Astrology Tips: 'विडा घ्या हो स्वामीराया' असे म्हणत आपण देवाला विडा का अर्पण करतो? त्याचे लाभ जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 03:43 PM2023-02-28T15:43:34+5:302023-02-28T15:44:15+5:30

Swami Samartha: भगवंताला अर्पण केलेला विडा आपला प्रापंचिक आणि पारमार्थिक उद्धार कसा करतो ते जाणून घ्या!

Astrology Tips: Why do we offer Vida to God by saying 'Vida Haya Ho Swamiraya'? Know its benefits! | Astrology Tips: 'विडा घ्या हो स्वामीराया' असे म्हणत आपण देवाला विडा का अर्पण करतो? त्याचे लाभ जाणून घ्या!

Astrology Tips: 'विडा घ्या हो स्वामीराया' असे म्हणत आपण देवाला विडा का अर्पण करतो? त्याचे लाभ जाणून घ्या!

googlenewsNext

भक्त आपल्या आवडीच्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्याचा स्वीकारही करतो. त्यानुसार आपण जसा देवाला नैवेद्य अर्पण करतो, तसा देवाला विडाही दिला जातो. रसिक भक्तांनी त्यावरही सुंदर कवने लिहिली आहेत. जसे की, 

विडा घ्या हो स्वामिराया l भक्तवत्सल करुणालया ll
देतो हात जोडोनियां ll भावें वंदुनिया पायां ll धृ ll
ज्ञानदृष्टी पुगिफळ ll तुमच्या कृपेचे हे बळ ll
मूळ आधार सोज्वळ ll पापी पतित ताराया ll १ ll
भक्तीदळ नागवल्ली ll पाने शुद्धही काढिली ll
नामबळे निर्मळ केली ll सिद्ध झालो जी अर्पाया ll २ ll
रंगी रंगला हा कात ll प्रेमभावाच्या सहित ll
त्याने केले माझे हित ll देह लावियला पायां ll ३ ll
चुना शांती निर्मळ ll त्वांचि दिले भक्तीबळ ll
करुनी मनासी कोमळ ll चरणी घातली ही काया ll ४ ll
वेलची ज्ञानज्योत ll सर्व भूतांच्या विरहित ll
ठेवुनी तुमच्या पायी हेत ll लागे मनासी वळवाया ll ५ ll
लवंग जाणां तिखट खरी ll घेउनी बुद्धीच्या चतुरी ll
क्रोध दवडीयला दूरी ll तूची समर्थ ताराया ll ६ ll
वैराग्याचे जायफळ ll तुम्ही दिले भावबळ ll
करुनी विरक्त निर्मळ ll शिरी ठेवियेली छाया ll ७ ll
पत्री क्षमेची या परी ll बापा मिळविली बरी ll
सदा राहोनी अंतरी ll सुखे सुखविते देहा ll ८ ll
काय बदामाची मात ll फोडुनि द्वैताचा हा हेत ll
वाढावया भक्तिपंथ ll सिद्ध केला करुणालया ll ९ ll
आत्महिताहित कस्तुरी ll घेउनी ज्ञानभक्तीपरी ll
धन्य हिची थोरी ll भविभवात ताराया ll १० ll
आनंद म्हणे केशर सत्य ll तुमचे पायी माझा हेत ll
पूर्ण केले मनोरथ ll कृतीकर्मासी वाराया ll ११ ll

कवनाचे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर पारमार्थिक विडा असल्याचे लक्षात येईल. हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ! त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर दत्ताला, हनुमंताला, रामरायाला, विठुरायाला, साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवने आपल्याला आढळतील. हा झाला पारमार्थिक उद्धार, आता प्रापंचिक उद्धार कसा होतो तेही जाणून घेऊ!

कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वापरणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूची विड्याच्या पानांनी पूजा केली. तेव्हापासून पूजेत विड्याच्या वापर केला जातो. या पानांमध्ये देवी-देवता वास करतात असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत. विड्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही दूर होतात. 

इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानाचे उपाय

>>इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावे. बजरंगबलीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. 

>>विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. ही पाने नकारात्मक शक्तींना शोषून घेतात. म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असे सांगितले आहे. 

>>स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्त गुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. त्यामुळे प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नाते सुधारते. 

>>व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरून, जेवू घालून विडा द्यावा. तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न होते. 

Web Title: Astrology Tips: Why do we offer Vida to God by saying 'Vida Haya Ho Swamiraya'? Know its benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.