Astrology : शनी वक्री, मंगळ वक्री, ऑक्टोबरपासून गुरुही वक्री; सुरू होणार अडथळ्यांची शर्यत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 07:00 AM2024-09-21T07:00:00+5:302024-09-21T07:00:02+5:30

Astrology Tips: कोणताही ग्रह वक्री गेला की अधिक बलवान होतो आणि अडचणी निर्माण करतो, वर्षाखरेच्या टप्प्यावर ३ ग्रह वक्री जात आहेत, सावधान...!

Astrology: Saturn retrograde, Mars retrograde, Jupiter also retrograde from October; The obstacle race will begin! | Astrology : शनी वक्री, मंगळ वक्री, ऑक्टोबरपासून गुरुही वक्री; सुरू होणार अडथळ्यांची शर्यत!

Astrology : शनी वक्री, मंगळ वक्री, ऑक्टोबरपासून गुरुही वक्री; सुरू होणार अडथळ्यांची शर्यत!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

ह्या वर्षा अखेरीच्या अत्यंत महत्वाच्या ग्रहस्थिती बद्दल थोडा विचार करुया. ऑगस्ट २६ ला मंगळ ग्रहाने मिथुन ह्या आपल्या शत्रूराशीत प्रवेश केलाय. विचारवंतांच्या राशीतील ऍक्शन प्लानेट काय  काय करणार आहे ह्याकडे संपूर्ण ज्योतिष जगताचे लक्ष आहे.  

मंगळाला आपण सेनापती म्हंटले आहे , समोरच्या शत्रूचा नि:पात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणे ह्यात तरबेजपणा,  धडाडी , जिद्द ,मुत्सद्देपणा , साहस, पराक्रम  ह्यासोबत अनेकदा अविचार, उतावीळपणा ह्यामुळे मंगळ अमंगळ करतो . कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी वाईट . मंगळ सुस्थितीत असेल तर अशा व्यक्तीची कार्यक्षमता उत्तम असते. बुध हा जितका विचारी तितकाच मंगल अविचारी आणि म्हणून बुधाच्या ह्या राशीत त्याला कसेनुसे होते. बुधाची मिथुन राशी ही राजकुमाराची म्हणजेच एका बालकाची राशी आहे ,कन्या राशीसारखी परीपक्वता ह्यात नाही. बालक हट्टी असतेच त्यात मंगलाची भर म्हणजे बोलणेच खुंटले. पत्रिकेत मिथुन राशीत मंगळ दिसला तर  ती व्यक्ती प्रमाणाबाहेर हट्टी असणारच. मिथुन राशीतील आणि मिथुन नवमांशातील मंगल अजिबात चांगली फळे देत नाही.
  
मंगळ हा पुरुष ग्रह असून तामसी आहे . पापग्रह आहे . मंगळाला भौम म्हणजेच भूमिपुत्र म्हंटलेले आहे . त्यामुळे जमीन जुमला , भावंडे , शेजारी सावत्र आई चे आयुष्यातील अस्तित्वावर बोलतो . मंगळ अत्यंत उतावीळ आहे त्याच्याकडे धीर नाही तर प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अत्यंत अधीर आहे. डोके बाजूला ठेवायचे आणि निर्णय घ्यायचे किंवा बोलायचे ह्यात मंगळ अग्रगण्य असल्यामुळे अनेकदा भांडणे वादविवादाची स्थिती निर्माण होते . सध्या तेच आहे कारण मंगळ बुधाच्या राशीत नाखूष आहे.
 
मेदनिय ज्योतिषाचा विचार करता वादळे , मोठे भूकंप आणि त्यात झालेली जीवितहानी , मंगळाच्या हाती शस्त्र असल्यामुळे युद्ध जन्य स्थिती , अतिरेकी कारवाया , मंगळ रक्ताचा कारक त्यामुळे हिंसाचाराचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारा रक्तपात या घटना घडतात. ग्रह वक्री झाला की बलवान होतो आणि त्याची फळे सुद्धा तितकीच त्रासदायक असतात. मंगळ अंदाजे दोन महिन्याच्या काळापर्यंत वक्री अवस्थेत असतो . ह्या काळातील वैयक्तिक स्तरावरील तसेच जागतिक , सामाजिक स्तरावरील स्थिती अभ्यासण्याजोगी असते आणि अभ्यासकांनी ह्या सर्व नोंदी करून ठेवाव्यात .

