Astro Tips: प्रेम विवाह करायचाय? जरूर करा; त्याआधी पत्रिकेतील 'हा' भाव नक्की जाणून घ्या; अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:07 IST2025-01-20T12:07:22+5:302025-01-20T12:07:51+5:30

Astro Tips: प्रेम विवाह जुळतात, पण काही जणांच्याच बाबतीत ते यशस्वी होतात, त्यामागे असतात पत्रिकेतील विशिष्ट भाव; त्याबद्दल जाणून घेऊ. 

Astro Tips: Want to have a love marriage? Definitely do it; Before that, know 'this' sign in the horoscope; Otherwise... | Astro Tips: प्रेम विवाह करायचाय? जरूर करा; त्याआधी पत्रिकेतील 'हा' भाव नक्की जाणून घ्या; अन्यथा... 

Astro Tips: प्रेम विवाह करायचाय? जरूर करा; त्याआधी पत्रिकेतील 'हा' भाव नक्की जाणून घ्या; अन्यथा... 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

माझ्या पत्रिकेत प्रेम विवाहाचे योग आहेत का ? असा प्रश्न अनेक जातकांच्या मनात येतो. प्रेम फुलते ते पंचमात आणि त्याची परिणीती होते ती सप्तमात. पंचम भाव प्रेम आणि सप्तम विवाह. पंचमेश आणि सप्तमेश युतीत असतात किंवा एकमेकांच्या दृष्टीत असतात, अनोन्य योगात असतात तेव्हा प्रेमविवाहाची शक्यता अधिक असते. शुक्र मंगळ युतीसुद्धा प्रेम विवाह सूचित करते. पण ह्यावर सूर्य, राहू, शनी ह्यांचा प्रभाव असेल आणि ह्या ग्रहांचा षष्ठ भावाशी संबंध आला तर पुढे प्रेमविवाह अपयशी ठरतो. हा झाला ज्योतिष शास्त्रीय भाग!

मात्र, आजकालची मुले मुली एकमेकांना भेटतात आणि त्यांना पसंती विचारली, तर चेहरा मक्ख करतात, कारण उत्तर त्यांनाच माहित नसते. वास्तविक पाहता 'आवड' हा शब्द तरुण वयात भिन्न लिंगी आकर्षण ह्याच्याशी बहुतांश निगडीत असतो. अर्थात ते स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. मनाने त्या दोघांचा मधुचंद्र सुद्धा झालेला असतो, चित्रपट सृष्टीचा प्रचंड पगडा जनमानसावर आहेच. पण दिसणे , बाह्य रूप आणि संसार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शारीरिक आकर्षण आणि क्षणाचे प्रेम आभासी असते, हवेत विरून जाते. म्हणूनच वास्तव स्वीकारून विवाह केलेला उत्तम .

मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे आणि तो माणसांशिवाय जगु शकत नाही . एकांत वगैरे फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्ष आयुष्य जगताना प्रेम नसेल तर आयुष्य भकास, निरस होते . माणूस प्रेमाचाच भुकेला आहे.  दोन गोड शब्द त्याच्या आयुष्यात प्रेमाचा रंग अधिक गडद करतात. कुणीतरी आपले आहे आणि आपल्यासाठी जगत आहे ही भावनासुद्धा जगायला कारणीभूत ठरते. 

पत्रिकेतील पंचम भाव प्रेम निर्देशित करणारा आहे. आपल्याला आयुष्यात मिळणारे प्रेम पंचमाशी निगडीत आहे. प्रेम हे फक्त प्रेयसीचे असते असे नाही, आई बहिणसुद्धा प्रेम करते, आपले मित्र मंडळी, आप्तेष्ट सर्वांचा ह्यात वाटा असतो. ह्या सर्वांकडून आपल्याला किती प्रेम मिळणार ते सांगणारा हा भाव खास आहे. 

मात्र, आपल्याला एखाद्याबद्दल प्रेम वाटते म्हणजे नेमके काय वाटते, ह्याचा एकदा स्वतःशीच विचार केला पाहिजे . प्रेमाला वय नाही ते कधीही कुणाही बद्दल वाटू लागते. प्रेम ही मनाच्या कोपऱ्यातील अत्यंत नाजूक साजूक कोमल अशी संवेदना भावना आहे, जी अनेकदा अव्यक्त राहते. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम आहे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. आजकाल सगळे आयुष्यातील अधिक काळ कार्यालयाच्या ठिकाणी एकत्र असतात, म्हणून काय लगेच एकमेकांबद्दल प्रेम वाटत नाही. सहवासाने एकमेकांबद्दल वाटणारी सहानुभूती काळजी म्हणता येईल, पण प्रेम नाही! आणि  जर अनेकांच्या बद्दल तेच प्रेम वाटू लागले तर त्याला कदाचित विकृती म्हणावी लागेल, तेही प्रेम नाही!

