Astro Tips: शनीचा अस्त, उदय या घटनांचा मानवी जीवनावर परिणाम होणारच; पण उपाय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:14 IST2025-03-22T12:13:45+5:302025-03-22T12:14:06+5:30

Astro Tips: मीन राशीत शनी गोचर होत असल्याने सोशल मीडियावर माहितीचा महापूर आला आहे, त्यानिमित्ताने अभ्यासकांनी दिली शास्त्रशुद्ध माहिती!

Astro Tips: The events of Saturn's setting and rising will definitely affect human life; but what is the solution? | Astro Tips: शनीचा अस्त, उदय या घटनांचा मानवी जीवनावर परिणाम होणारच; पण उपाय काय?

Astro Tips: शनीचा अस्त, उदय या घटनांचा मानवी जीवनावर परिणाम होणारच; पण उपाय काय?

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

गेले कित्येक दिवस सोशल मिडीयावर शनी बदल आणि मीन राशीतील युतीत येणाऱ्या ग्रहांच्या पोस्टचा जणू महापूर आलेला आहे. अहो ग्रह तारे आहेत ते, राशी नक्षत्र बदलत राहणारच, त्यात काय? ग्रह बदलला, राशी बदलली की जगबुडी होत नाही. आपण घरातसुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो, तसेच आहे हे! शनी कुंभेत होता आणि मीन राशीत जाणार, त्यात आपली झोप कशाला उडायला पाहिजे?. पुढे अडीच वर्षांनी तो मेष राशीत जाईल. प्रत्येक ग्रह त्याच्या भ्रमण कक्षेत राहून पुढे जातच राहणार. ज्योतिष ह्या विषयाकडे घाबरून न बघता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बघितले पाहिजे!

आसमंतातील हे सर्व ग्रह मानवी कल्याणसाठी आहेत. ते आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फलित देण्यासाठी बांधील आहेत. वाईट काही झाले किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की त्या ग्रहांचा अगदी समाचार घेणे, त्यांना दुषणे ठेवणे कितपत योग्य आहे ह्याचा जरूर विचार झाला पाहिजे. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या पूर्व कर्माचे प्रतिबिंब आहे. जे काही होते आहे त्यात आपण सोडून कुणाचाही हात नाही. आपण केलेले आपल्याकडेच परत येत असते मग चांगले वाईट काहीही असो.

मीन राशीतील शनी हा गुरूच्या राशीतील एक पाहुणा आहे. पाहुण्यांचे आपण स्वागत करतो, तसेच शनी महाराजांचेही दिलखुलास स्वागत झाले पाहिजे, त्याची दशहत असण्याचे काहीच कारण नाही. आपण उन्हाळ्यात साधे कॉटन चे कपडे वापरतो, कोकम सरबत, लिंबू सरबत घेतो, थंडावा निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी करतो, पावसाळ्यात छत्री, रेनकोट आणि हिवाळ्यात गरम कपडे . निसर्गातील बदलाचे जसे स्वागत करतो त्याचप्रमाणे बदलणाऱ्या  ग्रहस्थितीचे आपण मनोमनी स्वागत करायला शिकले पाहिजे. 

सोशल मिडिया वरती प्रचंड माहिती आज उपलब्ध आहे. आता त्यातील काय घ्यायचे काय सोडायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे. पण त्याची अनामिक भीती मात्र वाटता उपयोगी नाही. मीन ही मोक्षाची राशी आहे. पहिल्या अकरा राशीतून आपण जे काही जीवनात मिळवले ते सर्व इथेच सोडून मोक्षाला जायचे आहे हे शिकवणारी अथांग महासागरासारखी राशी जिथे आपली पाऊले आहेत आणि ती पाऊले दुसऱ्या तिसऱ्या कुणाचीही नसून आपल्या सद्गुरूंची आहेत . सर्व सोडून त्या पाऊलांवर नतमस्तक होणे म्हणजे परम भाग्य.

गुरूचा मान शनीदेव सुद्धा ठेवतात त्यामुळे ह्या राशीत शनी महाराज तितके त्रासदायक होणार नाहीत. कर्म बंधनातून सुटण्याचा मोक्षाचा मार्ग शनिदेव आपल्यासाठी खुला करत आहेत . ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे त्यांनी आपल्या पायांची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. पत्रिकेतील मूळ ग्रहस्थिती आणि दशा योग्य नसेल तर त्रासदायक स्थिती होऊ शकते . आपला आहार विहार रोजची दिनचर्या जपली पाहिजे . समोर दिसेल ते खात सुटायचे आणि मग ग्रहांच्या माथी खापर हे योग्य नाही.

