Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार कुबेर पूजन केले असता पडत नाही धन धान्याचा तुटवडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 04:16 PM2024-08-29T16:16:20+5:302024-08-29T16:16:20+5:30
Astro Tips घरात पैसा येतो पण टिकत नाही,अशी तुमचीही अडचण असेल तर ज्योतिष शास्त्राने सांगितलेला 'हा' उपाय नक्की करा.
कुबेराची मूर्ती किंवा कुबेर प्रतिमा तुमच्या घरावर करेल धनवर्षाव; ज्योतिष शास्त्र सांगते... सगळी सोंगं घेता येतात, पण पैशांचं सोंग घेता येत नाही, असे म्हणतात आणि ते खरे आहे. कारण, जवळपास सगळ्याच विषयांचे, वादाचे मूळ पैसा हेच असते. तो कमी असला तरी ताप आणि जास्त असला तरी ताप! म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' अर्थात चांगल्या मार्गाने येणारा आणि पोटाला पुरेल एवढाच धनसंचय करा, म्हणजे निश्चिन्तपणे जगू शकाल, असे महाराजांना सुचवायचे आहे. पण, काही जणांची समस्या वेगळीच असते. ती म्हणजे पुरेसा पैसा घरात येतो, पण टिकत नाही आणि जो आहे तो वाढतही नाही. याबाबत ज्योतिष शास्त्राने दिलेला तोडगा अवश्य करावा.
वित्तप्राप्तीसाठी आपण जशी लक्ष्मी मातेची पूजा करतो, तशीच धनाची देवता कुबेर यांचीही पूजा करतो. कुबेर महाराज हे कल्याणकारी आहेत. आपल्या घरात आर्थिक समस्यां असतील तर कुबेर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे असे ज्योतिष शास्त्र सांगते. तसेच घरात कुबेर मूर्ती ठेवणेही लाभदायी ठरते. परंतु या गोष्टींची जागासुद्धा ज्योतिष शास्त्र तसेच वास्तुशास्त्र यांच्या नियमानुसार निवडली तर अधिक लाभ होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. त्यांची प्रतिमा घराच्या उत्तर दिशेला लावली तर घरातील पैशांचा संग्रह कायम राहतो. अतिरिक्त पैसा खर्च होत नाही तसेच पैशांचा अपव्यय होत नाही. परंतु आवक वाढवायची असेल तर ज्योतिष शास्त्राने कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा घराच्या पश्चिम दिशेला लावली तर घरात येणारा पैसा दुप्पट होण्यास मदत मिळते. अर्थातच उत्पन्नाची साधने वाढतात. आवक वाढते आणि घरात पैशांचे प्रमाण वाढते.
पश्चिम दिशा ही येणाऱ्या गोष्टी द्विगुणित करणारी दिशा मानली जाते. म्हणून या दिशेने उभे राहिले असता, नकारात्मक विचार करू नये, अन्यथा नकारात्मकता देखील दुप्पट होईल. म्हणून आपल्या वास्तूमध्ये कायम चांगल्या विचारांची देवाण घेवाण कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
याबोरबरच कुबेर महाराजांचा एक मंत्र रोज सायंकाळी १०८ वेळा म्हणावा, त्यामुळेदेखील कुबेर महाराजांची कृपा आपल्यावर राहते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. तो मंत्र पुढीलप्रमाणे -
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
हा मंत्र म्हणण्यापूर्वी अंघोळ करून किंवा हात पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा यासमोर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी. जप माळ घेऊन वरील जप श्रद्धापूर्वक करावा, त्यामुळे निश्चितच लाभ होतो, असे ज्योतिष जाणकार सांगतात.