Astrology: गुरूचे पाठबळ मिळावे म्हणून ज्योतिष शास्त्रात सांगितलेले सोपे उपाय जरूर करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 02:16 PM2024-11-20T14:16:24+5:302024-11-20T14:17:03+5:30
Astrology: ज्यांच्या कुंडलीत उत्तम गुरूबळ असते त्यांना कोणत्याही क्षेत्रात प्रगतीत बाधा येत नाही, हे गुरूबळ वाढवायचे कसे ते जाणून घेऊ!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
जीवनाच्या अंतापर्यंत अभ्यास करत राहिले तरी परिपूर्ण होता येणार नाही इतके ज्योतिष शास्त्र सखोल आणि समृद्ध आहे. आपल्या पत्रिकेतील बारावा भाव सर्वप्रथम आपल्यापुढे येतात मग त्यात असणाऱ्या राशी आणि सर्वात शेवटी त्यात वसलेले ग्रह. कुंडलीतील गुरूचा भाव आणि परिणाम समजून घेऊ.
प्रथम भाव आपले स्वतःचे अस्तित्व दर्शवतो. जन्माला येतो तेव्हाच हा भाव जागृत होतो. आपले आयुष्य वेगाने पुढे जाते, आयुष्याच्या सर्व अवस्था बालपण , तारुण्य , वृद्धावस्था सर्व काही पार करत शेवटच्या पायरीवर म्हणजेच मोक्षाच्या आणि व्यय भावाच्या पायरीवर आल्यावर येतो तेव्हा शरीर आणि मन दोन्ही थकलेले असते . इथे सर्व काही सोडून पुढे जायचे असते. जो भाव आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी समर्पित करणारा अनुभव देतो तो वाईट कसा असेल, हा विचार केला पाहिजे. पावलांवर जो नतमस्तक होतो तोच मोक्षपदास जातो अन्यथा पुन्हा प्रथम भावात येवून पुन्हा नवा जन्म आणि मग पुनरपि जननं पुनरपि मरणं हेच होत राहणार.
हा व्यय भाव पत्रिकेतील शेवटचा भाव इथे नतमस्तक व्हायचे असते ते जन्म दिलेल्या आपल्या पालकांसमोर, आयुष्यभर साथ देणाऱ्या आणि आपल्याला जीवनाच्या प्रवासात आनंद देणाऱ्या सगळ्यांसमोर आणि सरतेशेवटी आपल्या सद्गुरुंसमोर. आयुष्यात जे जे काही मिळवले ते इथेच सोडून द्यायचे. जोडीला येते ते फक्त आपले कर्म, म्हणूनच जन्मापासून पुण्यसंचय, चांगली वृत्ती, नितळ मन आणि चांगली नियत असेल तर शेवटच्या पायरीवर सुद्धा मोक्षाचा आनंद अनुभवायला मिळतो.
हा मोक्ष भाव म्हणजेच व्यय भाव त्रिक भावात येत असल्यामुळे त्याचा समावेश “ वाईट स्थानातील एक भाव “ असाच होत जातो . पण तो चुकीचा आहे. कसा ते आज पाहूया?
व्यय भावात आपल्याला मोक्ष , तुरुंगवास , दवाखाना , परदेशगमन अनाठायी खर्च अनेक विध गोष्टी ज्ञात होतात . प्रत्येक भाव , राशी आणि ग्रह आपल्यावर अनेक चांगल्या वाईट गोष्टींची उधळण करत असतात. आपले संपूर्ण आयुष्य ऋषी मुनींनी ह्या १२ खिडक्यात अगदी चपलख बसवले आहे . माणसाच्या मनात असा एकही प्रश्न नाही जो ह्या १२ भावांच्या पलीकडे आहे . जे काही आहे ते ह्यातच दडलेले आहे. आपल्याला फक्त ते शोधायचे असते इतकच .
व्यय भावातील ग्रहांच्या बद्दल आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते . तिथले शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह काय फल देतील असे प्रश्न आपल्याला पडत असतात. आज व्यय भावातील “ गुरु “ चा अभ्यास करुया.
व्यय भावात जरी असला तरी गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. गुरु च्या दोन राशी धनु आणि मीन इथे असतील तर आपण गुरु स्व गृही आहे असे म्हणूया . कर्क राशीत गुरु उच्चीची वस्त्रे परिधान करतो तर मकर राशीत निचत्वाला जातो. गुरु हा मुळातच आकाश तत्वाचा ग्रह आहे. अर्थात ही सर्व फळे प्रामुख्याने मिळतात ती गुरूच्या दशा अंतर्दशेत.
व्ययातील गुरु राहू केतू ह्यांनी दृष्ट असेल किंवा त्यांच्या युतीत असेल , शनी च्या दृष्टीत असेल , शुक्राच्या राशीत असेल , वक्री असेल तर त्याच्या फळात कमतरता येणार. व्ययातील गुरूचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे असलेले ज्ञान मुक्त पणे इतरांना देत राहणे . धार्मिक यात्रा तसेच विदेश यात्रा हा गुरु करवेल. गुरु शुभ स्थितीत असेल तर विवेक ज्ञान सद्विचार आणि समंजस पणा देईल. गुरु चांगला असेल तर विदेश यात्रा आणि त्यातून अर्थार्जन , संतती चे शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशगमन , गुरु धर्म किंवा मोक्ष त्रिकोणात येणाऱ्या राशींमध्ये व्ययात असेल तर आणि त्यांच्याच भावेशाच्या दृष्टीत असेल , कुठल्याही कुयोगात नसेल तर उत्तम व्यासंग , वक्ता होईल, एखादी मोठी धार्मिक संस्था चालवेल, मठाधीपती म्हणून काम करेल . व्ययातील गुरु शुद्ध असेल तर एखाद्या मठाचा देवळाचा कारभार बघेल पण बिघडलेला असेल तर ढोंगी असेल. मेवा खाण्यासाठी सेवा करेल , ढोंगी ,अज्ञानी पण दिखावा करणारा असेल. गुरु बिघडला असेल तर मग लोकांच्या पैशाचा दुरुपयोग , फ्रॉड , धोका करून मग तुरुंगवास नशिबी येणे हे होणारच . दुषित गुरु लिव्हर , मेदवृद्धी आजार देईल आणि दवाखान्याच्या फेऱ्याही करवेल . धननाश होईल , आजारपणावर अमाप खर्च होईल. शुभ गुरु उत्तम डॉक्टर , गणितज्ञ , विचारवंत , वकील , उत्तम सल्लागार , ज्ञानी व्यक्ती घडवेल .
