Astro Tips: दुसऱ्यांची प्रगती पाहून त्रास होतो? मनात वाईट विचार येतात? हा तर चंद्रदोष; वाचा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:05 PM2024-08-31T12:05:46+5:302024-08-31T12:06:15+5:30
Astro Tips: कुंडलीतील ग्रहदोष निवारणासाठी उपाय दिले आहेतच, त्याबरोबर व्यक्तीविषयी मनात असलेला ग्रह बदलणेही तेवढेच महत्त्वाचे; सविस्तर लेख वाचा.
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
परमेश्वराने बुद्धी आणि विचार शक्ती सगळ्यांनाच दिलेली आहे पण त्याचा उपयोग कसा करायचा हे अर्थात प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या आजूबाजूला अनेक माणसे रोजच्या जीवनात वावरताना दिसतात त्यातील काही विशाल हृदयाची , इतरांना मदत करणारी आणि दुसऱ्यांच्या आनंदाने खुलणारी असतात . पण काही अत्यंत संकुचित मनाची असतात. सतत एखाद्या गोष्टीची लपवा छपवी करण्याकडे त्यांचा कल असतो. स्वतःचे काहीही सांगायचे नाही, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात खूप रस असणारी, दुसऱ्यांचा सतत द्वेष करणारी, असूया, मत्सर, सतत दुसऱ्याला पाण्यात पाहणाऱ्या वृत्तीची असतात. अशा व्यक्ती सतत राजकारण खेळत राहतात. ह्याचे त्याला त्याचे ह्याला, सतत सगळ्या बातम्या हव्या असतात त्यांना! कुणाबद्दल एक शब्द चांगल बोलणे ह्यांना जमत नाही. किंबहुना कुणाचेही चांगले बघवत नाही.कुणाची प्रशंसा करणे तर खूप दूर राहिले. उलट दुसऱ्याचे वाईट झाले की ह्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
मुळात ही वृत्ती येते कुठून? तर आपल्याच आयुष्यात अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत की समोरच्याचे सुख टोचू लागते. जसे सगळ्यांना लक्ष्मीप्राप्ती होते पण आपल्याला रोजचा प्रपंच सुद्धा चालवता येत नाही. शिक्षण नाही म्हणून धड नोकरी नाही, पराकोटीचा अहम त्यामुळे शनीचे फटके पदरी पडणारच, तो कुणालाच सोडत नाही. आयुष्याची संध्याकाळ झाली तरी देवदेव करूनही स्वतःचे राहते घर होत नाही. मग भाऊ बंदकी आली, त्यात अत्यंत घृणास्पद खालच्या पातळीचे राजकारण करून संपत्ती जमीन जुमला हडपणे आले, कारण स्वतःच्यात काहीच करण्याची धमक नाही.
आपल्याला जे सुख आयुष्यात अपेक्षित असते ते दुरापास्त होते. अगदी रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टीत सुद्धा आनंद मिळत नाही तेव्हा माणसाची दुसऱ्यावर जळण्याची वृत्ती बळावते. दुसऱ्याचे कसे चांगले चालले आहे ते पाहवत नाही आणि त्यातूनच मग असूयेचा जन्म होतो आणि ती सर्वात प्रथम त्या व्यक्तीलाच मारते. अहो जो तो आपापल्या कर्माचा कारक! प्रत्येकाला देवाने बुद्धी आणि दोन हात दिलेले आहेत. कष्ट करा आणि सन्मार्गाने जगा! जे आहे त्यात समाधान माना आणि परमेश्वराच्या सान्निध्यात राहा. पण नाही! भौतिक सुखाची तीव्र लालसा आणि काहीच पदरी पडत नसल्यामुळे येणारे नैराश्य. ह्याचा परिणाम असा होतो की सगळी आजारपणे मागे लागतात. जेव्हा आपण दुसऱ्याचा मत्सर करतो तेव्हा आपले स्वतःचेच हार्मोन्स बिघडतात आणि विचार दुषित होतात , विचारांचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर व्ह्यायला लागला की तो आपल्याला अगदी स्मशानापर्यंत सोडत नाही.
अत्यंत छोटी सोच असणाऱ्या ह्या व्यक्तींनी कितीही देवाचे केले तरी त्यांचे कलुषित मन त्यांना देवाच्या द्वारापर्यंत कधीच नेत नाही! परमेश्वराला त्यांची हाक सुद्धा ऐकू येत नाही. दुसऱ्यांचे लुबाडून, घरात राजकारण करून, आपण संपत्ती हडपू, पण पुढे काय ? त्याचा विचार केलाय का कधी ? याच देही याच जन्मी आहे सर्व. आपण आपल्यापुरते जगायला शिकले पाहिजे. जे आहे ते आहे. रोजचा दिवस नवनवीन संधी देण्यासाठीच येतो, त्या घेवून कष्ट करत राहिले पाहिजे . आपलाही एक दिवस येणारच, ह्यावर विश्वास ठेवला पाहिजे. दुनियादारी सोडून जरा आपल्या प्रपंचात लक्ष्य दिले तर बरे होईल.
जे आपण पेरणार तेच उगवणार , तुम्ही जे देणार तेच तुम्हाला परत मिळणार त्यामुळे चांगले विचार मनात रुजवाल तर तुमचे विचार , देहबोली सर्वच सकारात्मक होयील ह्यात शंकाच नाही .
ही छोटी सोच कुठून येते ? तर पत्रिकेतील चंद्र दुषित असेल , बिघडला असेल , पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल, तर मनाच्या ठिकऱ्या उडतात. निर्णय क्षमता नसते, आई विक्षिप्त स्वभावाची, आजारी , मानसिकता बिघडलेली असते. गृहसौख्य , वाहन सौख्य नसते . सगळ्या सुखात उणीव भासते. घरात अशांतता जाणवते आणि ती व्यक्तिमत्वावर उमटते .
अशा लोकांनी योगासने , ध्यान , साधना करावी. आपले शब्द भांडार जरा जपून वापरावे. विचार आचाराचा मेळ घालावा. शांत ठिकाणी बसून अंतर्मुख व्हावे, आवडते संगीत ऐकावे त्याने विचारांचे परिवर्तन नक्कीच होईल. आपले छंद जोपासावे, सत्कर्मात आपले योगदान द्यावे. सर्वात मुख्य आपल्या विचारांची दिशा आपणच ठरवावी . मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये किंवा बोलूही नये. आपण दुसऱ्याचा केलेला तिरस्कार , मत्सर , घृणा , द्वेष , असूया अनेक अनेक आजारांच्या स्वरूपात दाम दुप्पटीने आपल्याच पदरात पडणार ह्याचा कदापि विसर पडू देवू नये.
चंद्र शुद्ध करण्यासाठी महादेवाचा जप आणि अभिषेक करावा . आकाशातील चंद्राला ओवाळावे . सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे किंवा गोड पदार्थांचे गरजू व्यक्तीला दान करावे. आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगता यावे ह्यासाठी कर्म शुद्ध ठेवली पाहिजेत आणि ते सर्वस्वी आपल्याच हाती आहे नाही का?
संपर्क : 8104639230