Astrology: आपल्या नशिबात 'महाभाग्य राजयोग' तयार होत आहे हे कसं ओळखायचं? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:03 AM2024-07-30T09:03:53+5:302024-07-30T09:04:21+5:30
Astro Tips: कुंडलीतील राजयोग तुम्हाला सिकंदर बनवतो, संपत्ती, प्रसिद्धी आणि प्रेम लुटवतो, पण तो भाग्यात आहे की नाही हे कसं ओळखायचं ते पाहू!
राजयोग असणे हे महाभाग्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग असतो त्याला आपल्या जीवनात संपत्ती, कीर्ती आणि अपार प्रेम मिळते. जेव्हा स्वर्ग, सूर्य आणि चंद्र विषम राशीमध्ये स्थित असतात (मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु किंवा कुंभ) तेव्हा राजयोग तयार होतो. अर्थात या गोष्टी ज्योतिष शास्त्र अभ्यासणाऱ्यांना कळू शकतील. पण सर्व सामान्यांनी हे कसे ओळखायचे? ते जाणून घेऊया. तत्पूर्वी राजयोगाबद्दल सविस्तर माहिती पाहू.
आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी आपण प्रयत्नही करतो. पण स्वप्नपूर्ती प्रत्येकाचीच होते असे नाही. सर्वांनाच चांगले-वाईट दिवस सहन करावे लागतात. परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ज्या लोकांच्या कुंडलीत महाभाग्य योग असतो त्यांना जीवनात प्रत्येक प्रकारचे यश मिळते. तर हा महाभाग्य राजयोग म्हणजे काय आणि कुंडलीत कधी तयार होतो हे जाणून घेऊया.
महाभाग्य राजयोग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रात, महाभाग्य राजयोग हा सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय योगांपैकी एक मानला जातो. नावाप्रमाणेच, 'महा' म्हणजे 'मोठा' आणि 'भाग्य' म्हणजे 'नशिबाने मिळणारे यश'. म्हणून महाभाग्य योग असणाऱ्या व्यक्तीला जीवनात अपार सौभाग्य प्राप्त होते. हा योग इतका शुभ आहे की, माणसाला जे हवे असेल ते मिळते. हे एक दुर्मिळ संयोजन आहे, जे व्यक्तीला रंकाचा राव बनवू शकते.
कुंडलीत महाभाग्य राजयोग कसा तयार होतो?
जेव्हा नभो मंडलात, सूर्य आणि चंद्र विषम राशीमध्ये स्थित असतात (मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु किंवा कुंभ) तेव्हा महाभाग्य योग तयार होतो आणि दिवसा जन्मलेल्या व्यक्तींच्याही नशिबात महाभाग्य योग तयार होतो. असे मानले जाते की सूर्य व्यक्तीचे भाग्य उजळून टाकण्यास मदत करतो, परंतु जर व्यक्तीचा जन्म रात्री झाला असेल आणि त्या वेळी पौर्णिमा असेल तरीदेखील महाभाग्य योग विशेष फलदायी ठरतो. फरक एवढाच असेल की जर एखाद्या व्यक्तीचा जन्म पौर्णिमेच्या रात्री झाला असेल तर चंद्र त्यांच्या भाग्याचा रक्षक असेल, तर स्त्रियांसाठी असे म्हटले जाते की जर व्यक्तीचा जन्म रात्री झाला असेल आणि रवी उच्चीचा असेल, तसेच चंद्र एकाच राशीत स्थित असेल तर महाभाग्य योग येतो आणि जर सूर्य स्वतःच्या राशीत सिंह किंवा मेष स्थित असेल आणि दिवसा जन्म झाला असेल तर महाभाग्य योगाचा प्रभाव प्राप्त होतो. ही झाली ज्योतिष शास्त्रीय माहिती. आपण सर्वसामान्यपणे महाभाग्य राजयोग कसा ओळखता येईल ते पाहू.
जेव्हा कुंडलीत महाभाग्य राजयोग असतो तेव्हा व्यक्तीमध्ये ही वैशिष्ट्ये असतात.
>> एखाद्याचे नशीब अचानक फळफळू लागते. वेगाने प्रगती होते आणि पैसा व प्रसिद्धी हातात हात घालून येतात तेव्हा कुंडलीत महाभाग्य राजयोग तयार होत असतो.
>> कालपर्यंत सर्वसामान्य असलेली व्यक्ती एखाद्या कृतीने किंवा आजवर केलेल्या मेहनतीने अचानक प्रकाशझोतात येते आणि सर्वांना आपल्या यशाने आश्चर्य चकित करते. तेव्हा महाभाग्य राजयोग तयार झालेला असतो.
>> आजवर किरकोळ कामात शंभर अडथळे येणारी व्यक्ती एकाएक विनाअडथळ्यांनी वाटचाल करू लागते तेव्हाही महाभाग्य राजयोग तयार झालेला असतो.
>> परदेशात जाण्याची संधी मिळणे आणि परदेशात गेल्यावर सगळ्याच गोष्टी नवीन असताना अचानक मदतीला आपुलकीची माणसं भेटणे हेदेखील महाभाग्य राजयोगाचे लक्षण समजावे.
>> हात लावू तिथे सोने, या गोष्टीचा प्रत्यय येणे अर्थात ज्या कामाला सुरुवात करू त्यात यश मिळणे, हेदेखील महाभाग्य राजयोगाचे लक्षण समजावे.
>> महाभाग्य योगात जन्माला आलेली व्यक्ती रूपवान, गुणवान आणि धनवान असते आणि आयुष्य ऐषोआरामात जगते. त्यांना जन्मतः लक्ष्मीचे वरदान लाभते.
>> या योगात जन्मलेली व्यक्ती दयाळू, धार्मिक आणि तत्वज्ञानी असते. त्या व्यक्तीला एक समृद्ध कुटुंब, चांगले चारित्र्य आहे, तल्लख बुद्धी आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाने इतरांना प्रभावित करण्याची क्षमता प्राप्त होते.
यापैकी कोणत्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर तुम्ही पुढचा काळ महाभाग्य राजयोगाचा अनुभव घेणार आहात असे समजायला हरकत नाही!
टीप : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.