धनु राशीचा व्ययातील गुरु चांगली नोकरी आणि चांगल्या ठिकाणी बदली करवेल . विदेशात उत्तम शिक्षण होईल . चांगले घर होईल . मीन राशीचा गुरु भाग्येश होवून व्ययात असेल तर सुद्धा परदेशगमन करवेल, परदेशात स्थाईक होईल, साधना, नामस्मरण भक्ती करेल . हाच गुरु मकर राशीत निचीचा असेल तर अमाप खर्च होईल , पैशाचा संचय होणार नाही . ह्या गुरुवर निचीच्या शनीची दृष्टी नको . पण हा नवमांशात बलवान असले तर चांगली फळे मिळतात .
व्ययात गुरु उच्चीचा म्हणजेच कर्क राशीत असेल म्हणजेच इथे गुरु अष्टम भावाचा स्वामी असून विपरीत राज्योगात असेल तर परदेशगमन , यात्रा , संतती विदेशात अध्ययन किंवा नोकरीसाठी जाईल. गुरूच्या तीन दृष्टी आहेत पण त्या काय फळे देतील हे पहायच्या आधी गुरु शुभ आहे की अशुभ हेही पाहावे लागेल. व्ययातील गुरूची दृष्टी चतुर्थ भाव , षष्ठ भाव आणि अष्टम भावावर असते . चतुर्थ भावावरील दृष्टी चांगले घर , जमीन जुमला गृहसौख्य देईल. पण शुभ असेल तरच . तसेच षष्ठ भावावरील दृष्टी अशुभ असेल तर रोग ऋण शत्रू तयार करेल पण शुभ गुरु पासून घाबरण्याचे काम नाही . अष्टम भावावरील दृष्टी गूढ शास्त्रात प्रगती करेल ,वारसाहक्काने संपतीचा लाभ होईल, ज्योतिष शास्त्रात प्रगती , अचानक धन मिळेल . अशुभ असेल तर ह्या सर्वाच्या विपरीत घटना घडतील.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की प्रत्येक वेळी गुरु हा शुभ असेलच असे नाही तो अशुभ सुद्धा असू शकतो . गुरु मित्र राशीत आहे की \ शत्रू राशीत , लग्नेशाचा गुरु मित्र आहे की शत्रू , पापग्रहांनी दुषित आहे का ? ह्या सर्वांवर गुरूचा फलादेश अवलंबून असतो . त्यामुळे सखोल अभ्यास आवश्यक असतो.
म्हणूनच गुरु लग्नात आला किंवा त्याची दृष्टी सप्तम भावावर येयील तेव्हा विवाह होईल हे भाकीत चुकीचे ठरू शकते . विवाह होण्यास इतर अनेक गोष्टींची सांगाड घालावी लागते . गुरु हे एक तत्व आहे मग त्याची रूपे आणि नावे अनेक असतील. मातृदेवो भव , पितृदेवो भव. आपले आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत . आपले शाळेतील महाविद्यालयातील शिक्षक तसेच अखंड आयुष्याच्या प्रवासात भेटत जाणाऱ्या सर्व ज्ञानी व्यक्ती सुद्धा गुरुसमान आहेत . सरतेशेवटी आपले सद्गुरू ज्यांचे बोट धरून आपला जीवन प्रवास सुरु आहे त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय काहीच शक्य नाही .
आपापल्या पत्रिकेत गुरु कसा आहेत ते आपले आपणच तपासून पहा . दुषित असेल तर त्याला चांगला करण्यासाठी उपाय करा आणि चांगला असेल तर अजून चांगला करण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहा .उपासना किती करू हा प्रश्नच येत नाही . बटाटे वडे खाताना विचारतो का किती खाऊ ?? हे अगदी तसेच आहे . आपण कलियुगात आहोत तासातासाला समस्या येत आहेत त्यातून मार्ग काढताना उपासना उपयुक्त ठरणारच , उपासना हा आपल्या जीवनाचा आधार आहे . तेव्हा जितका जमेल तितका जप करत राहा . अधिकस्य अधिकम फलं.
>>गुरूचा नवग्रह स्त्रोत्रातील बीजमंत्र म्हणणे! किती वेळा? तर... जमेल तितका
>> श्री स्वामी समर्थ हा जप किंवा आपल्या इष्ट गुरूंचा जप म्हणणे.
>> श्री गजानन विजय किंवा गुरूलीलामृत , साई चरित्र ग्रंथांचे पारायण रुपी सेवा
>> धार्मिक स्थळांना भेट देवून सद्गुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घेणे
>> अखंड नामस्मरण सर्वात उत्तम .
संपर्क : 8104639230