शनी राहू युती ही बांधकाम क्षेत्र आणि जमिनीचे व्यवहार ह्यात फसवणूक , विलंब करणारी आहे . मीन राशीतील शनी आपल्याला योग , मेडीटेशन साठी सकारात्मक उर्जा देणारा आहे. जगभर अध्यात्मिक बैठक , उपासना , जप वाढवण्याकडे लोकांचा कल वाढणार आहे. आज आपण आधुनिक जगतात वावरत आहोत . एक बटण दाबले की असंख्य गोष्टी समोर उभ्या राहतात . प्रत्येक गोष्ट एका फोनवर होत आहे. जग नुसतेच बदलत नाही तर आधुनिक होत आहे जवळ येत आहे पण हे सर्व होत असताना, माणसा माणसातील भावनिक ओलावा कमी होताना दिसेल .महासागरातील जल म्हणजेच भावना हा शनी शोषून घेत आहे आणि त्यामुळे एकमेकातील संबंध रुक्ष होताना दिसतील. नाती ही प्रेमाच्या नाजूक बंधनात जास्ती खुलतात पण हा बंधच कुठेतरी ठिसूळ होताना आपण बघणार आहोत . प्रत्येक जण आपल्या पुरतेच जगणार आहे .

देवाचे अस्तीत्व आणि त्याची ओढ , त्यासाठी लागणारा एकांत , समाधी अवस्था ह्यासाठी लागणारे पोषक वातावरण शनी नक्कीच तयार करेल. ह्या सर्वाचा सकारात्मक विचार असा की आपण सगळे मिळवले पण हे मिळवताना आपण गमावली ती मनाची शांतता. आज झोप येत नाही, डॉक्टर कडून गोळ्या घेऊन म्हणजेच झोपही विकत घ्यावी लागत आहे. मनावरील वाढणारे दडपण , साशंकता , जीवनातील अनिश्चितता, उद्या ची वाटणारी सततची भीती , काळजी आणि एकंदरीत अस्थिर वातावरण आपल्याला जीवनातील लहान सहान आनंदापासून अलिप्त करत आहे. सगळ्यात असूनही वाटणारे भय आणि एकटेपणा आपल्या मनाला खातोय हे चित्र सर्वत्र आहे. 

मीन राशीतील शनी मनाच्या शांततेचा मार्ग दाखवेल. उपासनेचे महत्त्व पटवून देईल, शेवटी मोक्षाकडे वाटचाल करायचे महत्व आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध हाच शनी करून देईल. शनी विरक्त आहे. भावभावनांच्या खोट्या कल्लोळात आणि मोहपाशातून मुक्त करून आभासी जगाचे महत्व किती क्षणभंगुर आहे हे दाखवून परमेश्वर सानिध्यातील अस्तित्व शांतता प्रदान करणारे आहे आणि नेमके हेच शनीला आपल्याला द्यायचे आहे. आपल्याला सर्व गोष्टींसाठी वेळ आहे कारण भौतिक जगाच्या पलीकडे आपण विचारच करत नाही पण हे तकलादू आहे,पण शाश्वत आहे ते आपले ईश्वरावरील प्रेम त्याची आसक्ती आणि म्हणूनच तोच आपला खरा सोबती आहे ह्याची जाणीव मीन राशीतील शनी करून देणार.

मीन राशी ही राशीचक्रातील अंतिम राशी आहे. ही राशी द्विस्वभावी आणि गुरूच्या अमलाखाली येणारी संवेदनशील राशी आहे. मीन राशीतील अथांग महासागर सर्व गोष्टी साठवू पाहणारा आहे. ह्या राशीत येणारा तपोनिष्ठ शनी जल राशीत काहीतरी खास नक्कीच देईल. सामाजिक अनिश्चितता, शेअर मार्केट मधील उंची तर मंदी (द्विस्वभावी राशी ) शनी हा विलंब दर्शवतो पण संधोधन सुद्धा करवतो. एखादे प्रोडक्ट का विकले जात नाही ? हा संशोधनाचा विषय असतो आणि त्याची कारणमीमांसा करण्यासाठी लागतो तो संयम . सागरी पर्यटन आणि ट्रान्सपोर्ट ह्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील. जगातील युद्धाचा संकेत शनी जेव्हा जेव्हा मीनेत येतो तेव्हा देतो. युद्धजन्य स्थिती हि बाह्य वातावरणच नाही तर मनावर सुद्धा दडपण आणणारी आहे. शनी बदला पाठोपाठ राहू सुद्धा बदल करणार आहे त्यामुळे प्रामुख्याने साथीचे आजार उद्भवतील. मेष राशीत शनी जेव्हा भविष्यात प्रवेश करेल त्यावेळी नवीन जगाची निर्मिती होईल कारण मेष ते मीन हा संपूर्ण प्रवास शनी ने पूर्ण केलेला असेल. वाईट गोष्टीतून चांगलेच व्हावे.