सहवासाने सुद्धा प्रेम निर्माण होते पण ते निर्व्याज्ज असते . कुठल्याही अपेक्षेशिवाय वाटणारे केलेले प्रेम हे परमेश्वराची देण आहे. किती जणांच्या नशिबात असते ते.  प्रेम आणि आकर्षण ह्यातील गल्लत अनेकदा आपली आपल्यालाच समजत नाही. आकर्षण क्षणिक असते. एखादी व्यक्ती आवडते म्हणजे जर ते शारीरक आकर्षण असेल तर ते टिकणार नाही कारण आपण सतत बदलत असतो कायम आपण तसेच राहणार नाही. म्हणून फक्त त्यासाठी वाटणारे प्रेम कालांतराने विरून जाईल. प्रेमाचे पदर उलगडत जातात, भेट नाही झाली तर वाटणारी हुरुहूर काळजी हे प्रेम नक्कीच असते आणि त्याचा कौल आपले मन आपल्याला योग्य वेळी देतेच. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल नक्की काय वाटते ते समजायला आपल्याला सुद्धा वेळ लागतो . अनेकदा एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला आपले मन मोकळे करावेसे वाटते, एखाद्या प्रश्नाबद्दल मत जाणून घ्यावेसे वाटते, आपल्या मनातील जे जे आहे ते तिला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही . खूप आधार वाटत असतो त्या व्यक्तीचा आपल्याला, मग ती कुणीही असो, सखा किंवा सखी ,पण ते प्रेम नसते , हे एक विश्वासाचे नाते असते, कुणीतरी आपले जवळचे, ज्यामुळे आपल्याला मानसिक आधार मिळतो आणि एकटे वाटत नाही पण ते प्रेम नसते आकर्षण सुद्धा नसते. ते अनुबंध सगळ्याच्या पलीकडे असतात , जगण्याचे बळ मात्र नक्कीच देतात . खरतर प्रेमाच्या छटा इतक्या आहेत की आपणच त्या ओळखू शकत नाही.
 
परवा माझ्याकडे दोन पत्रिका गुण मिलनासाठी आल्या. मुलाने घरी सांगितले विवाह करीन तर हिच्याशीच करीन. पत्रिका जुळत नव्हत्या. मुलीची षष्ठ भावाची दशा. एक दोन भेटीचा परिणाम “लग्न करीन तर हिच्याशीच “ इथवर गेलेला. पालकांनी तरी काय करायचे सांगा. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि बोलताना मुलामुलींचे एकमेकांशी जमणे कठीण आहे हे त्याच दोघांना समजले आणि तो प्रेमाने ओथंबलेला अध्याय तिथेच थांबला. मग हे नक्की काय होते ?  प्रेम करा पण ते निभावतासुद्धा आले पाहिजे.  प्रेम विवाह करणाऱ्या त्या दोघांनीही पत्रिकेचे वाचन जाणकार ज्योतिषाकडून करून घ्यावे, हे आवर्जून आज सांगावेसे वाटते. विवाह करायचा ठरवलंच आहे तर नक्की करा पण पुढील वाटचाली मध्ये येणाऱ्या चढ उतारांची तोंड ओळख सुद्धा करून घ्या. 

प्रेम ही एक मनाची अवस्था किंवा भावना आहे आणि त्यासाठी प्रेम विवाहच केला पाहिजे असे नाही. दोन भिन्न व्यक्तींचे सुद्धा विवाहपश्च्यात एकमेकांशी इतके  बंध जुळतात की त्यांचा जणू प्रेम विवाहच वाटावा. आंतरिक प्रेम दीर्घकाळ टिकते.  एकदा माणूस आपला म्हटला की सर्व चांगल्या वाईट गुणांसकट जो स्वीकारतो तोच खरे प्रेम करू शकतो. आयुष्यातील सगळ्या लढाया एकत्रित लढायची ताकद देणारे हे प्रेम संघर्षाला सामोरे जाते तेही न घाबरता, पण आपल्या जोडीदाराचा हात कधीच सोडत नाही . प्रेमाची व्याख्या ही आपणच करायची असते . पैसा आहे म्हणून प्रेम आहे की त्या व्यक्तीच्या गुणांवर प्रेम आहे. जमीन जुमला आहे म्हणून प्रेम आहे, की बाह्य रूपावर मी फिदा आहे, हा अभ्यास आपला आपणच करायचा आहे. आपण त्याच्या घरच्या मंडळींवर सुद्धा  तितकेच प्रेम करणार का की फक्त त्याच्याच भोवती प्रेम आहे प्रेम आहे म्हणून पिंगा घालणार?

