आषाढी वारी : दृश्य-अदृश्याचा बोधप्रपंच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 12:17 PM2024-07-07T12:17:22+5:302024-07-07T12:21:53+5:30
माया नावाची महामाया ही सत्याच्या या तिसऱ्या प्रकारात खेळत राहते आणि सत्याला तात्पुरत्या दृश्यांच्या तालावर सतत नाचवत राहते.
दृश्य आणि अदृश्य यांचा अतिशय सूक्ष्म मेळ या सृष्टीच्या रूपाने जन्माला आलेला आहे. जीव आणि शरीर जसे एकमेकांच्या विरुद्ध जातीचे असूनही एकमेकांना पूरक आहेत, तसेच हे आहे. साधारणपणे सत्याच्या अनुषंगाने तीन ठळक प्रकार पडतात. जे आहे ते सत्य, जे नाही ते असत्य असे दोन प्रकारच आपल्याला जास्त कळत राहतात. यात एक तिसरी अवस्थाही खेळत राहते. ही तिसरी अवस्था ‘तात्पुरते आहे पण नंतर कायमचे नाही’ अशा विचित्र भाषेत खेळत राहते. आपल्या मनाला केवळ ‘आहे आणि नाही’ एवढीच भाषा कळते. त्याला सत्याची तिसरी बाजू मात्र सतत संभ्रमित करत राहते. स्वप्नाला नाही म्हणावे तर ते परिणामासकट असते. भीतीचे स्वप्न प्रत्यक्षात अंथरुण ओले करते, आनंदाचे स्वप्नही खऱ्या ओठांना हसायला भाग पाडते. या स्वप्नांना प्रत्यक्षाची किंमतही देता येत नाही, कारण जागृतीनंतर भासाची केवळ आठवण शिल्लक राहते. माया नावाची महामाया ही सत्याच्या या तिसऱ्या प्रकारात खेळत राहते आणि सत्याला तात्पुरत्या दृश्यांच्या तालावर सतत नाचवत राहते.
हा दृश्यादृश्यातला फरक ज्याच्या बोधावर येतो, तोच मुक्तीच्या मार्गाने सत्याकडे अग्रेसर व्हायला लागतो. सर्वांत आधी तर हे लक्षात घ्यायला हवे की, सत्य हे केवळ दृश्यही नाही आणि नुसतेच अदृश्यही नाही. परिपूर्ण सत्यात दोन्ही विषयांचा समावेश होतो. आता जे दृश्य आहे ते साधनाच्या जागी ठेवावे आणि जे अदृश्य आहे ते साध्याच्या जागी ठेवावे. ‘ध्येय’ आणि ‘ध्येयाकडे जाणारा मार्ग’ यातला फरक सूक्ष्मपणे लक्षात घ्यावा. परिणामी आपल्या लक्षात येईल की, दृश्य जरी ठळकपणे अधोरेखित होत असले तरी त्यातील एक कणही आपल्या हाती येणारा नाही. हाती जरी आला तरी त्याचे लाभणे अंत दर्शवते, अनंत नाही. आंबा काळाचे दुखणे घेऊन जन्माला येत असल्यामुळे कालांतराने त्याचे सडणे अपरिहार्य होऊन बसते. कोयही दृश्याच्याच भाषेत मोडते, पण तिच्यात अनंत झाडे उगवण्याची अदृश्य क्षमता तशीच राहते. इथेही दृश्याच्या अनुषंगाने अदृश्याकडे झेपावणे अत्यंत आवश्यक आहे. दृश्यासारखेच अदृश्यही ‘आहे’मध्ये मोडते तसेच ते अनंताशी नाते सांगणारे असते, हे सत्य मात्र कधीही विसरू नये. जो केवळ दृश्याच्या नादी लागतो, त्याच्या हाती केवळ शरीराचे विज्ञान लागते; अदृश्याच्या नादी लागणारा मात्र आपोआपच शाश्वताची वाट चालायला लागतो.