Astrology Tips: कोणत्या ज्योतिषांनी सांगितलेले भाकीत खरे ठरते? जाणून घेऊ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 09:52 AM2024-08-13T09:52:37+5:302024-08-13T09:53:07+5:30
Astrology Tips: अलीकडे सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक जण भविष्य कथन करतात, पण खरा ज्योतिषी कोण आणि त्यांचे भाकीत खरे कसे ठरते ते जाणून घेऊ.
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपल्या पत्रिकेतील प्रत्येक ग्रहाला दृष्टी आहे . म्हणजेच ते ज्या घरात आहेत त्याच्या बरोबर समोरच्या घरात ते आपली संपूर्ण दृष्टी टाकतात. पण मंगळ, शनी आणि गुरु ह्या ३ ग्रहांना मात्र विशेष दृष्टी प्रदान केली आहे त्याचसोबत राहुकेतुना सुद्धा आहे. आज त्याबद्दल आधी जाणून घेवूया.
आपल्या पत्रिकेतील गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. गुरु ग्रह आकाराने बलाढ्य आहेच, पण त्याला ५,७ आणि ९ अश्या ३ दृष्ट्या दिलेल्या आहेत . म्हणजेच पत्रिकेत गुरु ज्या भावात स्थित असेल तिथून तो तिसऱ्या, पाचव्या आणि नवव्या भावावर दृष्टी टाकणार. गुरूची दृष्टी ही नेहमीच अमृततुल्य आहे . गुरूची पाचवी आणि नववी दृष्टी विशेष मानली जाते.
नैसर्गिक शुभ ग्रहाची दृष्टी त्या भावाला विशेष शुभत्व देणारी ठरते आणि त्यामुळे त्या भावासंबंधी असणारी शुभ फळे मिळतात. पाचव्या दृष्टीला महत्व आहे कारण आपण आपल्या गत जन्मात जे काही पुण्य केले आहे त्याची फळे गुरूची पाचवी दृष्टी आपल्याला देत असते म्हणून त्याची पंचम दृष्टी ज्या भावावर असते त्या भावाची फळे शुभत्वाकडे झुकणारी असतात. पण प्रत्येक लग्नाला हे तसेच घडेल का? तर नाही . शुक्राच्या तुळ लग्नाला गुरु हा तीन आणि सहा ह्या भावांचा कार्येश होतो आणि हे त्रीशडाय भाव आहेत त्यामुळे ह्या लग्नासाठी गुरु हा अनिष्ट ग्रह आहे. गुरूच्या दशेत सर्वच घटना चांगल्या घडतील असे नाही तर गुरु पत्रिकेत कुठल्या भावांचा कारक आहे त्याप्रमाणे फलादेश मिळेल. म्हणूनच गुरूचा सखोल अभ्यास असणे महत्वाचे आहे. पत्रिकेत गुरु अर्थ त्रिकोणात आहे की मोक्ष ? हेही पाहावे लागते . गुरूची फळे त्याचसोबत त्याची दृष्टी भावासोबत बदलणारी असते.
ज्योतिष शास्त्र शिकण्यासाठी गुरु ग्रहाची कृपा असावी लागतेच कारण गुरु म्हणजे ज्ञान आणि दैवी कृपा. प्रत्यक्ष गुरूंचा सहवास लाभणे आणि त्यांच्या सेवेची संधी मिळणे हे परम भाग्याचेच लक्षण आहे. उत्तम ज्योतिषी होण्याचे सुद्धा काही ठराविक योग असतात आणि ह्यात गुरूची कामगिरी किंवा स्थान हे अग्रेसर असते. ज्योतिष हे दैवी शास्त्र आहे. ह्या शास्त्राचे मार्गदर्शन ज्याच्याकडून व्हायचे असेल तिथेच जातकाची पावले वळतात. कुणी ह्या शास्त्राचे अध्ययन करावे हे सुद्धा ठरलेले असते. भविष्य कथन म्हणजे वाणी आलीच, आपले द्वितीय स्था, आपले बोलणे इथे अति महत्वाचे असते. धन भावावर असणारी गुरूची दृष्टी ही ज्योतिष कथनात नक्कीच उपयुक्त ठरते अशा लोकांना वाचासिद्धी असते आणि ते उत्तम ज्योतिष कथन करू शकतात .धनभावातील राशी आणि ग्रह हे देखील तितकेच महत्वाचे आहेत . उत्तम ज्योतिषी होण्यासाठी गुरूची वाचास्थानावरील पंचम दृष्टी त्यांच्या पूर्व जन्मातील पुण्याचे फळ देते. आत्माकारक ग्रह सुद्धा महत्वाचा आणि त्याचा अष्टम भावाशी असलेला संबंध व्यक्तीला व्यासंगी बनवतो . पंचम भाव हा सल्लागाराचा असल्यामुळे पंचम भावावरील गुरूची दृष्टी सुद्धा भविष्य कथनात महत्वाची आहे.
दिव्याखाली नेहमीच अंधार असतो आणि इतरत्र प्रकाश असतो त्याच प्रमाणे गुरु ज्या भावात असतो तिथे त्या भावाने दर्शवलेल्या फळात काहीतरी कमतरता राहून जाते आणि जिथे दृष्टी असते तो भाव उजळला जातो. पत्रिकेतील बुध हा आकलन शक्ती चा कारक आहे. बुध आणि गुरु ह्यांचे शुभयोग व्यक्तीला उत्तम ज्योतिषी होण्यास मदत करतात . ह्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक योग आहेत त्याची माहिती नक्कीच घेत राहूया.
वरील ग्रहांची स्थिती प्रामुख्याने पहिली जाते पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा ग्रहांचे काही योग व्यक्तीला उत्तम ज्योतिष ज्ञान आणि भाकीत खरे ठरवण्यासाठी कार्य करतात . आपल्या आयुष्याचा एकंदरीत प्रवास जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने ह्या शास्त्राचे अध्ययन काही प्रमाणत तरी केले पाहिजे असे माझे मत आहे . अनेक वेळा अपुऱ्या ज्ञानामुळे ज्योतिष जे भविष्य कथन करतात त्याची प्रचीती जातकाला न आल्यामुळे त्याचा ह्या शास्त्रावरील विश्वास कमी होत जातो . त्यामुळे आपल्या स्वतःच्या पत्रिकेचा ज्योतिषाने सुद्धा अभ्यास करावा , आपला व्यासंग वाढवावा . ह्या शास्त्राचे अध्ययन आयुष्याला वेगळा आकार आणि दृष्टीकोन नक्कीच देयील. अपाय निश्चित होणार नाही . भविष्य कथन हि सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे . जातकाचा पिंड , स्वभावाचे दर्शन त्याच्या पत्रिकेतून जेव्हा समोर येते तेव्हा त्याला कशाप्रकारचे मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे हे ज्योतिषाला समजते आणि ते समजले तर एक व्यक्ती म्हणून ज्योतिषी आणि जातक सुद्धा आपापल्या आयुष्यात दोन दोन पावले पुढे जातील.
ज्ञान देणारा आणि घेणारा ह्या दोन्ही साठी असणारी गुरूची भूमिका आज आपण पहिली . म्हणूनच नामस्मरण , आपली स्वतःची साधना उत्तम असेल तरच भविष्य कथन करता येयील ह्यात दुमत नसावे.
संपर्क : 8104639230