बुधवारी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी: गणपतीला १ वस्तू अर्पण करा; शुभ-लाभ मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 07:19 AM2023-11-01T07:19:08+5:302023-11-01T07:19:08+5:30
Ashwin Sankashti Chaturthi November 2023: बुधवारी संकष्ट चतुर्थीला बाकी काही करता आले नाही, तरी बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी. असे केल्यास गणेशाची कृपा, व्रताचे पुण्यफल मिळू शकते, असे सांगितले जाते.
Ashwin Sankashti Chaturthi 2023: प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने केले जाते. यातून या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. या व्रताचरणामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, असे मानतात. ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी बुधवारी चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी बाकी काही जमले नाही, तरी गणपती बाप्पाला एक गोष्ट आवर्जुन अर्पण करावी, असे सांगितले जाते.
गणपती बाप्पाच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते. एका चैतन्यमय उर्जेचा संचार होतो. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे. (Significance of Ganpati Bappa Puja on Wednesday)
बुधवारी बाप्पाचा आवडता नैवेद्य करा अर्पण
गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा, असे म्हटले जाते. (Benefits of Budhwar Ganesh Puja)
बुधवारी दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
बुधवारी बाप्पाची पूजा, नामस्मरण लाभदायक
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते.