Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी का घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 07:00 AM2024-07-18T07:00:00+5:302024-07-18T07:00:00+5:30

Ashadhi Ekadashi 2024: विठोबा कधीच शिळा होत नसतो की त्याच्याप्रती असलेला भावदेखील शिळा होत नाही, तरी ही प्रथा कशासाठी? वाचा...

Ashadhi Ekadashi 2024: Why do visit Vithoba on the second day of Ashadhi Ekadashi? Read on! | Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी का घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन? वाचा!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी का घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन? वाचा!

शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल, ऐकावं ते नवलंच! पण तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. शिळा विठोबा अशी संकल्पना आपण याआधी क्वचितच ऐकली असेल. पण जेव्हा आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या सान्निध्यात बसतो, तेव्हा अशा अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा होतो. तर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन घेण्याआधी जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल!

आषाढी एकादशीचा दिवस तसा धामधुमीचा! पूर्वी लोक आषाढीचा उत्सव झाला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा विठ्ठल मंदिराच्या दिशेने जाताना दिसत. एवढ्या सकाळी ते तिथे का जात असावेत असा एका आजींना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'ते सगळे शिळ्या विठोबाचे दर्शन घ्यायला निघाले आहेत.' 

वास्तविक विठोबा कधीच नवा, जुना किंवा शिळा होत नसतो. तो कधीही बघा, राजस सुकुमारच दिसतो. मग शिळा विठोबा ही संकल्पना आली कुठून ? तर भोळ्या भक्तांच्या भोळ्या भावातून! भाविक मनुष्य जे जे आपल्याला आवडतं ते देवाला अर्पण करतो. मग ती शिळी भाकरी का असेना. संत देखील याच भोळ्या भावनेने देवाला न्हाऊ, माखू घालत, देवाचा साज शृंगार करत, देवाला नेसायला वस्त्र, झोपायला गादी, लोड, पांघरूण, जेवायला नानाविध पदार्थ असं सारं काही देत असत; नव्हे अर्पण करत असत. 

असाच हा शिळा विठोबा, त्यांच्या मनातला, संकल्पनेतला! जो आषाढीच्या दिवशी भक्तांची भेट घेऊन दमलेला असेल. दुसऱ्या दिवशी उशिरा उठला असेल आणि अशा वेळी त्या थकलेल्या विठोबाचा शीण घालवण्यासाठी त्याला पेलाभर पाणी, दूध, तुळशीची माळ अर्पण करून दर्शन घ्यावं, असा नियम भाविकांनी आखला असेल. म्हणून आषाढीच्या दिवशी विठोबाचे दर्शन तर घेतातच, पण दुसऱ्या दिवशी सकाळी दमलेल्या विठोबाचे अर्थात शिळ्या विठोबाचेही दर्शन घेतात. 

या छोट्याशा कृतीतून मोठा धडा मिळतो, तो म्हणजे माणुसकीचा! आपली संस्कृती केवळ मूर्तिपूजा शिकवत नाही तर मूर्तिपूजेतून माणुसकीची पूजा शिकवते. जशी विठोबाची चौकशी कराल तशी आपल्या माता पित्याची, सगे सोयऱ्यांची, आजूबाजूच्या लोकांची आपुलकीचे चौकशी करा. त्यांना हवं नको ते द्या. मृत्यूनंतर आपल्या नावे दानधर्म करण्याआधी जिवंतपणी शक्य तेवढी मदत करा. एकमेका सहाय्य्य करू, अवघे धरू सुपंथ!

'भोळा भाव आणि देवा मला पाव' असा सच्चा भाव बघून देव का बरे प्रसन्न होणार नाही? आजच्या बेगडी जगात एवढी निरागसता बघायला मिळत नाही. जिथे तिथे फोटो काढून आपल्या भाव भावनांचे प्रगटीकरण करायचे आणि जगाला दाखवायचे असा ट्रेंड आला आहे. मात्र आपली आजी, पणजी कुणी बघावं म्हणून नाही, तर आपल्याला जाऊन देवाला बघता यावं यासाठी देवदर्शन घेत असत. परिणामी देवाचेही त्यांच्याकडे लक्ष असे. आपणही तेवढा निर्मळ भाव आणण्याचा प्रयत्न करूया आणि (आता जमलं नाही तर जमेल तेव्हा) शिळ्या विठोबाचे दर्शन घेऊया. 

Web Title: Ashadhi Ekadashi 2024: Why do visit Vithoba on the second day of Ashadhi Ekadashi? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.