पृथ्वीपासून कोटी मैल दूर असणारा मंगळ हा पृथ्वीच्या कक्षेजवळ असणारा पण बहिर्वर्ती ग्रह आहे . मिथुन राशीतून मंगळ कर्क राशीत २१ ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे . तिथे त्याला नीचत्व प्राप्त होईल . कर्क राशीतच मंगळ ११ अंशावर डिसेंबर ७ रोजी पुष्य नक्षत्रात आणि तुळ नवमांशात वक्री होणार आहे . पुढे वक्री अवस्थेतच २२ जानेवारीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल आणि २३ फेब्रुवारी रोजी मार्गस्थ होईल. थोडक्यात ७ डिसेंबर ते २३ फेब्रुवारी ह्या काळात मंगळ वक्री असणार आहे . २१ ऑक्टोबरला मंगळ कर्क राशीत नीच होत आहे आणि लगेच २५ ऑक्टोबर पासून मंगळाची गती २२ कला होते आहे . कर्क राशीतून मंगळ कुंभ राशीतील शनीवर दृष्टी टाकेल तसेच रवी बुध वृश्चिक राशीत आले कि शनीच्या दृष्टीत असतील . वातावरण असे असल्यावर नामस्मरण वाढवा इतकेच म्हणावे लागेल. शनी मंगळ षडाष्टकात आणि मंगल स्तंभी , वक्री अपघातांचे प्रमाण वाढेल , शस्त्रापासून  भय, आगीचे भय आणि शस्त्रक्रीयांचेही प्रमाण वाढू शकेल. 

मंगळ म्हणजे थोडक्यात Aggression  , उतावीळ पणे घेतलेले निर्णय , जोश होश.  मंगल म्हणजे घातपात  , डोक्यात राग घालून घेणे आणि त्या रागाच्या भारत अविचारी कृत्ये करणे . मंगळ हा अग्नी तत्वाचा तामसी  ग्रह आहे. पेटून उठणारा , अन्याय विरुद्ध दोन हात करताना प्रचंड राग डोक्यात घालून घेणारा . लहान मुल कसे मनाविरुद्ध काही झाले कि जमिनीवर डोके आपटून घेते तसेच . रागाचा उद्रेक हा मंगळ करणार . सामाजिक व्यवस्थेत पोलीस यंत्रणेला सुसज्ज राहावे लागेल. आगी लागणे , भांडणे , प्रचंड मानसिक त्रास , रक्ताच्या संबंधित विकार , बिपी वाढणे , रक्तदोष , शरीरातील ज्वर वाढणे .वेरीकोज वेन्स , डोळ्यांचे आजार , मानसिक ताण त्यामुळे होणारी डोकेदुखी वाढेल . प्रचंड वादविवाद होतील आणि त्यामुळे रागाचा ईर्षेचा उद्रेक होईल . आगी लागतील , स्वयपाकघरात सुद्धा काम करताना सांभाळावे लागेल. जनसामान्यांत प्रक्षोभ , संताप होयील. 

मंगळ वक्री स्तंभी असताना जे परिणाम होतात ते दूरगामी होतात त्यामुळे ह्या काळात वाद टाळणे हिताचे ठरेल . आपल्या शब्द संपदेचे नको तिथे प्रदर्शन करून नको ती संकटे ओढवून घेवू नका .  उच्च शिक्षण घेतलेले आपले सगेसोयरे , आप्तेष्ट मित्र किंवा इतर कुणीही असोत ह्यांची अक्कल काढू नका म्हणजे मानहानी तरी टळेल . ह्याचे कारण चर्चा करून सामंजस्याने एखादा प्रश्न सोडवावा हा मुळात मंगळाचा स्वभाव नाही . मोठा आवाज करून शिवराळ भाषेत बोलणारा हा सेनापती आहे . काय आहे ते सर्व मलाच समजते आहे इतर सर्व बिनडोक असल्या भ्रमात राहिलात तर आयुष्याच्या सारीपाटावरून कायमचे दूर फेकले जाल . 

