श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; गणपती बाप्पासह महादेवांचे मिळवा शुभाशिर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:05 AM2022-08-15T05:05:05+5:302022-08-15T05:05:05+5:30
Shravan Sankashti Chaturthi August 2022: श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी येणे हा शुभ योग मानला जातो. या संकष्ट चतुर्थीच्या व्रताचरणाची सोपी पद्धत आणि राज्याच्या प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या...
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजनाने होते. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. ऑगस्ट महिन्यातील श्रावणी संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... (Shravan Sankashti Chaturthi August 2022)
व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांचा राजा मानला गेलेला श्रावण सुरू आहे. यानंतर पुढील भाद्रपद महिन्यात अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यासाठीची लगबगही सुरू झाली आहे. भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणाऱ्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे श्रावणी सोमवारी संकष्ट चतुर्थी येत आहे. श्रावणी सोमवार हा महादेवांच्या पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. १५ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार असून, या दिवशीची शिवामूठ मूग आहे. गणपती बाप्पाच्या संकष्ट चतुर्थीच्या व्रतासह महादेवांना बेलाचे पान वाहून पूजन, नामस्मरण केल्यास गणपती बाप्पासह महादेवांचेही शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. यंदाच्या वर्षीची १५ ऑगस्ट २०२२ रोजी श्रावण संकष्ट चतुर्थी आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते.
असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Shravan Sankashti Chaturthi August 2022 Chandrodaya Timing)
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून २० मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ३२ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून २५ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे |