बॉसची कृपादृष्टी, मनासारखी वेतनवाढ, पदोन्नती शक्य? हो! सुरू आहे अप्रायझल कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:07 PM2022-04-20T15:07:10+5:302022-04-20T15:08:43+5:30

ज्योतिषशास्त्रात नोकरी, करिअरमध्ये यश, प्रगती साध्य करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. नेमके काय करावे? जाणून घ्या...

astrology tips for speedy progress in job and career and to develop good relations with boss at appraisal time | बॉसची कृपादृष्टी, मनासारखी वेतनवाढ, पदोन्नती शक्य? हो! सुरू आहे अप्रायझल कालावधी

बॉसची कृपादृष्टी, मनासारखी वेतनवाढ, पदोन्नती शक्य? हो! सुरू आहे अप्रायझल कालावधी

Next

ज्योतिषीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना विशेष मानला गेला असला तरी आणखी एका कारणासाठी तो महत्त्वाचा मानला जातो. नोकरी, कार्यक्षेत्र, करिअरच्या बाबतीतही एप्रिल आणि पुढील एक ते दोन महिने महत्त्वाचे मानले जातात. कारण याच कालावधीत बहुतांश कंपन्यांमध्ये अप्रायझल म्हणजेच मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू केली जाते. यावरून वेतनवाढ, पदोन्नती, बदली ठरत असते. हा कालावधी नोकरदारांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यावर पुढचे भवितव्य अवलंबून असते. ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले जातात, ते या अप्रायझल कालावधीसाठी उपयुक्त ठरू शकतात. 

एप्रिल आणि पुढील दोन महिने मूल्यमापनाचा कालावधी असतो. वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ पदोन्नती व वेतनवाढीच्या रूपाने मिळते. पण कधी-कधी मेहनत करूनही फळ मिळत नाही, तेव्हा निराशाच होते. यामागे ग्रहस्थिती, ग्रहदोष असू शकतो, असे सांगितले जाते. असे काही ग्रह आहेत, ज्यांचा आपल्या प्रगतीशी थेट संबंध आहे. या ग्रहांचे उपाय केल्यास कुंडलीतील ग्रह मजबूत होऊ शकतात आणि त्याचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो, असे मानले जाते. मात्र, त्यासोबतच प्रामाणिकपणे काम करणे, आपल्या कामांमध्ये १०० टक्के योगदान देणे, दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक ठरते. तुमच्या कर्मासोबत भाग्य आणि नशीबाची साथ यश, प्रगती साध्य करून देऊ शकते, असे सांगितले जाते. 

बॉसशी चांगले संबंध ठेवण्यासाठी शुभ ३ ग्रह असणे आवश्यक

नोकरी, कार्यक्षेत्रात जलद प्रगती करण्यासाठी आणि बॉसशी चांगले संबंध ठेवण्यासाठी शुभ ३ ग्रह असणे आवश्यक आहे. हे ग्रह सूर्य आणि राहू-केतू आहेत. सूर्य करिअर, कार्यक्षेत्र, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. सूर्य गुरुकारकही असल्याचे म्हटले जाते. बॉसही गुरू, मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. जर तुमचा सूर्य बलवान असेल, तर बॉससोबत चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतील. तसेच तुम्हाला त्याच्याकडून खूप काही शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. दुसरीकडे, राहू आणि केतू हे असे ग्रह आहेत की जर ते अशुभ असतील तर ते तुमचे बॉससोबतचे नाते बिघडू शकते. त्यासाठी राहु-केतुचे उपाय उपयुक्त ठरू शकतात. 

सूर्य बलवान होण्यासाठी काय उपाय करावे?

सूर्याचे कुंडलीतील स्थान महत्त्वाचे मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य अनुकूल नसेल, तर त्या व्यक्तीला १२ रविवार सूर्याचे व्रत करण्याचा सल्ला दिला जातो. काळी लवकर उठून सूर्योदयाला सूर्य देवतेला अर्घ द्यावे. सूर्य मंत्रांचा जप करावा. ज्येष्ठांचा आदर करावा. आदित्य हृदय स्तोत्र वाचावे. सूर्याचे रत्न माणिक धारण करावे. मात्र, त्याची योग्य पद्धत, धारण करण्याचा विधी, यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्यावा.

राहु-केतुच्या शुभ प्रभावासाठी काय करावे? 

राहु-केतु छाया ग्रह मानले गेले असून, त्याचा प्रभाव बुद्धीवर होतो, असे म्हटले जाते. राहु-केतुचा सकारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी नकारात्मक विचारांचा परिणाम आपल्यावर होऊ न देण्याचा प्रयत्न करावा. आशावादी राहावे. सकारात्मकता येण्यासाठी आपल्या आराध्य देवतेचे यथाशक्ती नामस्मरण, जप करावा. धैर्याने परिस्थिती हाताळावी. हाती घेतलेले काम उत्तमरितीने कसे करता येईल, यावर भर द्यावा, असे संगितले जाते. तसेच पूजा-अर्चा करताना चंदनाचा प्रामुख्याने वापर करावा. चंदनाची अगरबत्ती, धूप यांचा समावेश पूजनात करावा. तसेच दानधर्म करण्याचा सल्ला दिला जातो. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 
 

Web Title: astrology tips for speedy progress in job and career and to develop good relations with boss at appraisal time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.