मीन रास ही गुरुतत्व दर्शवत असल्यामुळे आपले अध्यात्म नव्या उंचीवर नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शनी हा कष्ट करणाऱ्या समाजाचे नेतृत्व करतो. नुसते बसून राहाल तर शनीची कृपादृष्टी होणार नाही पण शरीराला कष्ट द्याल, कुठल्याही कामाला कमी न लेखता आणि कुणाचाही उपमर्द, अपमान न करता कामात झोकून दिले तर शनी विशेष फळ देईल हे नक्की . शनीला आळस आवडत नाही , अहंकार तर नाहीच नाही. रोजचा दिवस बदलत जाणारा आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टी मर्यादित राहिले पाहिजे , सगळ्या गोष्टीत अचानक वाढ न होता संथपणे होईल.  

या काळात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

पुढे हा शनी जेव्हा वक्री असेल तेव्हा गुंतवणूक आणि जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असेल . सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या तुम्हा आम्हा लोकांनी आपले जीवन शिस्तीत, साधेपणाने आणि कष्टाने जगावे. मोठेपणाचा आव आणलात तर कठीण होईल सर्व. कुणालाही कमी लेखू नका, गरिबाला हिणवू नका ते शनीला कधीच आवडणार नाही . प्रत्येक गोष्टीत कितीही विलंब झाला तरी धीर सोडायचा नाही. आपली उपासना वाढवणे आपल्या हाती आहे. साधे जीवन आहे आपले काही वाईट होत नाही. अर्थात कर्म आणि नियत शुद्ध असेल तर!

सरतेशेवटी एक सांगावेसे वाटते . आपल्या महाराजांनी तारक मंत्र हा मनुष्य जीवनाला एक मोठा आधार दिलेला आहे. स्वामिनी सांगितले आहे का? शनी मेष राशीत असेल किंवा कर्केत , वृश्चिकेत असेल तेव्हा ह्या तारक मंत्राचा काहीच उपयोग होणार नाही. तुमचे तुम्ही बघा बरे मी चाललो . असे स्वामी म्हणतील का आपल्याला? शनीच काय इतर कुठलाही ग्रह कुठेही भ्रमण करत असला तरी प्रत्यक्ष आपले “ स्वामी समर्थ “ आपल्याच सोबत भ्रमण करत आहेत आणि तेही जगाच्या अंतापर्यंत. 

शनी इथे आणि मंगळ इथे म्हणून त्याचे अवडंबर आपणच करतो तेव्हा आपणच आपल्या सद्गुरूंचा किती अपमान करत असतो . अहो जाता येत क्षणोक्षणी घाबरून कसे जगणार आपण . इथे स्वामी स्वामी करायचे जप , पारायणे करायची तीर्थाटन करायचे आणि इथे मंगळ शनीला घाबरायचे. नक्की काय चाललय आपले? सामान्य माणसे आहोत आपण , नारळ भाजी महाग झाली आपले बजेट कोसळते . एक एक गोष्ट विकत घ्यायला किती जीवाचा आटापिटा करतो, किती महिने पैसे जमवतो . इतके साधे सुधे जीवन जगणारे आपण, अहो कशाला ते शनीदेव आपल्याला त्रास देतील?

हो आता प्रत्येक गोष्ट लगेच किंवा आपल्याला हवीतशी नाही होणार पण जे होते आहे ते त्यांच्या इच्छेने असा विचार केला तर आयुष्य बदलून जाईल. सारखे मी मी मी चा पाढा वाचणारे आपण कधीतरी म्हणतो का? महाराजांनी माझ्याकडून उपासना करवून घेतली. मुळात उपासना जपजाप्य ह्याचे आयुष्यातील महत्वच आपल्याला समजले नाही आणि ते आपल्याला समजावे म्हणूनच शनी आहे. सुख दुःख हा जीवनाचा एक भाग आहे. निसर्ग जिथे सतत बदलत असतो तिथे आपले जीवन ते काय .

