Astro tips: तापट डोक्याच्या लोकांना हिऱ्याची अंगठी घाला असे ज्योतिष तज्ज्ञ का सुचवतात? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 01:32 PM2024-02-09T13:32:45+5:302024-02-09T13:34:18+5:30
Astro Tips: हिऱ्याची चमक लक्षवेधक असते, शिवाय ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही तो वापरण्याचे अनेक लाभ आहेत, पैकी एक म्हणजे रागावर नियंत्रण!
सोने, चांदी खरेदी पर्यंत आपली मजल जाते, मात्र आयुष्यात कधीतरी हिरा खरेदी करावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हिरा महाग असूनही तो अतिशय गुणकारी असल्याने ज्योतिषी त्याचे लाभ शरीराला मिळावेत म्हणून हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सुचवतात. एवढे काय महत्त्व आहे हिऱ्याचे? त्याचे गुणधर्म कोणते ते छोट्याशा उदाहरणातून जाणून घेऊ.
एक राजा असतो. थंडीच्या दिवसात उबदार वाटावे म्हणून राजदरबार पटांगणात भरतो. एक व्यक्ती येते आणि म्हणते माझ्या कडे दोन एकसारखे हिरे आहेत. अनेक राज्यात जाऊन आलो पण कोणालाही यातला खरा हिरा ओळखता आला नाही. यात खरा कोणता आणि खोटा कोणता हे ओळखण्याची संधी तुमच्याही राज्यातल्या लोकांना देऊ इच्छितो. राजासमोर दोन्ही हिरे पेश करण्यात आले. राजाही अचंबित झाला. तो माणूस म्हणाला, राजन यातला खरा हिरा तुमच्यापैकी कोणालाही ओळखता आला तर हा तुमच्या राजखजिन्यात ठेवून घ्या आणि जर नाही ओळखला तर माझ्या कलाकाराचे बक्षीस म्हणून त्या हिऱ्याच्या दुप्पट किमंत मला द्या!' राजा त्याची अट मान्य करतो आणि सर्वांना आवाहन करतो.
राजदरबारात सगळे पारख करू लागतात . कोणालाच ओळखू येत नाही. तेव्हा एक अंध व्यक्ती म्हणते मी ओळखून दाखवतो. लोक कुजबुजतात. डोळस लोकांना जे बघून कळले नाही ते अंध व्यक्तीला कसे दिसणार यावर चर्चा करतात. अंध व्यक्ती काही क्षणात खरा हिरा ओळखते आणि खोटा कोणता ते सांगते. हिरा बनवणारी व्यक्ती देखील आश्चर्यचकित होऊन विचारते. त्यावर ती अंध व्यक्ती म्हणते, की आपण उन्हात बसलो होतो. उन्हात काच गरम झाली. हिरा मात्र थंड राहिला. त्यामुळे खरा कोणता आणि खोटा कोणता हे मी लगेच ओळखले.
या गोष्टीतून सांगायचे म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या लोकांवर रागावत असतो आणि अनेक चांगल्या व्यक्ती, चांगले मित्र आपल्या आयुष्यातून दूर होतात. कधी कधी क्षणिक तर कधी कायमच्या दुरावतात.
ज्याने विपरीत परिस्थिती मध्ये ही आपला स्वभाव बदलला नाही, टिकवून ठेवला . शांत राहिला ..बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊ दिला नाही. तो हिरा .. तो सर्वांना हवाहवासा वाटणारा. आणि जो छोट्या छोट्या गोष्टीवरून तडकतो, तो खोटा हिरा अर्थात काच!
यावरून हिऱ्याचा शांत गुणधर्म आपल्या लक्षात येतो, तोच गुण आपल्यातही यावा किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर राहावा म्हणून ज्योतिषी तापट लोकांना हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सांगतात.