August Born Astro: ध्येयाकडे वाटचाल करताना अडचणी आल्या तरी न थांबणारे 'ऑगस्ट'वीर; वाचा गुण-दोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:01 AM2024-07-31T10:01:52+5:302024-07-31T10:02:16+5:30

August Born Astro: ऑगस्टमध्ये जन्माला आलेले लोक ध्येयनिष्ठ तर असतातच, पण त्यांचे काही स्वभावदोष बदलणे कर्मकठीण; सविस्तर वाचा. 

August Born Astro: 'August' heroes who do not stop even if there are difficulties while moving towards the goal; Read the pros and cons! | August Born Astro: ध्येयाकडे वाटचाल करताना अडचणी आल्या तरी न थांबणारे 'ऑगस्ट'वीर; वाचा गुण-दोष!

August Born Astro: ध्येयाकडे वाटचाल करताना अडचणी आल्या तरी न थांबणारे 'ऑगस्ट'वीर; वाचा गुण-दोष!

ऑगस्टमध्ये जन्माला आलेले लोक अतिशय भाग्यवान असतात. त्यांना विशेषत: सूर्याचे बळ मिळते. कारण या महिन्याचा गुरु सूर्य हा ग्रह असतो. त्यामुळे साहजिकच सूर्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रात सतेज कामगिरी करतात. ते उच्च जीवनशैली जगतात व मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात. त्याचबरोबर त्यांच्या ठायी असलेल्या नम्रतेमुळे ते आई वडिलांची सेवा, गरीबांना दानधर्म आवर्जून करतात. त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकता हे दोन गुण असतात. ते दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वत:च्या आनंदाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदात जाते. ते प्रत्येक नाते इमानदारीने निभावतात.

या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो. ते कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. आपले ध्येय गाठताना ते सत्याची कास सोडू देत नाहीत. स्वत: प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. अशा लोकांना स्वत:ची स्तुती ऐकायला आवडते. गंमत म्हणजे, कोणी यांची स्तुती केली नाही, तर ते स्वत:च आपली स्तुती करून मोकळे होतात.

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बधत नाहीत किंवा मोहाला बळी पडत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूप उपयोग होतो. सूर्याचे जसे तेज त्यांच्या कार्याला मिळते, त्याचप्रमाणे सूर्याचा उग्रपणा थोडाफार त्यांच्या स्वभावात उतरतो. त्यामुळे रागाच्या भरात उलटसुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात. मात्र, हे लोक हिंसा, अत्याचार, फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाहीत.    

या लोकांना निरोगी आयुष्याचे वरदान असते. मध्यम बांधा, साधारण उंची, व्यक्तीमत्त्व रुबाबदार पण विरळ केस असे त्यांच्या रंगरुपाचे गणित असते. परंतु, मुळातच उच्च राहणीमानाची आवड असल्याने हे लोक आपल्या नैगुण्यावर सहज मात करतात आणि आपल्याला आणखी चांगले कसे राहता येईल, जगता येईल याचा विचार करतात व तशी मेहनत घेतात.

कमी मेहनत आणि जास्त परिणाम हे व्यस्त गुणोत्तर या लोकांच्या बाबतीत लागू होते. म्हणून सुरुवातीलाच यांना भाग्यवान असे म्हटले आहे. एवढेच काय, तर या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकते. तसेच नेतृत्त्वाचे गुण असल्यामुळे ते भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद चांगले निभावू शकतात. परंतु कधी कधी ते अविचाराने चांगल्या संधीला हुकतात व पश्चात्ताप करत बसतात. अशा बाबतीत त्यांचा थोडा संशयी स्वभाव आड येतो. तसेच दुसऱ्यांचे मत विचारण्यात कमीपणा वाटतो. या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात़

या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्ने लाभदायक ठरतात. तर पिवळा, केशरी आणि हिरवा हे रंग शुभ ठरतात. या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे. त्याचा त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो. सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य नमस्कार घालणे, गायत्री मंत्र म्हणणे यासारखे उपाय त्यांनी जरूर करावेत.

मदर तेरेसा, किशोर कुमार, राजीव गांधी, निर्मला सितारामन, श्रीदेवी, एनआर नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, गुलजार अशी नामांकित मंडळी ऑगस्ट महिन्यात जन्माला आली.

Web Title: August Born Astro: 'August' heroes who do not stop even if there are difficulties while moving towards the goal; Read the pros and cons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.