Ashadhi Ekadashi 2024: वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला महाएकादशी का म्हटले जाते? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 01:07 PM2024-07-15T13:07:22+5:302024-07-15T13:07:59+5:30

Ashadhi Ekadashi 2024: १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, इतर एकादशीच्या तुलनेत तिचे एवढे महत्त्व का? ते जाणून घेऊया.

Ashadhi Ekadashi 2024: Why is Ashadhi Ekadashi called Maha Ekadashi out of 24 Ekadashi in the year? Read on! | Ashadhi Ekadashi 2024: वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला महाएकादशी का म्हटले जाते? वाचा!

Ashadhi Ekadashi 2024: वर्षभरातील २४ एकादशींपैकी आषाढी एकादशीला महाएकादशी का म्हटले जाते? वाचा!

दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात, त्यांना वेगवेगळी नावे आहेत. आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले आहे. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात हाीते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते. या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता, महाएकादशी हे नाव सार्थक ठरते. 

भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो. ज्ञानोबा-तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे. 

एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे शास्त्र सांगते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. 
आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील चार महिने वेगवेगळी पूजा, व्रत, पूजा, सण, उत्सव तसेच जपतपादि कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत: विठ्ठलाची पूजा करतात. पांडुरंगाच्या ठायी विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात. भजन, पूजन, कीर्तन, हरीकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहानथोर सहभागी होतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलभक्तीचा तर नुसता सुकाळ असतो. विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जिवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात.

आषाढी एकादशीस चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात. अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, अश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य व्यर्ज्य करतात. काही जण चार महिने एकभुक्त राहतात, तर काही जण सुखशय्या व्यर्ज्य करतात. काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात. नित्य देवदर्शन, कथा कीर्तन, श्रवण, पूजा, अभिषेक, नदीस्नान असे अनेक नेमधर्म आचारण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे. 

Web Title: Ashadhi Ekadashi 2024: Why is Ashadhi Ekadashi called Maha Ekadashi out of 24 Ekadashi in the year? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.