Astrology: चाळीशी उलटत आली तरी विवाह जुळेना, याला कुंडली दोष म्हणावा की आणखी काही? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 11:21 AM2024-07-30T11:21:20+5:302024-07-30T11:21:48+5:30
Astrology: 'लग्न जुळणं आणि टिकणं' हा सद्यस्थितीत अत्यंत नाजूक विषय झाला आहे. चाळीशीतही लग्न होत नसेल तर त्याला कुंडलीदोष म्हणावा की आणखी काही?
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
परवा एका मुलीची पत्रिका पाहिली . ह्या आधी दोन वर्षापूर्वी हीच पत्रीका पाहिली होती. मुलीची आई स्वतः फोनवर होती. त्या म्हणाल्या तुम्ही बोलाल का तिच्याशी? म्हटले का नाही ? नक्की बोलीन! तर प्रश्न असा आहे, की मुलीला १२ लाख पगार आणि तिची अपेक्षा आहे मुलाला कमीतकमी २० लाख तरी पगार असावा . मी म्हटले ठीक आहे, पण एकदम २० हाच आकडा का? २२, १८,१६ हे आकडे का नाही आले डोक्यात ? म्हणजे २० लाखाच्या मागचे तिने लावलेले लॉजिक समजले नाही मला म्हणून विचारावेसे वाटले, की २२, १८, १६ का नको?
जे खरं तर तिलाही समजले नाही . दोन वर्षापूर्वी तिचा जो काही पगार होता, त्यात अर्थात वाढ झाली, पण वय सुद्धा दोन वर्षांनी पुढे गेले आहे, हे विसरून चालणार नाही . एका वयानंतर सगळीच गणिते बदलतात. आज विवाह जमवणे हे पालकांसाठी “ challenging “ म्हटले तर वावगे होणार नाही. कुणाचे लग्न ठरले की आपण कधी आपल्या मुलासाठी अशी बातमी इतरांना सांगणार? आपल्याहीसाठी असा दिवस येईल का असे दहा वेळा मनात येत राहते . माझ्या मुलाचा / मुलीचा विवाह ठरला ...हे सांगण्यासाठी पालक अक्षरश: आसुसले आहेत. अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तिगत स्वरूपात अनेक जण प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष रित्या विवाह जमवण्यासाठी प्रयत्नशील आहेत . सामाजिक बांधिलकी जपत ते विवाहासाठी प्रयत्न करताना दिसतात.
मुलांनी आणि मुलीनी सुद्धा आपल्या अपेक्षा पुन्हा पुन्हा तपासून पहाव्यात. आजकाल मुलीकडचे फोन उचलत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत अशाही तक्रारीचा सूर दिसून येतो. आलेले स्थळ पसंत नसेल तर स्पष्ट सांगा, कळवा त्यांना तसे. पण फोन घ्यायचा नाही मग नंबर कशाला दिलात ? मुलीचे नाव का नोंदवले ? सगळेच असे करत नाहीत, पण जे करतात त्यांनीही आपले मत परिवर्तन केले पाहिजे. विवाह हा फक्त एका कुटुंबाचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. एक संपूर्ण पिढी तिशी ओलांडून चाळीशी कडे प्रवास करताना दिसत आहे. मुलींना सुद्धा भरमसाठ पगार आहेत त्यामुळे त्यांना अनुरूप जोडीदार आर्थिक दृष्टीने match करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
विवाह हा पैशासाठी आहे की जोडीदारासाठी ? विवाहाचा मूळ उद्देश 'सहजीवनाचा आनंद , मनासारखा मुलगा जो मला समजून घेईल' हा आहे की पैसा हा आहे? पैसा, आर्थिक सुबत्ता हवीच नक्कीच हवी, पण तोच मुख्य मुद्द्दा कधीही असू नये.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असे. त्यामुळे घर मुलाच्या नावावर आहे का, हा प्रश्नच नसायचा. घर आणि इतर सांपत्तिक गोष्टी मालमत्ता आहे ते सर्वांचे, अशी भावना होती. आता ती स्थिती राहिली नाही हेही मान्य, पण अहो २८-३० वर्षाच्या मुलांकडे दोन कोटीचे स्वतःचे घर येणार तरी कुठून ? आजकालची स्थिती पाहता उंची , वय , पैसा ह्या गोष्टीना थोडीशी मुरड घातली, तर अनेक अनेक विवाह चुटकी सरशी जुळून येतील असे वाटते. बघता बघता वय उडून जाते आहे. मुले मुली सुद्धा मग पुढे थोराड दिसू लागतात, मुलींचे वय सुद्धा लपत नाही. मग खूप पुढे जाऊन आपणच घातलेल्या अटी शिथिल करण्यापेक्षा त्या योग्य वयात आणि योग्य वेळी केल्या तर विवाह वेळेत होतील.
