Astrology:राहूची महादशा कशी ओळखावी? त्यावेळी काय त्रास होतो? त्यावर उपाय काय? सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:47 AM2024-07-26T09:47:03+5:302024-07-26T09:48:10+5:30

Rahu Astrology Tips: 'राहू' ला कलियुगाचा राजा म्हणतात. मनाची संभ्रमित अवस्था असेल तेव्हा राहू ची महादशा सुरु झाली हे समजून घ्यावे. त्याबद्दल माहिती आणि उपाय वाचा!

Astrology: How to identify Rahu's Mahadasha? What is the problem at that time? What is the solution? Read in detail! | Astrology:राहूची महादशा कशी ओळखावी? त्यावेळी काय त्रास होतो? त्यावर उपाय काय? सविस्तर वाचा!

Astrology:राहूची महादशा कशी ओळखावी? त्यावेळी काय त्रास होतो? त्यावर उपाय काय? सविस्तर वाचा!

>> अस्मिता दीक्षित (ज्योतिष अभ्यासक)
 
धरसोडवृत्ती, फसवणूक , शेअर मार्केटमध्ये आयुष्यभराचा फटका, होत्याचे नव्हते, चांगला सुरळीत असलेल्या नोकरीत अचानक अडचणी, चांगल्या नातेसंबंधात कायमची दरी, एकमेकात गैरसमजामुळे दुरावा, जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक नुकसान , धोका , वाईट संगती व्यसने , डूख धरून राहणे घराबाहेर राहणे,जवळच्या व्यक्ती अचानक बोलायच्याच बंद होणे, आपल्याला एकटे वाटत राहणे , फोबिया , मनावर सततचे दडपण ह्या गोष्टी आयुष्यात घडत असतील तर राहू कुठेतरी पत्रिकेत डोके वर काढून बसलाय हे निश्चित! 

प्रत्येक ग्रह चांगली वाईट फळे देणारा आहे अर्थात ते आपल्या वैयक्तिक पत्रिकेतील ग्रह दशेवरदेखील अवलंबून आहे. मुळातच स्वरभानू राक्षस देवांच्या पंगतीत वेश पालटून बसला होता म्हणजे फसवणूक, धोका हे राहूचे ब्रम्हास्त्र म्हंटले तर वावगे ठरू नये. चंद्र सूर्याने त्यांचे पितळ उघडे केले म्हणून त्यांच्यावर डूख धरून बसलेला हा राहू, दशा, अंतर्दशा आणि विदशेत बलवान होवून ज्या राशीत ठाण मांडून बसला आहे त्या राशीचे आणि ज्या नक्षत्रात आहे त्याचे फळ देण्यास अति उत्सुक असतो. अमृताच्या एका थेंबावर आयुष्याची, जीवनमरणाची लढाई लढणारा हा राहू संघर्षमय जीवन देतो.
 
राहू अदृश्य स्वरुपात असल्यामुळे आपल्याला कोण फसवत आहे, आपला खरा मित्र कोण आणि खरा शत्रू कोण हे न समजणे, एखादी गोष्ट पटकन मनावर हावी  होणे , एखाद्याच्या शब्दात आपण अगदी सहज गुरफटत जाणे , मती गुंग झाल्यासारखे आकर्षित होणे हाच राहू आहे. 

राहूच्या दशेत माणसाने अत्यंत सावध राहावे. कुठल्याही कागदावर विचार न करता मोठ्यांचा सल्ला न घेता सही करू नये , कुणालाही जामीन राहू नये , कुणावर अगदी कुणावरही विश्वास ठेवू नये. राहू क्षणात विळखा घालतो आपल्या मनाला , आपल्याला विचार करायला वेळ मिळायच्या आधीच गोष्टी घडून गेलेल्या असतात . आपल्या जवळचीच व्यक्ती धोका देते जिच्यावर आपला संपूर्ण विश्वास असतो . अश्या व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्ती , भावंडे , शेजारी , व्यवसायातील लोक , नातेवाईक ह्यांना सुतराम कल्पना येणार नाही इतक्या षडयंत्र करण्यात तरबेज असतात . राहू क्षणिक आहे . कायमस्वरूपी असे काहीच देणार नाही. आपल्या आयुष्याची सर्वात अधिक उलथा पालट राहू दशेतच होते . आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण हतबल होतो . म्हणूनच राहूच्या दशेत समाजात कमी वावरावे , आपल्या गोष्टी गावभर सांगत सुटू नये , स्त्रियांच्या तोंडात काही राहत नाही त्यांनीही सावध राहावे . 