मग करायचे काय ? पुढील ६ महिने गप्प बसायचे हीच मोठी साधना आहे , बघा जमतंय का? ह्याचा शब्दशः अर्थ नाही हे मी वेगळे सांगायला नको. भरपूर पाणी प्या . ज्यांना बिपी चा त्रास आहे त्यांनी बोलण्याच्या बाबतीत अतिसाहस टाळावे.  स्वतःला आणि कुटुंबाला जपा . सत्तापालट होताना होणारा हिंसाचार , एक घाव दोन तुकडे कुणाच्याच फायद्याचे नसतात.  अत्यंत चक्रम डोक्याची मुले जी घरात कुणाचेही ऐकत नाहीत विशेष करून मिथुन राशीतील मंगळ असेल त्यांच्याकडे जातीने लक्ष ठेवा . 

नैसर्गिक कुंडलीत मिथुन राशी ही तृतीय स्थानात येते आणि ती संवादाची राशी आहे तसेच तिथून डावा कान , कागदपत्रे बघितली जातात . बोलताना , लिहिताना आणि कुठे सही करताना विचारपूर्वक कृती केली पाहिजे . सतत कानात हेड फोन घालून बसू नका . तृतीय भाव हा प्रवास दर्शवतो आणि मंगळ वेग. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू शकेल. अति वेगाने वाहन चालवणे आणि रस्त्यात भांडणे करणे टाळा.

राहू शनी दशा असलेल्या लोकांनी मुळात समाजात कमी वावरावे .काही लोकांचा राजकारण हा श्वास आहे त्यांना २४ तास दुनियादारी करायची असते त्यांना विशेष सतर्कतेचा इशारा आहे. एखादे प्रकरण अंगावर शेकेल आणि कुणीतरी पोलिसात जाईल इथवर वेळ आणू नका. व्यक्तिगत कुंडलीत वक्री मंगळाची फळे भोगावीच लागतील ह्यात शंका नाही .  ह्या शास्त्रावर विश्वास नसलेल्या लोकांना आता मंगळ काय चीज आहे ते दाखवेल . पत्रिकेत मंगळ कुठल्या भावांचा कारक आहे , नवमांश बळ , षडबल किती आहे. त्यावरील पापग्रहांच्या दृष्टी , दशा आणि लग्न किती बलवान आहे ह्यावर ह्याचे परिणाम अवलंबून आहेत आणि जे होतील ते दूरगामी हे नक्की.  

अनेकदा स्वतःच्या आत डोकावून पहायची वेळ येते ..ती आत्ताच आलेली आहे . शनी वक्री, मंगल वक्री, ऑक्टोबर पासून गुरुही वक्री... अडथळ्यांची शर्यत आहे. मग काय आपण श्वास घ्यायचा नाही की काय ? घ्यायचा पण त्यांचे बोट धरून .... साधनेला लागा जे करत आहेत त्यांनी वाढवा ....कुठल्या शब्दाने कुठले संकट ओढवेल सांगता येणार नाही ....सूज्ञास सांगणे न लगे.

उपाय :

१. दर मंगळवारी मारुतीला जाऊन त्याच्या पायावर चिमुटभर शेंदूर अर्पण करावा.
२. हनुमान चालीसा नित्य पठण करावे. 
३. कष्ट करताना कसूर नको. 
४. आवश्यकता नाही तिथे गप्प बसावे, कमी बोलावे.  
५ मंगळ भाऊबंदकी करवेल, वाद होतील. मनातील मत्सराची ज्योत जितकी मोठी तितकी लक्ष्मी मिळवणे दुरापास्त होईल. सबुरीने घ्या. 
६. मौनं सर्वार्थ साधनं, हे ज्याला समजले तो जिंकला. 

सारांश असा की ग्रहस्थिती बदलत राहणार आहे पण ह्या काळात आपल्या कडून कुणी दुखावले गेले तर पुन्हा जवळीक साधता येईलच असे नाही . आपल्या स्वभावाला अनेकदा आयुष्यात मुरड घालावी लागते , नाती संबंध जपावे लागतात. हा आपल्या परीक्षेचा काळ आहे म्हणूनच जो उपासनेची कास धरेल तो ह्यातून पार होणारच.

संपर्क : 8104639230

Web Title: Astrology: Saturn retrograde, Mars retrograde, Jupiter also retrograde from October; The obstacle race will begin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.