सूर्यास्ताच्या वेळी 'या' गोष्टी टाळा, अन्यथा लक्ष्मी माता कधीही येणार नाही घरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:54 PM2022-12-10T13:54:59+5:302022-12-10T13:55:26+5:30
सातच्या आत घरात, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण होती; जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि त्यामागची कारणं!
वेदांमधील ज्ञानाच्या सर्व गोष्टींबरोबरच दैनंदिन जीवन आणि सवयींबद्दलही मार्गदर्शन केले आहे. शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच, या ग्रंथांमध्ये अन्न, राहणीमान, आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबींबद्दल चर्चा केली गेली आहे. त्यांच्या मते संध्याकाळी काही काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर लोक सूर्यास्ताच्या वेळी हे काम करत असतील तर यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते . तसेच, त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. या दोन्ही गोष्टींचा ऱ्हास टाळायचा असेल, तर पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा.
सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नका. सूर्याला आपण देव मानतो. तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणे उचित नाही. म्हणून शास्त्राने रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितले आहे. आरोग्य शास्त्रानेही त्यास दुजोरा दिला आहे. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्याला भोगावा लागतो. आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या की औषधोपचार करण्यात पैशांचाही अपव्यय होतो. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर जेवण टाळा.
सूर्यास्ताची वेळ आणि दिवेलागणीची वेळ एकत्र येते. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावर घराला प्रकाशमान करण्याची जबाबदारी दिव्यावर येते. छोटीशी पणती, समई, निरांजन घरात प्रकाश पसरवते. त्यावेळेस लक्ष्मी घरात येते, अशी आपली श्रद्धा आहे. मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल. म्हणून संध्याकाळ झाली की लोळत पडू नये किंवा झोपूही नये.
संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो. म्हणून संध्याकाळी कोणाला कर्ज देऊ नये किंवा घेऊही नये. हा व्यवहार दिवसभरात केव्हाही करावा, परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये, असे शास्त्र सांगते.
या वेळेत ध्यान करा. सायंकालीन संधिप्रकाश काळ ध्यान धारणेसाठी उचित मानला जातो. या काळात मन स्थिर नसते, ते ध्यानधारणेत गुंतवले पाहिजे. तसेच या कालावधीत शरीर संबंधही टाळले पाहिजेत. त्यातून गर्भधारणा झाल्यास संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
यासाठीच मन शांत ठेवून स्तोत्रपणठण करावे. मन ईश्वर चिंतनात रमवावे. किंवा चांगले विचार अथवा वाचन, मनन करावे.