भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 08:51 AM2024-10-14T08:51:24+5:302024-10-14T08:54:38+5:30
Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024: प्रदोष तिथीली महादेवांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. भौम प्रदोष म्हणजे काय? व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या...
Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024: मराठी वर्षात प्रत्येक महिन्याला काही ना काही व्रताचरण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. व्रत-वैकल्यांची रेलचेल असणारा चातुर्मासाचा काळ सुरू आहे. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता कोजागरी नवान्न पौर्णिमा साजरी होणार आहे. तत्पूर्वी भौम प्रदोष आहे. भौम प्रदोष म्हणजे काय? व्रताचरण कसे करावे? मंगळ दोषावर कसा दिलासा मिळू शकतो? जाणून घेऊया...
प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. मंगळवारी प्रदोष तिथी असेल, तर त्याला भौम प्रदोष म्हटले जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.
मंगळवार, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी भौम प्रदोष आहे. प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
भौम प्रदोष व्रत कसे करावे?
प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे. तसेच यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते.
मंगळ दोषापासून दिलासा, हनुमंतांची करा पूजा
भौम व्रत मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्ती मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच शिवाच्या उपासनेमुळे कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होऊ शकतो, प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, मंगळ दोष असेल आणि त्यासंबंधीचे काही उपाय केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जाते. तसेच मंगळवारी प्रदोष असल्याने या दिवशी महादेवांच्या पूजेसह हनुमानाची पूजा, हनुमंतांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. हनुमंतांची उपासनाही मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव, मंगळ दोष यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.