Astrology : आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांमागे ग्रहदशा कशी परिणाम करते; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:09 PM2024-08-01T14:09:47+5:302024-08-01T14:11:43+5:30

Astrology: कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य अनुसरताना ज्योतिषाने सखोल अभ्यास आणि जातकाने विचारपूर्वक कृती करणेच अपेक्षित असते. 

Astrology: How planetary positions affect good and bad events in life; Find out! | Astrology : आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांमागे ग्रहदशा कशी परिणाम करते; जाणून घ्या!

Astrology : आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांमागे ग्रहदशा कशी परिणाम करते; जाणून घ्या!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आयुष्यात प्रत्येक गोष्ट अमुक एक वेळेतच घडत असते, ती कुठल्या वेळेला होईल हे सांगण्यासाठी दशा, अंतर्दशा आणि विदशा ह्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उत्तम ज्योतिषी तोच असतो ज्याला सद्य स्थितीची म्हणजेच दशेची जाण असते. दशा म्हणजे शेवटी काय तर परिस्थिती. कुठल्या स्थितीत काय घटना घडतील हे दशाच सांगू शकते.
 
एखादा जातक जेव्हा पैशाचे नुकसान होते किंवा नोकरीतून अचानक निलंबन होते तेव्हा सर्वप्रथम ह्या मध्ये जातक अडकलाच का ? हे समजणे महत्वाचे असते. पुढे त्यातून तो कधी बाहेर येणार हेही दशाच सांगते .म्हणून जीवन म्हणजे दशांचा खेळ आहे. हा खेळ ज्याला उत्तम समजून घेता येयील तो ह्या शास्त्रात निश्चित प्रगतीपथावर जाईल.

विवाह झाला पण मुल होत नाही, ते कधी होईल ? बघा विवाह झाला म्हणजे त्यासंबंधित असणारी दशा लागली म्हणून विवाह झाला पण पुढे अपत्य प्राप्तीसाठी सध्याची दशा अनुकूल नाही म्हणून अपत्य होण्यासाठी विलंब होतो. पटतंय ना? म्हणूनच विवाहमिलन करताना नुसते गुण जमवून काय उपयोग , पुढच्या दशाही बघाव्या लागतात. 

प्रत्येक दशा आयुष्यात सर्व काही देणार नाही . ज्या भावांशी दशा स्वामी निगडीत आहे त्याच संबंधातील फळ आपल्याला मिळेल. उदा एखादी दशा परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्तम पण ह्याच दशेत नोकरी मिळणार नाही कारण ह्या नोकरीच्या दशा नाहीत. अगदी असेच नाही जर ती व्यक्ती अध्ययन क्षेत्रात असेल तर त्या क्षेत्रात नोकरी मिळू शकेल. पण तेच क्षेत्र असेल तर आणि तरच. नवं भावाची दशा दशमाचे फळ देणार नाही.  जन्मल्यापासून व्यक्ती व्यसनाधीन नसते, ठराविक घटनांचा परिणाम होऊन त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही , ते दुःख पचवता येत नाही, अनेकदा अपयश सुद्धा पचवता येत नाही म्हणून व्यक्ती व्यसनात स्वतःला गुरफटवून टाकते कारण हेच त्या दशेचे फळ असते.
 
अनेकदा अत्यंत चांगल्या माणसाला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते किंवा अगदी तुरुंगाची हवासुद्धा खायला लागते . अचानक ध्यानीमनी नसताना परदेशात नोकरी मिळते आणि परदेशगमन होते . एखादी दशा आजवरचे सगळे नाते संबंध तोडून मोडून टाकते ,एकटेपणा देते तर एखादी दशा गंभीर आजारपण देवून अंथरुणाला खिळवून ठेवते.

अनेकदा मुले हुशार असतात , आज्ञाधारक असतात पण अचानक काय होते माहित नाही पण आपल्याच धुंदीत राहायला लागतात , उलट बोलायला लागतात , घरी दिलेल्या पैशाचा हिशोब देताना धास्तावतात , अभ्यासातून लक्ष उडते आणि रात्ररात्र मोबाईल आणि घराच्या बाहेर राहायला लागतात . अहो संपूर्ण जीवन ज्या आईवडिलांनी मुलांसाठी राबराब राबून खर्च केले ते अशाने हतबल होणार नाही तर काय होयील ?

