सकाळी उठल्या उठल्या 'या' गोष्टी बघणे प्रकर्षाने टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:51 PM2021-06-23T17:51:09+5:302021-06-23T17:51:27+5:30
सकाळ छान झाली तर दिवसही छान जाईल.
दिवसाची सुरुवात कशी होते, यावर पूर्ण दिवस अवलंबून असतो. अनेकदा दिवस वाईट गेला की त्याचं खापर फोडताना आपण सहज म्हणून जातो, 'काय माहीत आज सकाळी कोणाचे तोंड पाहिले...' वास्तविक पाहता वास्तुशास्त्र सांगते, सकाळी सकाळी स्वतःचेच तोंड पाहणे अशुभ ठरते. यासारख्याच आणखी कोणत्या गोष्टी सकाळी उठल्यावर पाहणे टाळावे, ते पहा...
>>झोपून उठल्यावर स्वतःचा चेहरा बघणे टाळा. तोंड धुतल्याशिवाय चेहरा बघू नका. यासाठी बेसिन जवळ आरसा ठेवू नका. आरसा असेल, तर स्वाभाविक आपले लक्ष आरशात जाते आणि वास्तू शास्तानुसार तसे करणे अयोग्य ठरते.
>>झोपून उठल्यावर आपल्या नजरेसमोर असलेल्या भिंतीवर कोणतेही विक्षिप्त चित्र लावू नका. त्याऐवजी देवाचे चित्र लावा नाहीतर सुंदर फुलगुच्छ ठेवा. तरच दिवसाची प्रसन्न सुरुवात होऊ शकेल.
>>सकाळी डोळे उघडल्यावर तुम्हाला सूर्य दर्शन होत असेल तर उत्तम. परंतु तसे होत असताना आपसूक तुमची सावली पश्चिमेला पडेल. ती पाहणे टाळा. वास्तू शास्त्र सांगते, सकाळी उठल्यावर सावली पाहणे अशुभ असते.
>>पाळीव प्राण्यांना बाजूला घेऊन झोपू नका. सकाळी झोपून उठल्यावर किंवा अर्धवट झोपेत असताना अनावधानाने त्यांना पाय लागून इजा होऊ शकते. त्यांची झोपण्याची व्यवस्था स्वतंत्र ठेवा आणि शक्यतो तुमच्या बेडरूम बाहेर ठेवा.
>>झोपेतून उठल्यावर खरकटी भांडी पाहू नका. यासाठी शक्य असल्यास रात्रीच भांडी घासून ठेवा. चूळ भरल्याशिवाय टॉयलेट वापरू नका. झोपून उठल्यावर या गोष्टी पाहणे टाळा.
मग सकाळी उठल्यावर नक्की काय पाहायला हवे?
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती,
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम् ।।
आपल्या संस्कृतीने आपल्यावर संस्कार घातला आहे, तो म्हणजे करदर्शनाचा! सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेऊन जमिनीला नमस्कार करून मग सूर्यदर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी. तसे केल्याने, आपल्या हातामध्ये वसलेले श्रीकृष्ण, श्रीलक्ष्मी आणि श्रीसरस्वती यांच्या दर्शनाचा लाभ होतो. या दोन्ही हातांनी आपण दिवसभर काम करणार असतो म्हणून त्यांचे दर्शन आणि मातृभूमी आपला भार वाहणार असते, तिला पदस्पर्श होणार असल्याने तिला नमस्कार केला जातो.