Astrology Tips: सर्वबाधा दूर होण्यासाठी होळीला श्रीफळ वाहताना म्हणा 'हा'प्रभावी मंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 01:48 PM2023-03-06T13:48:42+5:302023-03-06T13:49:37+5:30
Holi 2023: होळीत आपण श्रीफळ अर्पण करतो, पण कशासाठी? जाणून घ्या कारण आणि तो अर्पण करावयाचा मंत्र!
नारळाचा वापर पूजेत करताना आपण त्याला श्रीफळ म्हणतो. श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे ऐश्वर्य, समृदधी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ- श्रीफळ म्हणून ओळखले जाते. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्त्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते.
श्रीफळ म्हणजे नारळ. हे शुभनिदर्शक फळ असून ते सृजनशक्तीचे फळ मानलेले आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. लक्ष्मीला नारळ फार आवडतो म्हणून याला श्रीफळ हे बहुमानाचे व आदराचे नाव प्राप्त झाले. हिंदू धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नारळाला अनिवार्य असे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
श्रीफळ होळीत का अर्पण करायचे?
जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर पाने, फुले, फुलवीत नारळ ठेवून पूजेला आसनस्थ व्हायचे असते. नारळात जसे पाणी असते, तसेच आपल्या मनातही ओलावा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना आहे. नारळ हा सद्भावना, सत्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा करतात. याचा कोणताही भाग वाया जात नसल्यामुळे दक्षिण हिंदुस्थानात लोक `हरा सोना' म्हणतात. इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात तर कोकणवासीय नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे कुणालाही देताना तो शेंडीची बाजू पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे.
अर्पण विधी, मुहूर्त आणि मंत्र :
पालघर येथील ज्योतिष अभ्यासक सचिन मधुकर परांजपे लिहितात- सोमवार दिनांक ६ मार्च रोजी होलिका पूजन आहे. त्या दिवशी सबंध घरातून (टॉयलेट्स वगळता) एक नारळ हातात धरुन (शेंडी आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने धरुन) फिरवून तसाच घराबाहेर नेऊन होळीच्या अग्नीत दहन करावा. वेळ रात्री ८.१६ ते रात्री ९.४७ या काळात हे काम करावे.
समजा तुमच्या परिसरात होळी उशीरा असेल तरी नारळ याच काळात फिरवून घराबाहेर नेऊन ठेवावा व नंतर होळीत टाकावा. नारळ फिरवत असताना मनातल्या मनात पुढील मंत्र जपावा-
“ॐ सर्वाबाधा-विनिर्मुक्तो, धनधान्यसुतान्वितः।
मनुष्यो मत्प्रसादेन् भविष्यति न संशयः।।”
हा मंत्र म्हणावा (११/२१/१०८ वेळा म्हणता आला तरी चालेल) या उपायाने घरातील रोगराई, नकारात्मक अदृश्य शक्ती नष्ट होतात. त्यांचे दहन होते असा अनुभव आहे. अनेक घरात दरवर्षी हा उपाय केला जातो...