Asrology Tips: जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या वाढू नये म्हणतात, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 01:10 PM2023-01-30T13:10:29+5:302023-01-30T13:11:07+5:30
Health Tips: सम-विषम संख्येचे महत्त्व धर्मशास्त्रातही पाळले गेले आहे. यात आहारशास्त्राचा समावेश का आणि कसा झाला ते पाहू
'तीन तीगाडा काम बिघाडा', 'तेरड्याचा रंग तीन दिवस', 'नव्याचे नऊ दिवस', 'दुष्काळात तेरावा महिना' अशा म्हणी आपण ऐकल्या आहेत, यावरून आपल्या पूर्वजांना विषम संख्येबाबत आलेले अनुभव या साहित्यातून डोकावतात. म्हणून विशिष्ट बाबी वगळता त्यांनी समतेचा पुरस्कार केला आहे. म्हणून वास्तुशास्त्र असो नाहीतर ज्योतिष शास्त्र सम संख्येला अधिक महत्त्व असल्याचे दिसून येते. तीच बाब आहारशास्त्राबाबत सांगितली जाते ती अशी-
ज्योतिषशास्त्रानुसार :
ज्योतिष शास्त्रात तीन क्रमांक शुभ मानला जात नाही. उपासनेत किंवा दैनंदिन जीवनात देखील तीनाऐवजी चाराला आपण प्राधान्य देतो. याउलट श्राद्धाच्या पूजेत, स्वयंपाकात, मंत्रोच्चारणात विषम संख्येने गोष्टी केल्या जातात. अगदी जेवणाच्या ताटातही तीन पोळ्या वाढल्या जातात. त्यामुळे इतर वेळी तीन पोळ्या वाढणे शास्त्राने निषेधार्थ ठरवले आहे.
आरोग्यशास्त्रानुसार :
तसे पाहिले तर जेवणात तीन पोळ्या एकत्र खाऊ नयेत कारण त्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते. शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका वेळी दोन पोळ्या पुरेशा मानल्या जातात. एक वाटी भात, एक वाटी आमटी आणि एक वाटी भाजी एवढे अन्न शरीरासाठी पूरक मानले जाते. पुरेसे अन्न खाल्ल्याने शरीर नेहमी तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहते. याउलट जास्त अन्न खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते आणि आळसही कायम राहतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी हलका आहार घेणे श्रेयस्कर ठरते.
तर्कशास्त्रानुसार :
आपल्याकडे अनेक गोष्टी प्रथा, परंपरा म्हणून पाळल्या जातात आणि पुढे नेल्या जातात. काही गोष्टींना शास्त्राधार असतो तर काही गोष्टी आपापल्या सोयीने बदल करत रुजवल्या जातात. उदाहरणार्थ, वटसावित्रीची पूजा वडाला फेऱ्या मारून करणे शास्त्राला अभिप्रेत असते, जेणेकरून प्राणवायू देणाऱ्या वृक्षाच्या सान्निध्यात महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळावी हा मूळ हेतू, मात्र अलीकडे स्त्रियांनी वडाची फांदी तोडून आणत पर्यावरणाचे नुकसान सुरु केले, त्यात धर्मशास्त्राची काय चूक? तीन पोळ्या एकत्र न वाढण्यामागेही तार्किक कारण हेच लक्षात येते, की सरसकट सामान्य व्यक्ती दोन पोळ्या खाऊन थांबते, जोडीला भात, भाजी, कोशिंबीर, पापड असे इतरही जिन्नस असतात. आग्रहाखातर पानात भरपूर पदार्थ वाढून ठेवले आणि खाणाऱ्याला ते जड झाले तर ते वाया जाऊ नयेत, म्हणून सुरुवातीला मोजक्या प्रमाणात जेवण वाढून नंतर गरजेनुसार पदार्थांचा तसेच पोळ्यांचा आग्रह केला जातो. त्यामुळे अन्नाची नासाडी होत नाही आणि अन्न टाकल्याचे पापही लागत नाही!