Astrology: मनाचा चंद्राशी आणि चंद्राचा आयुर्वेदाशी कसा घनिष्ट संबंध आहे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 07:00 IST2024-12-09T07:00:00+5:302024-12-09T07:00:01+5:30

Astrology: पौर्णिमा-अमावस्येचा जसा भरती ओहोटीवर परिणाम होतो, तसा आपल्या मनाचा, आयुर्वेदाचाही चंद्राशी निकटचा संबंध आहे, कसा ते पहा!

Astrology: Know how the mind is closely related to the Moon and the Moon to Ayurveda! | Astrology: मनाचा चंद्राशी आणि चंद्राचा आयुर्वेदाशी कसा घनिष्ट संबंध आहे ते जाणून घ्या!

Astrology: मनाचा चंद्राशी आणि चंद्राचा आयुर्वेदाशी कसा घनिष्ट संबंध आहे ते जाणून घ्या!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आकाशात दुडूदुडू धावणारा चंद्र कधी आपल्या मनाची कळी खुलवतो तर कधी ती कोमेजून टाकतो . चंद्र म्हणजे मन आणि मन स्थिर तर सर्व चांगलेअसते  . चंद्र एका जागी फार वेळ थांबत नाही अगदी तसेच आपले मन , कधी इथे तर तिथे भरकटत जाते. मन शांत असेल तर माणूस नीट विचार करू शकतो नसेल तर अविचारांचे थैमान मनात असते . चंद्राला सर्व राशीतून आणि त्यातील प्रत्येक नक्षत्रातून भ्रमण करायला जवळजवळ महिना लागतोच . चंद्र हा वनस्पतींचे नेतृत्व करतो . वनस्पती म्हणजे जीवन . आयुर्वेद ह्या शास्त्राचा ज्योतिषाशी पर्यायाने चंद्राशी संबंध आहे कसे ते पाहू .

औषधे तयार करण्यासाठी वनस्पतीचा वापर केला जातो . पूर्वी आजच्यासारखी औषधे नव्हती , तेव्हा वैद्यबुवा असत आणि त्यांना वनस्पतींचे संपूर्ण सखोल ज्ञान असे. मग हि वनस्पती घ्या त्याचे इतके वळसे उगाळा आणि दुधातून मधातून घ्या असे ते सांगत असत. प्रत्येक नक्षत्राला एक आराध्य वृक्ष दिलेला आहे ज्याचा  त्या नक्षत्राशी काहीतरी संबंध आहे म्हणून दिला आहे. त्या वृक्षाच्या मुळी , पारंब्या पाने , खोड, फुले , फळे  ह्याचा उपयोग औषधात होतो. 

मृग नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र आहे , त्याचा घश्यावर अंमल आहे .त्याचा वृक्ष आहे खैर . त्यापासून बनवली जाणारी कंठ्सुधार वटी ज्यात प्रामुख्याने असतो तो खैर म्हणजे कात . वृषभ राशी ही कुटुंबस्थानात येणारी राशी जिथे आपली पंचेंद्रिये आहेत , आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी आपला आवाज वाचा ह्याबद्दल सांगणारी हि राशी आहे. खाखा खाल्ले तर मधुमेह सारखा आजार होवू शकतो आणि तो बरा होण्यासाठी इथे आराध्य वृक्ष जांभूळ आहे. जांभळाचा रस हा मधुमेहावर गुणकारी असतो.

आयुर्वेद आणि ज्योतिष एकमेकांशी कसे संबंधित आहेत ह्याची ही उदा देता येतील.  चंद्र हा नैसर्गिक शुभ आणि स्त्री ग्रह आहे . मातेला चंद्रा चीच उपमा दिली जाते . स्त्रीचा रजोधर्म सुद्धा चंद्राशी म्हणजेच मनाशी निगडीत आहे. मानसिक दृष्टीने अत्यंत सुदृढ स्त्रीचा राजोधर्म वेळेत येतो . मुलाला जन्म दिल्यावर स्त्रीला पान्हा फुटतो त्याचाही चंद्राशी जवळचा संबंध आहेच की! स्त्रीने दडपण घेतले तर फुटलेला पान्हा आटू शकतो म्हणूनच स्त्रीने मन शांत ठेवावे तसेच घरच्यांनीही घरातील  वातावरणात चांगले ठेवावे जेणेकरून बाळंतपण सुखरूप होवून बाळ सुद्धा निरोगी होईल असे सांगितले जाते. 

चंद्र म्हणजे मन ह्यासाठी खालील उदा देता येतील ....

तोच चंद्रमा नभात , कवी मनाने केलेले चंद्राचे वर्णन , जिथे सागरा धरणी मिळते , प्रेयसीची आपल्या प्रियकराकडे असलेली भावनिक ओढ , ये चांद खिला ये तारे हसे ... प्रणयाचा रंगात बहरून मोहरून जाणारी प्रेमी युगुलाची रात्र, चंद्र आहे  साक्षीला म्हणत आपल्या प्रियकरावर प्रेमाची बरसात करणारी प्रेयसी ,  चंदा है तू मेरा सुरज है तू म्हणत आपल्या डोळ्या समोरून एक क्षणभर सुद्धा आपल्या लेकाला दूर न करणारी आई . आपल्या मनाचे विविध मूड दर्शवणारी हि गाणी डोळ्यासमोर आणली तर मानवी मनाचे किती न मोजता येणारे कंगोरे आहेत ह्याची जाणीव होईल .

चंद्र कधी इथे तर कधी तिथे . एक साधी घटना मनाला स्पर्श करते आणि डोळ्यातून अश्रू येतात आणि एखादी आनंदी करणारी शुभ घटना पण डोळ्यातून अश्रू काढते , दोन्ही घटनांमध्ये कारण वेगवेगळे असते . एखादा क्षण निराशेच्या गर्तेत ढकलतो जिथून परत येण्याचा अनेकदा मार्गच नसतो.  मानवी मन मोठे विलक्षण आहे आणि त्याचा थांगपत्ता कदाचित सृष्टीच्या निर्मात्यालाही समजणार नाही. करोडो मैल दूर असणारा हा चंद्र पृथ्वीवरील अथांग जलाशयला भरती ओहोटी आणतो त्याच्यासमोर नतमस्तक नाही होणार तर काय.   

आपल्या मनातील कोमल हळुवार भावना ,प्रेम माया , चंचलता , अधीरता सर्व काही वेळोवेळी प्रगट करणारा हा “ चंद्र ”. मनाने एखादी गोष्ट ठरवली की माणूस ते करतोच करतो . मनाचे आणि चंद्राचे घनिष्ठ नाते आणि त्याचे पदर उलगडून दाखवण्यासाठी  हा लेखन प्रपंच . 

Web Title: Astrology: Know how the mind is closely related to the Moon and the Moon to Ayurveda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.