कधी जेवणात मीठ नसले की मिठाची किंमत समजते, तसेच दुःख असले की सुखाची लज्जत समजते. वाईट काळात महाराजांची आठवण येते , अध्यात्म जीवन जगवते हेच खरे . एखाद्या राशीत ५-६ ग्रह आले , बर मग ? आपण नाही का मैत्रिणी मित्र जमतो भिशीला अगदी तसेच हि ग्रहांची अंगत पंगत आहे असे समजा. एकमेकांशी गळा भेट करतील आणि जातील आपापल्या मार्गाने पुढे . कोटी किलोमीटर उंच त्या आकाशात भेटणार ते तेही काही काळासाठी त्यांची भीती इथे पृथ्वीवर कशासाठी ? का? काही वाईट केलय का तुम्ही कुणाचे? मन खातय का? पैसे  लुबाडले आहेत का? कुणाला फसवले आहे का? निरपधार लोकांना शिक्षा केली आहे का? एखाद्याच्या अश्रुना तुम्ही कारण आहात का? असाल तर माफी मागा आणि जी काही शिक्षा देतील ती निमूटपणे भोगून मार्गस्थ व्हा आणि नसेलच काही केले तर मग घाबरण्याचा प्रश्नच नाही. 

गत जन्मातील पाप पुण्याचा हिशोब आपल्याला न समजणारा आहे पण ह्या जन्मातील ठाऊक आहे ना ? त्रयस्थाच्या दृष्टीने आपल्याच आयुष्याकडे बघा , आपल्या कर्मांकडे बघा , आपली उत्तरे तिथेच आहेत आणि मिळतील. शनीची दाने , जप , हनुमान चालीसा , मारुती स्तोत्र म्हणा पण मुख्य म्हणजे “ मी” ला तिलांजली द्या . मीच काय तो हुशार शहाणा हा अहंकार सोडून द्या . प्रत्येक जण आपापली शिक्षा भोगत आहे तुम्ही काही करायला जाऊ नका.

माणसातील देवाला ओळखा आणि गरज असेल त्याला जमेल तशी मदत करा . कुणाला हिणवू नका आणि कुठे मी पणाचे झेंडे तर नकोच नको.  आपल्या शरीरातील मुख्य अवयव “ जिव्हा “ शब्दांचा वापर योग्य करा . ग्रहांची ताकद ओळखा पण त्याच सोबत आपण केलेल्या उपासनेवर आपल्या गुरूंवरील विश्वास तिळमात्र कमी होता उपयोगी नाही. 

आपण कसे आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीचे पदार्थ करतो , अगदी तसेच शनी महाराजांना आवडेल असे व्यक्तिमत्व घडवले , विनम्र राहिलो तर कश्याला ते तुम्हाला त्रास देतील. सतत वैतागून , चिंता करून त्रस्त होवून पोतभर आजार होतील पण प्रश्न सुटणार नाहीत . सगळे छान छान गोड गोड कसे होईल नेहमी? शनी चा मुख्य नियम आणि दागिना म्हणजे “ संयम''. हा संयम शिकवण्यासाठीच शनी आहे आपल्या जीवनात . 

धीर धरा , गोष्टी घडायच्या तेव्हा बरोबर घडणार आहेत हा विश्वास ठेवा .आपण करत असलेल्या उपासनांचे ढोल वाजवू नका. त्या जितक्या गुप्त तितके फळ अधिक . महासागराच्या राशीतील हा शनी तुम्हा आम्हा सर्वाना जगणे आणि जगवणे शिकवणार , आपले आयुष्य अधिकच परिपूर्ण आणि समृद्ध करणार त्याचे स्वागत करुया. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे “ गुरु “ त्यांचे अस्तित्व आपल्या आयुष्यात असताना भीती कसली .The Most Powerful Star in Our Life “बृहस्पती “. मीन ह्या गुरूच्या राशीतील तपस्वी शनी जो आपल्याला परमार्थाची गोडी लावणारा आणि वाढवणारा आहे . अशा या शनी महाराजांना माझा साष्टांग नमस्कार.

ओम शं शनैश्चराय नमः

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: The events of Saturn's setting and rising will definitely affect human life; but what is the solution?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.