औदुंबर पंचमी: नेमकी का साजरी केली जाते? जाणून घ्या वृक्षाचे दैवी गुण, महत्त्व अन् महात्म्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 03:55 PM2024-02-28T15:55:15+5:302024-02-28T15:57:48+5:30
Audumbar Panchami 2024: यंदा औदुंबर पंचमी गुरुवारी आल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. औदुंबर पंचमी, औदुंबराचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या...
Audumbar Panchami 2024: माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेकविध सण-उत्सव साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते. पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भूत देणगी असलेली काही झाडे, वृक्ष आवर्जून पूजली जातात. यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व नसते, तर वैज्ञानिक, आरोग्यदायी अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात. यापैकी एक म्हणजे औदुंबर. माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते. गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी औदुंबर पंचमी आहे. यानिमित्ताने काही गोष्टी जाणून घेऊया...
श्रीविष्णूंचा नरसिंह अवतार, तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. औदुंबराला कल्पवृक्षही संबोधले जाते. आधुनिक काळात अनेक झाडे, वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना पाहायला मिळतात. अशा सणांच्या किंवा उत्सवांच्या निमित्ताने निसर्ग पूजेचे महत्त्व, निसर्गातील झाडे-वृक्ष यांचे महात्म्य, गुणधर्म यांची ओळख पटते. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येते, तसेच निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता येते, अशा अनेक गोष्टी यानिमित्ताने साध्य करता येऊ शकतात. औदुंबर पंचमीला औदुंबराशी जाऊन दत्तगुरुंचे स्मरण करावे. शक्य असल्यास काहीवेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा, असे म्हटले जाते.
औदुंबर पंचमी का साजरी केली जाते?
औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरु आठवतात आणि दत्त गुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते, तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी करतात. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर, श्रीनृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले. म्हणून वाडीला श्रीगुरुप्रतिपदेपासून औदुंबरपंचमी पर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो.
औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराची कथा
औदुंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराबाबत काही कथा सांगितल्या जातात. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्यकश्यपू मदोन्मत्त झाला होता. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद विष्णूभक्त होता. यामुळे हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विविध पद्धतींनी त्रास दिले. मात्र, श्रीविष्णूंची कृपा कायम त्यावर राहिली. अखेर श्रीविष्णूंनी नरसिंह अवतार धारण करत हिरण्यकश्यपूचा वध केला. त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होते, ते त्या नरसिंहरुपी विष्णूंच्या नखांत भरले. त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापली होती. तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळांत आपली नखे खूपसावयाला सांगितले. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाले. तेंव्हा लक्ष्मीवर श्रीविष्णु प्रसन्न झालेच; परंतु औदुंबरालाही शुभाशिर्वाद दिले.
प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन
श्रीमहाविष्णु हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रुपात प्रकट झाले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर राज्यावर बसविले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटु लागली. पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मूळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन. असे माझे वचन आहे, असे दत्तात्रेयांनी सांगितले. औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. धन, धान्य, भू-संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. औदुंबराची महती आणि महात्म्य अनेक ठिकाणी वैविध्यतेने वर्णन केल्याचे आढळून येते.
अनेक पुण्यवृक्ष त्यजून। काय प्रीती औदुंबरी?
दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबरतळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रूत आहे. अनेक पुण्यवृक्ष त्यजून। काय प्रीती औदुंबरी? असा प्रश्न विचारल्यावर श्रीगुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्रीनृसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. औदुंबरास दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले. या वृक्षाचे महात्म्य वर्णन श्री गुरूचरित्रकारांनी केल्याचे सांगितले जाते.
औदुंबर वृक्ष दैवी गुणाबरोबरच औषधी उपयोग
दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे, असे म्हटले जाते. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे, असे सांगितले जाते.
।।श्री गुरूदेव दत्त ।।