उन्हाळ्यात घरबसल्या मिळवा जलदानाची संधी आणि भरपूर पुण्य; वाचा 'या' महत्त्वाच्या गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:20 PM2023-03-14T15:20:56+5:302023-03-14T15:21:36+5:30
भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्या, ही आपल्या संस्कृतीची शिकवणा; तिची अंमलबजावणी करण्याची हीच ती वेळ!
मार्च महिना सुरू काय सुरू झाला आणि सूर्यदेवांनी तपमानात वाढ करायला सुरुवात केली. त्यात घामाच्या धारा आणि पाणीटंचाई हे विजोड समीकरण! दर दोन दिवसांनी पाण्याचे टँकर मागवा नाहीतर पाणी यायची वाट बघत बसा. ही अवस्था मार्चमध्ये, अजून तर एप्रिल आणि मे काढायचा आहे. तेव्हा काय परिस्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. आपले हे हाल तर बिचाऱ्या प्राणिमात्रांचे काय हाल होत असतील, हा विचार करून आपण भूतदयेपोटी शक्य तेवढे जलदान केले पाहिजे. पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. उन्हातान्हात थकून भागून आलेल्या व्यक्तीला निदान पाणी विचारले पाहिजे. हा आपला अतिथी धर्म आहे. त्याचे पालन निश्चितच केले पाहिजे.
याशिवाय आपण सर्वांनी मिळून आई भगवतीला तृष्णा रूपाने सर्वांची तहान भागवावी, सर्व जीवांना जीवदान द्यावे, अशी प्रार्थना केली पाहिजे.
या देवी सर्वभूतेषु तृष्णा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
सदर श्लोकात तृष्णा हा शब्द इच्छा या अर्थी वापरला आहे. सर्वांची इच्छापूर्ती व्हावी, अशी श्लोकात प्रार्थना केली आहे. परंतु जेव्हा पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा डोळ्यात पाणी येते आणि अन्य कोणतीही इच्छा उरत नाही. म्हणून आपणही मनोभावे देवीला प्रार्थना करूया आणि यथाशक्ती जलदान करूया.
हे दान घरबसल्या सुद्धा करता येण्यासारखे आहे. त्यासाठी आपल्या खिडकीत पाण्याचे भांडे ठेवा आणि सकाळ संध्याकाळ ते स्वच्छ करून पाण्याने भरत राहा. मग जादू बघा. चिमण्या, कावळे, खारुताई, पोपट, मैना तुमच्या अंगणात येतील, पाणी पितील आणि तृप्त होऊन जातील. त्याबरोबरच अनेक ठिकाणी पांथस्थांसाठी रस्त्याच्या चौकात, एखाद्या झाडाखाली, पारावर पाण्याचे माठ भरून ठेवले जातात. जेणेकरून येणा जाणाऱ्या वाटसरूला गरज लागल्यास माठाचे थंड पाणी पिता येईल. तुमच्याही नजरेत असे मोक्याचे ठिकाणी आढळले तर तुम्हीसुद्धा स्वखर्चाने तिथे जलदान पात्र ठेवू शकता. दररोज सकाळी भरून ठेवले की पांथस्थांना त्याचा लाभ घेता येईल आणि तुम्हाला जलदानाचे पुण्यही लाभेल!
तीच बाब गाय, कुत्रे, मांजरांची! त्यांच्यासाठीही रस्त्याच्या कडेला एखाद्या खोलगट भांड्यात पाणी भरून ठेवा. जेणेकरून तुमच्या मुळे तहानलेल्या जीवाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही आणि त्यांची तहानही भागेल.