Ashadhi Ekadashi 2024: इच्छा असूनही वारीत जाता आले नाही? 'असा' घ्या वारीचा अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 01:17 PM2024-07-01T13:17:12+5:302024-07-01T13:18:37+5:30

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी निमित्ताने गावागावातून पालखी निघत आहेत, त्यात सहभागी व्हावे असेही आपल्याला वाटून जाते; अशा वेळी काय करावे ते वाचा. 

Ashadhi Ekadashi 2024: Wanted to join ashadhi wari? Experience Wari like this! | Ashadhi Ekadashi 2024: इच्छा असूनही वारीत जाता आले नाही? 'असा' घ्या वारीचा अनुभव!

Ashadhi Ekadashi 2024: इच्छा असूनही वारीत जाता आले नाही? 'असा' घ्या वारीचा अनुभव!

>> सर्वेश फडणवीस

"रामकृष्णहरी". वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. गेली साडेसातशेहून जास्त वर्षे  'वारी' अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ज्येष्ठ कृ.अष्टमी या तिथीला अर्थात आज आळंदीहून प्रस्थान ठेवलेली श्रीसंत ज्ञानेश्वर माउलींची  पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे. आज आपणही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाहरीचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जायचे आहे. कारण या परंपरचे, महाराष्ट्र साडेसातशे वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेने चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदाने कोंदून जाते. मैलोगणिक तो नामध्वनी, पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, पाऊस, वारा, वादळ, तहान, भुकेची पर्वा न करता मार्गक्रमण करीत असतात.

कायम वाटतं वारी म्हणजे मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे. 

खरंतर एखादी प्रवाही नदी जशी स्वयंशिस्तीने आपले काठ निर्माण करत जाते तसाच हा वारकऱ्यांचा प्रवाह पंढरीच्या दिशेने वाहताना दिसून येतो. अगदी शिस्तीत चाललेले वारकरी कुठल्याही मर्यादांचे उल्लंघन न करता स्वयंप्रेरणेने चालत असतात. वाटेत रंजल्या-गांजल्यांना मदत करत असतात.  

वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं, वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता, वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास, वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया, वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. "वारी" हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी आहे. 

आज सर्व वारकरी आळंदीला पोहोचले आहेत काही वेळाने आळंदीहुन माउलींच्या समवेत सर्वजण निघणार आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी. चला आपण ही निघूया त्या विठूरायाच्या दर्शनार्थ रामकृष्णहरीचा गजर करीत.

सकल संतांचे लाडके असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमाउली आज पंढरपूर च्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. नगर प्रदक्षिणा करत त्यांचा आजचा मुक्काम आजोळी अर्थात गांधी वाड्यात असणार आहे आणि उद्या सकाळी माउली पुण्याच्या दिशेने  प्रस्थान ठेवतील.

'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' 

Web Title: Ashadhi Ekadashi 2024: Wanted to join ashadhi wari? Experience Wari like this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.