नुसती पाच पंचवीस पुस्तके आणि नियम वाचून ज्योतिषी होता येत नाही . त्यासाठी परिस्थितीची उत्तम जाण असावी लागते . एखादा धनिक आपल्या मुलासाठी खूप डोनेशन देऊन त्याला डॉक्टर बनवेल सुद्धा पण समोर रुग्ण आला तर त्याला कावीळ झाली आहे की अजून काही हे त्याला सांगता आले नाही तर सर्व फोल आहे. 

ज्योतिषाने  जातकाला प्रश्न विचारून मागील ग्रहदशानी काय काय दिले ह्याची खात्री करून घ्यावी जेणेकरून पत्रिका बरोबर आहे ना ह्याचाही अंदाज येतो. जसे अनेकदा मागील दशा षष्ठ भावाशी निगडीत होती म्हणून आजारपण दिले पण आता पंचामाची दशा असल्यामुळे डॉक्टरांच्या औषधाचा गुण येवून आजार बरा झालाय .

एखादी दशा भरभरून देईल, आयुष्याचे सोने करेल तर एखादी उध्वस्त करेल, एखादी अंतर्मुख करायला लावेल तर एखादी मान सन्मान आदर यश मिळवून उच्च शिखरावर नेणारी असेल. पंचम भावाची दशा म्हणजे आपल्या पूर्व कर्माची ओळख करून देणारी  मग ती चांगली असोत अथवा वाईट . दशा समजण्यासाठी वर्ग कुंडलीचा सखोल अभ्यास पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही . अनेकदा कृष्णमुर्ती पद्धत ह्यावर अधिक सूक्ष्म प्रकाश टाकू शकते.
 
दशा कुठली आहे हे न पाहता , नुसताच गुरु लग्नात आला आणि रवी सप्तमात आला म्हणून विवाह होईल हे सांगणाऱ्या ज्योतिषांचे भाकीत हमखास चुकते .
सरतेशेवटी एखाद्याचे मन समजायला , त्याच्या आयुष्यावर भाष्य करायला आणि त्याला मार्ग दाखवायला सुद्धा आपल्यावर गुरुकृपा असणे आवश्यक आहे. गुरुकृपा नसेल तर आपण नुसतेच शब्दांचे खेळ करणारे पुस्तकी पांडित्य करू, पण गुरुकृपा असेल तर त्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचा उपाय त्याला सांगून त्याचे जीवन प्रकाशमय करू . प्रत्येक ग्रह नक्षत्र राशी आणि त्यांचे योग ह्यातून हे शास्त्र साकारले आहे, उपायांचेही तेच आहे. 

प्रत्येक वेळी विवाह जमत नाही म्हणून कुंभ विवाह केला तर विवाहयोग जुळून येईल का? असे विचारले जाते. समजून घ्या, असे होत नसते , हाती काही लागत नाही पण पैसे मात्र खर्च होतात. ग्रंथ वाचून ज्ञान मिळेल पण त्याचा संदर्भ समोरच्या पत्रिकेत कसा लावायचा ह्याला गुरुकृपा लागते . गुरुकृपेशिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात उभे राहूच शकणार नाही. गुरु म्हणजे ज्ञान जे आहे म्हणून पत्रिकेचे मर्म समजणार आहे. पंचम अष्टम भावाच्या दशेत व्यक्ती  ज्योतिष शास्त्राचा अभ्यास उत्तम करेल. 

लोक उपाय विचारतात पण हाच उपाय का? ते नाही विचारात . तसेच नेमका कशासाठी हाच उपाय करावा हेही समजून घेत नाहीत . सूर्याला अर्घ्य घाला म्हंटले तर लगेच हो म्हणतील, पण का? ते काय करायचे आहे . असे आहे सर्व . आपल्याकडे पत्रिका आली की तिला नमस्कार करावा कारण ती पत्रिका एका आत्म्याचा प्रवास आहे त्याचे वाचन करताना गुरूंचे स्मरण करावे. त्यांच्याच कृपेने सर्व उत्तम व्हावे अशी प्रार्थना करावी . कारण शेवटी तेच करते करवते आहेत. 

संपर्क : 8104639230

Web Title: Astrology: How planetary positions affect good and bad events in life; Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.