विवाह हा त्या दोघांचा असला तरी दोन कुटुंबांचा सहभाग असतो, त्यामुळे विवाहानंतर त्या प्रेमात अनेक वाटेकरी येतात. आपण काल परवा प्रेम केलेला आपला जोडीदार त्याच्या आईने २८ वर्षापूर्वी जन्माला घातला आहे, त्यामुळे तिचे आई म्हणून किती प्रेम असेल ह्याचा अंदाज यायला हवा . उद्या आपणही आई होणार तेव्हा आपणही आपल्या मुलावर असेच अमर्याद प्रेम करणार हे समजून घेता आले पाहिजे.  इथे प्रेमाचे स्वरूप बदलले तरी भावना त्याच आहेत . हे समजले नाही, तर प्रेमाचा रंग बेरंग होण्यास वेळ लागणार नाही. प्रेमाच्या अनेक छटा आयुष्याच्या विविध टप्प्यांवर बघायला, अनुभवायला मिळतात आणि त्या त्या वेळी त्यातील आनंद  घेता आला पाहिजे. जसे एक मुलगा म्हणून पुढे जोडीदार, मग बाप आणि आयुष्याच्या संध्याकाळी आजोबा म्हणून प्रेमाचे रंग अनुभवणे हेच तर आयुष्य आहे. ह्यातील प्रेत्यक नात्याचे प्रेम वेगळे आणि त्याचा रंग सुद्धा. त्याची भेसळ केली तर आयुष्य रंगहीन होवून जाईल. प्रत्येक रंग आपापल्या ठिकाणी योग्य आहे म्हणून त्याची तुलना नको. 

म्हणूनच पुन्हा सांगावेसे वाटते की प्रेम विवाह करताना सुद्धा विचार पूर्वक करावा. शेवटी दोन्हीकडील पालकांना तुमचा बहरणारा संसार बघायचा आहे दुसरे त्यांना काहीच नको आहे. त्यात त्यांना जमतील तसे रंग तेही भरू पाहत आहेत ते स्वीकारा आणि आयुष्याचा संसाराचा आनंद लुटा. हे सारे वेळीच समजून घेतले नाही, तर प्रेमाचे हे सुरवातीचे गडद रंग मग फिक्कट होत जातात आणि कालांतराने दिसेनासे सुद्धा. आपले एकटेपण घालवण्यासाठी लोक आधार शोधत राहतात आणि त्यालाच प्रेम समजण्याची गल्लत करू लागतात. अशी गल्लत झाली तर मानसिक व्यथा निर्माण होईल हे नक्की. आपल्या प्रेमाच्या भावना निदान आपल्या पुरत्या तरी सुस्पष्ट असाव्यात म्हणजे सगळेच सोपे होईल. एखाद्याबद्दल मनापासून प्रेम असणे आणि आयुष्यभर त्या समोरच्या व्यक्तीला कळूही न देता अपेक्षा विरहित प्रेम करत राहणे ही उच्च कोटीची भावना आहे. 

विवाह सगळ्यांचेच होतात पण ते किती टिकतात, यशस्वी होतात हे महत्वाचे आहे आणि म्हणूनच प्रेमाचे गोडवे गाणे वेगळे आणि संसार करणे वेगळे .तसे नसते तर कित्येक वर्ष एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले प्रेमी लग्नानंतर चहा कोण करणा, कपडे कोण वाळत घालणार ह्यावरून तू तू मै मै करणार नाहीत . सासू सासरे सुद्धा वर्षभर इतके कोडकौतुक करतील सुनेचे आणि नंतर काही काळ गेला की तिला नावे ठेवतील. असे कसे होवू शकते ह्याचे उत्तर कुणाला सापडले तर द्या नक्की . प्रेयसी पत्नी झाली की सगळेच बदलते आणि ते जितके लवकर स्वीकारता येईल तितकी संसाराची गोडी वाढेल, अन्यथा... 

प्रेमाचा संबंध वरती उल्लेख केल्याप्रमाणे पंचम भावाशी येतो, जे आपले पूर्व कर्म आहे. आपल्या गत आयुष्यातील कर्माप्रमाणे पंचम भाव फुलणार आहे . प्रेम ही भावना जगायला आणि उध्वस्त होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकते. आयुष्यातील प्रत्येकाच्या प्रेमाचा आदर करायला शिकले पाहिजे . तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात खरी प्रेम करणारी माणसे मिळोत.  आज चंद्राचेच नक्षत्र आहे ज्याच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रेमाचा वसंत असाच बहरत राहूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: Want to have a love marriage? Definitely do it; Before that, know 'this' sign in the horoscope; Otherwise...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.