प्रेमप्रकरणातील अपयश अनेकदा राहूच्या विळख्यामुळे येते . प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक वेळीच समजला तर अनर्थ टळतो. केतुला अध्यात्माचा कारक मानले आहे आणि राहू हा फक्त भौतिक सुखाची लालसा देणारा ग्रह आहे हा गैरसमज आहे. राहू म्हणजे रिसर्च , संशोधन आणि त्यामुळे राहू हा आपल्याला ज्योतिष तंत्र मंत्र ह्यामध्ये सखोल अध्ययन  करायला शिकवतो . राहू ने जग जवळ आणले आहे , अनेक औषधे शोधून काढण्यात राहूचा हात आहे . त्याचप्रमाणे एकांत म्हणजे साधना करणे हाही राहूचा स्वभाव आहे. राहूच्या दशेत अनेक लोक उत्तम ज्योतिषी झालेले आहेत . 

संभ्रमित करणारा राहू अध्यात्माची सुद्धा ओढ लावणारा आहे. धार्मिक यात्रा आणि धार्मिकतेची ओळख करून देणारा , गंगा स्नान करवणारा , तीर्थयात्रा घडवणारा सुद्धा आहे. केतूची अध्यात्मिकता अंतर्मुख करते . राहूची अध्यात्मिकता वेगवेगळ्या धार्मिक विषयावर चर्चा संवाद , धार्मिक पुरातन वास्तू मंदिरे ह्यांना भेट देणे तसेच ग्रंथांचे संशोधन करवते. राहू हा फिरता ग्रह असल्यामुळे तो कधी चांगली फळे देयील आणि कधी विध्वंसक फळे देयील हा अभ्यास महत्वाचा आहे. राहू ज्या भावात असेल त्या भावेशाची फळे देयील. 

पंचम भाव हा पूर्व कर्म दर्शवतो म्हणूनच पंचम भावात स्थित ग्रहाची दशा आपल्या गत जन्मातील कर्मांची दालने उघडणारच आणि त्याची चांगली वाईट फळे सुद्धा मिळणार . म्हणूनच अकल्पित , आकस्मित घटनांची नांदी राहूच करत असतो कारण ह्या घटना पूर्ण जन्मातील घटनांशी निगडीत आहेत . पंचम भाव संतती त्यामुळे अपत्याकडून त्रास . पंचम भावातील राहू आपली पूर्ण कर्माची फळे देण्यास जेव्हा सिद्ध होतो तेव्हा कुठलेही उपाय चालत नाहीत ,फक्त परमेश्वरच ह्याची तीव्रता कमी करू शकतो कारण हे पूर्ण कर्माशी निगडीत आहेत . केंद्र किंवा त्रिकोणात असलेला राहू कुठल्याही पाप ग्रहानी दुषित नसेल तर त्याच्या दशा , अंतर्दशेत चांगली फळे मिळू शकतात . राहू गोष्टी आकस्मित घडवतो ,ठरवून काहीच नसते . 

राहूचे कारकत्व समजून घेणे हा एक अभ्यास झाला पण तो आपल्या कुंडलीमध्ये कश्याप्रकारे फळ देयील हे पाहण्यासाठी राहू ज्या भावात आहे तो भावेश , राहूचे नक्षत्र , राहूवर असणारे इतर ग्रहांचे योग , दशा आणि गोचर हे सर्व अभ्यासावे लागते . राहूचे कारकत्व कुठेतरी वाचून अर्धवट ज्ञानाने तसेच्या तसे पत्रिकेला लावण्याची चूक अभ्यासकांनी कधीही करू नये .

संपर्क : 8104639230

Web Title: Astrology: How to identify Rahu's Mahadasha? What is the problem at that time? What is the solution? Read in detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.