचे ध्यान करावे. मृत्यूसमयी त्यांच्या नारायण रूपाचे ध्यान करावे, संसारसुखाच्या वेळी त्यांच्या श्रीधर रूपाचे ध्यान करावे, दुःस्वप्नांच्या वेळी त्यांच्या गोविंद रूपाचे ध्यान करावे आणि संकटसमयी त्यांच्या मधुसूदन रूपाचे ध्यान करावे. वादळाच्या वेळी त्याच्या नरसिंह रूपाचे ध्यान करावे, आगीच्या वेळी समुद्रात त्याच्या निद्रिस्त रूपाचे ध्यान करावे, पाण्यात अडकल्यावर त्याच्या वराह स्वरूपाचे ध्यान करावे, पर्वत आणि जंगलात, भटकताना त्याच्या रघुनंदन रूपाचे ध्यान करावे. जर तुम्ही त्यांच्या वामन स्वरूपाचे ध्यान केले तर सर्व कार्य करताना त्यांच्या माधव स्वरूपाचे ध्यान करावे.
जे भक्त सकाळी उठून या सोळा नामांचा उच्चार करतात, त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णूच्या जगात स्थान मिळते. असा या स्तोत्र पठणाचा महिमा आहे.
त्यामुळे यंदा चातुर्मासात दर दिवशी सकाळी न चुकता हे छोटंसं स्तोत्र म्हणा आणि मोठे लाभ अर्थात सर्वांगीण लाभ मिळवा.