आज एक पत्रिका पहिली. विवाहाचा योग नाहीय पत्रिकेत. माझे स्वतःचे हात सुद्धा बघताना थरथर कापत होते , काय सांगणार आणि काय बोलणार ? अशा वेळी वाटते महाराज जगातील सगळी आश्चर्य घडावी आणि काहीतरी चांगले घडावे .पण ज्यांचे योग आहेत त्यांनी ते टाळू नयेत. मुलाचा पगार हा यक्षप्रश्न आहे का? आज २० लाख आहे म्हणून विवाह केला आणि पुढे नोकरी गेली किंवा पगार वाढलाच नाही तर काय त्याला सोडून घरी परत येणार का? असे नसते . ह्या सर्व भौतिक सुखाच्या गोष्टी आहेत त्या कमी अधिक चालल्या तरी हरकत नाही पण मुलामुलींच्या मध्ये फुलणारा प्रेमाचा वसंत अधिक महत्वाचा आहे. तो फुलला तर मग इतर गोष्टी दुय्यम होतात . एकमेकांबद्दलची ओढ , प्रेम आणि जुळवून घेण्याची वृत्ती महत्वाची आहे. मुलांनो आणि मुलींनो थोडक्यासाठी एखादे चांगले स्थळ हातातून जाऊ देऊ नका इतकेच सांगायचे आहे. नंतर भविष्यात मागे वळून पाहताना त्याचा त्रास तुम्हाला व्हायला नको .
शिक्षण, आर्थिक बाबी बघू नये असे अजिबात नाही म्हणायचे पण तेच आयुष्याची इतिपुर्तता आहे का? एकमेकांशी बोला. एकमेकांना समजून घ्या. एकमेकांचे विचार जाणून घ्या. फोटो पाहणे आणि प्रत्यक्ष भेट ह्यात खूप फरक असतो. माणसाची देहबोली सुद्धा अनेक गोष्टी सांगून जाते. आजकाल मुलांमध्ये मोकळे वातावरण असते, नव्हे ते असलेच पाहिजे त्यामुळे एकमेकांशी बोलताना सविस्तर बोलता येते, आपल्या पुढील आयुष्याचा प्रवास एकत्र करता येईल का? हे भेटी गाठी झाल्या की सहज लक्षात येते. एखादी खूप आवडलेली मुलगी नुसती फोटोत छान दिसते, प्रत्यक्ष नाही हेही लक्षात येते किंवा त्या उलट सुद्धा होऊ शकते .
विवाह नेमका कशासाठी करायचा आहे? आई बाबा सांगत आहेत म्हणून ? की सगळे करतात म्हणून ? की आता वय झाले आहे लग्नाचे म्हणून ? नक्की काय? आणि करायचे तर का? आपल्या स्वतःच्याच विवाहाकडून काय काय अपेक्षा आहेत ? हे सर्व सविस्तर बोलले पाहिजे . परवा एका माणसाचा फोन आला म्हणाले, सगळ्यांना मुंबई पुण्यातील मुलं हवी, मग गावाकडील मुलांची लग्न कशी होणार ? मी मनात म्हंटले अहो शहरात सुद्धा हीच स्थिती आहे फार वेगळी नाही . पण तरीही त्यांचा प्रश्न सुद्धा रास्तच होता!
आजकाल विवाहासाठी उत्सुक असणाऱ्या मुलामुलींची वयं पाहता आता विवाहाची “चाळीशी'' आली आहे असेच म्हणावेसे वाटते. एक संपूर्ण पिढी किंवा त्यातील अनेक जण विवाहा पासून वंचित तर राहणार नाहीत अशी भीती वाटू लागेल इतपत स्थिती आहे. कुठेतरी थांबायला पाहिजे तरच नवीन आयुष्याची सुरवात होईल....मुलामुलींची वाढणारी वयं लक्षात घेता जे समोरचे चित्र आहे त्याबद्दल लिहावेसे वाटले. थोडा वेगळा विचार केला तर हे चित्र नक्कीच बदलेल अशी आशाही आहे. दर वेळी पत्रिकेतल्या राहू-मंगळावर खापर फोडून उपयोग नाही, काही जबाबदारी आपणच आपली उचलायला हवी, तरच ग्रहांचं पाठबळ मिळेल आणि संसाराला अनुकूलता!
संपर्क : 8104639230